फॉलोअर

मित्र

“मित्र” देवाने मुनष्य प्राण्याला दिलेली देणगीच !! मित्र नाही असा कुणी मनुष्यप्राणी या पृथ्वीतलावर भेटणेच शक्य नाही. जीवन आहे तर मित्र आहे किंबहुना “मित्र आहे तर जीवन सुंदर आहे”. प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र हा असतोच, जीवा भावाचा एक सच्चा सोबती !! बऱ्याच वेळा आई वडिलां माहिती नसलेली एखादी गोष्ट फक्त मित्रालाच माहिती असते, आणि तो मित्र देखील तेवढाच प्रिय असतो जेवढे आई- वडील !! हो ना ? तुमच्याही आयुष्यात असे जीवाभावाचे मित्र असतीलच कि !! जे नातलगांपेक्षा सुद्धा जवळचे वाटतात आणि असतात देखील !!
          मी माझ्या स्मार्ट फोन वर माझ्या कामाचा मेसेज मराठीत टाईप करीत असताना माझ्या शेजारी बसलेल्या एका गृहस्थाने, “तुम्ही मराठीत एवढ फास्ट टाईपिंग कस करता?” अस विचारल ! तुमच्याकडे कोणती मराठी लिपी आहे, माझ्याकडे एवढ फास्ट टाईपिंग करता येत नाही. त्यास थांबवत मी म्हणालो, “माझ्याकडे हि (स्मार्ट फोन दाखवत) मराठी लिपी आहे, यावर तो गृहस्थ म्हणाला, “मला माझ्या फोनवर हि लिपी कशी वापरायची सांगाल?”, मी म्हणालो जरूर आणि मी सांगू लागलो इतक्यात माझ्या समोर बसलेला इसम म्हणाला, “थोड मोठ्याने बोला, त्याला कमी ऐकू येतं !!” मला एक क्षण कळालच नाही, हा इसम मध्येच का बोलतोय पण तो परत म्हणाला, त्याला कमी ऐकू येत, तुम्ही थोड मोठ्याने सांगा!! मला मोठ्याने बोला म्हणून सांगणारा हा इसम म्हणजे निलेश गादे आणि मराठी टाईपिंग फास्ट कस करायचं विचारणारा संदीप नेवासकर !! दोघेही जीवाभावाचे मित्र, दोघेही यवतमाळ चे, बालपणापासूनचे मित्र, एकत्र शाळेत गेले, एकत्र परीक्षा दिल्या आणि आता आयुष्याच्या परीक्षेत निलेश संदीप ला साथ देतोय.... संदीप आयुष्याने, दैवाने त्याच्या पुढे मांडलेल्या कठीण परीक्षेस बसला आहे. संदीप नोकरी निमित्त नागपूरला असतो तर निलेश यवतमाळ ळा शेती व्यवसाय करतो. दोघेची संदीप च्या उपचारासाठी सोलापुरात आलेले. संदीप च्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या आहेत व त्यामुळे त्याचा परिणाम त्याच्या ऐकण्याच्या शक्तीवर झाला आहे. संदीप ला आठवड्यातून दोन वेळा डायलिसीस करावे लागते पण संदीप च्या चेहऱ्यावर कुठेच दु:खी भाव दिसत नव्हते, उलट नवीन शिकण्याची इच्छा, नवी उमेद पहायला मिळाली. तो त्याच्या मित्रा सोबत आनंदात आयुष्य जगत आहे. मित्र असतातच असे जगायला शिकविणारे, आयुष्यात पुढे जायला सपोर्ट करणारे, ऊर्जा देणारे !! 

          पुढे माहिती घेताना कळाले कि संदीप चा हा आजार आनुवांशिक (जेनेटिक) आहे. त्याचा भाऊ देखील अशाच प्रकारे दोन्ही किडन्या निकामी झाल्याने मृत्यू पावला. संदीप ची पत्नी नागपूर येथे एका खासगी बँकेत नोकरीस आहे. प्रकृती अस्वाथ्यामुळे संदीप ला नोकरी करणे शक्य नाही, त्याची मुलगी शाळेत शिकते आहे. संदीप च्या मित्रांना जेंव्हा त्याच्या आजारा बद्दल कळाल तेंव्हा त्यांनी सर्वांनी मिळून नागपूरला एक गेट टुगेदर केले त्यात शाळेतील सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र आले आणि त्यास आनंद देण्याचा प्रयत्न केला. त्याला या सर्व मित्रांना सोबत जोडून ठेवण्यासाठी स्मार्ट फोन घेवून दिला ज्यामुळे whatsapp च्या माध्यमातून संदीप संपर्कात राहील. मैत्री क्या चीज है, यासाठी यांच्याकडे पहावे. हि मित्र मंडळी फक्त एवढ्यावरच थांबली नाहीत तर त्यांनी, प्रत्येकास जेवढे जमेल तेवढे आर्थिक पाठबळ देण्याचे काम देखील केले आहे. जी रक्कम जमा झाली ती संदीपच्या मुलीच्या शिक्षणासाठी उपयोगात यावी या साठी बँकेत ठेव म्हणून ठेवण्यात आली आहे.
          हे सर्व समजल्यावर मी निलेश चा हात हातात घेतला व म्हणालो, “हॅट्स ऑफ आहे तुमच्या कार्याला,” तुमच्या सारख्या मित्रांमुळे संदीप नवीन आयुष्य जगत आहे, नक्कीच संदीप ची कथा दुख:द आहे पण तुमचा मैत्रीचा ओलावा सुखद आहे.” एक मित्र म्हणून एका मित्रा साठी केलेल्या ह्या सर्व बाबींची परतफेड कधीच होवू शकत नाही पण मैत्रीच नात खुप घट्ट असत हेच पुन्हा पहायला मिळालं.
          मृत्यूवर विजय मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या संदीप ला व त्याला साथ करणाऱ्या त्याच्या मित्रांना शुभेच्छा दिल्या व मी तेथून निघालो......

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर

तळटीप: मैत्री विषयी तुमचे मत कमेंट करा...   


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?