फॉलोअर

वारसा जपणं आम्हाला झेपेल का ?

 



काही इतिहासकार (?) “छावा” चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून एवढे बेचैन झाले आहेत की राजे, औरंग च्या हाती लागले, पकडले गेले त्यांना मरण यातना भोगाव्या लागल्या तरी राजेंनी शरणागती पत्करली नाही, धर्माभिमान जागृत ठेवला पुढील पिढीस हाच धर्माभिमान कायम प्रेरणा देत राहिला आणि राहील यात शंकाच नसावी. हे सारं महत्वाचं राहीलच नाही, फितुरी कुणी केली ? त्याची जात काय होती? या साऱ्या गोष्टीत जात कशी घुसडता येईल हे महत्वाचं. दुर्दैव आहे !!

३३६ वर्ष झाली अजूनही छत्रपती संभाजी महाराज काय होते हे समजून घेताना जाती पातीवरून ए आय च्या युगात सोशल मीडिया रंगवणं सुरू आहे. छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास समजून घेणं , पुढील पिढीस तो सांगणं, सगळ्यांचं कर्तव्य आहे. हे विसरून चालणार नाही.  

काही इतिहासकार (ब्राह्मण नसलेले) ज्यांनी संशोधन केलं आणि पुस्तकं लिहिली, छत्रपती संभाजी महाराज सर्वाना समजावेत यासाठी परिश्रम घेतले अशी सारी मंडळी सांगतात गणोजी आणि कान्होजी शिर्के यांच्या फितुरी मुळे राजे, औरंगच्या हाती सापडले... पण एक रील अचानक छावा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून फिरतं आहे, त्यात कुणी फ्रेंचचा रहिवासी, ज्याची वखार होती म्हणे पण तो वखार चालवत नव्हता... फक्त रोजनिशी लिहायला तेंव्हा संगमेश्वर ठिकाणी होता... त्याने यास ब्राह्मण कारकून मंडळीना जबाबदार धरलं आहे. किती हास्यास्पद आहे हे सारं... या फ्रेंच लोकाना किती महत्व द्यावं हे इतिहासात स्पष्ट सांगितले आहे. साधारण १६६० मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून व्यापार सुरू केलेली कालानुसार शेवटची कंपनी, हिंदुस्थानातील राजकारणात सशस्त्र उलाढाली सुरू करणारा फ्रेंचचा सेनापति डुप्ले हा होय. पुढे युरोपियन राष्ट्रांनी अलिखित करार करीत हिंदुस्थानातील राजांना सहकार्य करणे थांबविले याचा फटका महादजी शिंदे यांना ब्रिटिशां विरुद्ध लढाईत बसला. या सर्वात जास्त पगार घेणाऱ्या सेनानीने लढण्यास स्पष्ट नकार दिला, अर्थात मराठयांना हा दगा करणार हे माहितीच होत,  त्यामुळे फ्रेंचना किती महत्व द्यायचं हे ज्याने त्याने ठरवावं. अनेक संदर्भ ग्रंथ हेच सांगतात चित्रपटात जे दाखवलं आहे तेच त्रिवार सत्य आहे पण .. रोज नवा अध्याय लिहिण्याचा प्रयत्न कुणी ना कुणी करतंचं.  

मला अशा मंडळीना सुचवावं वाटतं अभ्यास करा, इतिहास माहिती करून घ्या, समजून घ्या उगाच जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करू नयेत. 

ऐतिहासिक चित्रपट बनविताना अनेक गोष्टीचा , तथ्यांचा आधार घेतला जातो, असे चित्रपट त्यांच्या वंशजांना प्रथम दाखविले जातात मग ते सामान्य नागरिकास पाहण्यास उपलब्ध होतात. छत्रपती घराण्यातील वंशज मंडळींनी कोणताही आक्षेप नोंदविला नाही तर आपण कोण आहोत ?

सध्या एक कागद फिरतो आहे ज्यात पुराभिलेख खात्याचा आधार / पत्र म्हटलं जात आहे त्यात "या खात्याकडे संदर्भित दस्त ऐवज उपलब्ध नाहीत" असा शेरा आहे... म्हणजे आम्ही सांगू शकत नाही असा त्याचा अर्थ होतो... पण तिथेही जात आडवी येते... पुरोगामी महाराष्ट्र !!

संत ज्ञानेश्वर, जगद्गुरु संत तुकाराम, आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना डोक्यावर घेऊन नाचणारा प्रत्येक जण पुरोगामी. त्यांनी दिलेली शिकवणं आंगीकरणारा त्यांनीच दाखवलेल्या वाटेवर चालणारा महाराष्ट्र पुरोगामी पण कृती करताना जाती – पातीवरून भांडणं करणारी मंडळी देखील कमी नाहीत. हे एक सत्य आहे , विदारक आहे पण वस्तुस्थिती आहे ...

आता एक चित्रपट काय येतो आणि सोशल मिडियावर अफवांचा, असत्याचा धुराळा उडवला जातो ... प्रखर सूर्य प्रकाशाने न्याय होईल असे वाटत असतानाच पुन्हा अंधार होतो... केला जातो... हे थांबायला हवं...

संविधानाने व्यक्ती , विचार स्वातंत्र्य सर्वांनाच दिलं आहे पण ते व्यक्त होण्याचं आहे, लादण्याचं नाही.

जातीवरून थोर, श्रेष्ठ व्यक्तींना वाटून घेणं थांबवा ... त्यांनी घालून दिलेला आदर्श जपुया,  त्यानुसार मार्गक्रमण करूया. हे साधं सोप आहे पण झोपेचं सोंग घेणाऱ्यांना कोण उठवणार ?

 

दैदीप्यमान इतिहास असणाऱ्या भारता मध्ये अनेक थोर, श्रेष्ठ मंडळी आहेत ही सारी मंडळी अनंत काळासाठी दीपस्तंभ आहेत


विचार करा...

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर

 

संदर्भ: प्रा. सू. ग. शेवडे लिखित “शंभूराजे”, जेधे शकावली, शिवचरित्र साहित्य खंड ३, मोगल दरबाराची बातमीपत्रं , स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित सहा सोनेरी पाने.   


इमेज सोर्स: गुगल 

 

 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?