फॉलोअर

मोरया !



उद्या अनंत चतुर्दशी बाप्पा गावाला जाणार !! यावर्षी १२ दिवस मुक्काम करून गणपती बाप्पा त्याच्या गावाला जाणार मग आपण “पुढच्या वर्षी लवकर या !” चा गजर करीत प्रचंड उत्साहात बाप्पांना निरोप देणार पण आपल्या निरोप देण्याचा त्रास इतरांना होणार नाही याची काळजी आपण घेणार आहोत काय? पोलीस आयुक्तालयाकडून, समाजसेवी संस्था कडून जागोजागी लोक जागृतीचे फलक लावले गेले आहेत, ते आपण वाचणार आहोत काय ? आणि जर वाचले तर त्यावर अंमल करणार आहोत काय ? कारण लोक सहभागा शिवाय लोक जागृती कठीणच ! असे माझे मत आहे. आज गणपती घाटावरील श्री गणेशाचे दर्शन घ्यावयास गेलो होतो, दर्शन घेतल्यावर सहज लक्ष गेले तर तिथे महानगरपालिकेकडून उद्याची तयारी चालली होती, हो हो उद्याची तयारी, विसर्जन कुंडात पाणी भरण्याची !! माहिती नाही उद्या पर्यंत ती पूर्ण होईल का ? पण तयारी तर चालू होती, पाईप एकीकडे, पाणी पडत होते एकीकडे पण वाहत जावून विसर्जन कुंडातच पडत होते, हे तमाम सोलापूरकरांचे नशीबच !!
          उद्या निम्मे सोलापूरकर येथेच गणेश विसर्जनासाठी येणार तो पर्यंत विसर्जन कुंड पाण्याने भरावे हि गणेशाच्या चरणी प्रार्थना !! प्रशासन स्तरावर प्रयत्न सुरु राहतील पण मला वाटते आपण हि जागरूक व्हाव, स्वत:ला सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या समाजाने तरी पर्यावरणाची काळजी घ्यावी, गणेश मूर्ती मातीच्या (शाडूच्या) असल्यास त्या घरच्या घरी विसर्जित कराव्यात आणि त्या मातीमध्ये एखादे रोपटे लावून व हे रोपटे सोसायटी च्या आवारात फुलवावे. गणेश मूर्ती जर प्लास्टर ऑफ पॅरीस ची असेल तर बेकरीत वापरला जाणारा सोडा (मूर्तीच्या वजना इतका) पाण्यात मिक्स करावा आणि मूर्ती त्या पाण्यात विसर्जित करावी. प्लास्टर ऑफ पॅरीस ची मूर्ती ४८ तासात विरघळते असे एन सी  एल  तज्ञांचे मत आहे. आपण या वर्षी हा प्रयत्न करायला काय हरकत आहे. चला या वर्षी संकल्प करूयात मूर्ती घरीच विसर्जित करूयात, निर्माल्य विसर्जन कुंडात टाकायचे नाही, निर्माल्याचा उत्कृष्ट खत म्हणून वापर करायचा.

          गणेश मूर्ती जर विसर्जन कुंडात (पाणी भरले गेल्यास) विसर्जित केली तर ती पाण्यात फेकून देवू नका, पाण्यात व्यवस्थित सहज, हळूवार सोडून द्या ! १२ दिवस मूर्तीची पूजा करायची, श्रद्धा स्थानी ठेवायची आणि विसर्जन करताना फेकून द्यायची ? नका, अस करू नका. निर्माल्य प्लास्टिक पिशवीसह पाण्यात फेकून देवू नका, महापालिकेने निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे त्याचा वापर करा, करणार ना ? नक्कीच आपण सर्वांनी ठरवल तर नक्कीच हा बदल यावर्षी घडणार !! डॉल्बी टाळूयात संस्कृती जपुयात, चला तर मग खरोखरी स्मार्ट सिटी सोलापूर चे स्मार्ट नागरिक बनुया, पर्यावरणाचे रक्षण करुया !!!
गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या !!
अमित कामतकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?