फॉलोअर

अनसीन स्टेप्स : बिहाइंड सक्सेस

अनसीन स्टेप्स : बिहाइंड एव्री सक्सेस 

जीवनातील आव्हानं ही आपल्याला मजबूत बनवतात, त्यांना स्विकारा आणि तुमच्या आत्मविश्वासाची चाचणी घ्या. यश मिळविण्यासाठी तुमच्याकडे आत्मविश्वास हवाच. मला वाटतं स्वप्न पाहणे ही एक सुरुवात असते, ती साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यकच असतात. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि त्यांना सत्यात उतरवा. असे प्रेरक विचार आपण वाचतो आणि त्याप्रमाणे आयुष्यात मार्गस्थ राहण्याचा निर्धार ही करतो. प्रवास कोणताही असो तो तुम्ही एन्जॉय करता की नाही यावर बरचं काही अवलंबून असतं, आयुष्याचा प्रवास असो अथवा शैक्षणिक, व्यावसायिक असो, तुमची एन्जॉयमेंट मॅटर्स ! तसे पाहिलं तर आमच्या कामतकरांकडे व्यवसाय करणारा मीच पहिला ! त्यामुळे जमेल का? स्थैर्य मिळेल का? असे एक ना अनेक प्रश्न, व्यवसाय कसा करावा याचं बाळकडू मिळालेलं आहे का? तर अजिबात नाही, पण मनात निश्चय पक्का , प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी सोबतच बाबा-आईचं मनोबल, पाठीशी आशीर्वाद, माझी बहीण आणि माझा विवाह झाल्यानंतर पत्नी यांच्या प्रेरणे मुळे, भक्कम पाठिंब्या मुळे व्यवसाय करणं मी शिकत राहिलो आणि आजही शिकतो आहे.

वर्ष 2000-  व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणारी तीव्र इच्छाशक्ती, मोक्याची   जागा, ग्राहक, इन्फ्रा,हार्डवेअर-सॉफ्टवेअर , त्याचे शिक्षण, सेल्स, मार्केटिंग , अकाऊंटस् , ह्युमन रिसोर्स, ग्राहकाच्या समाधानाचा निर्देशांक, तो किती असावा? कसा असावा?, कस्टमर रिटेन्शन, बिझनेस मॉडेल, विविध ऑफर्स, विविध स्कीम्स , प्रमोशन मटेरियल, प्रमोशन माध्यम, असे एक ना अनेक विषय समोर होते यातील आजही काही तसेच आव्हान बनून समोर आहेत पण त्यांच्याशी दोन हात करून पुढे जाणे सुरूच आहे. मी सुरुवात अगदी ८० चौ . फुटा मध्ये केली, 286 आणि 386 प्रोसेसर संगणक , ही 80 चौ. फुट जागा म्हणजे आमच्या हॉलचा काही भाग ज्या मध्ये श्रीगणेशा ! विद्या कॉम्प्युटर्स या शैक्षणिक संकुलाची

सुरवात .. या नंतर जसे विविध प्रयोग यशस्वी होऊ लागले, मार्केट डिमांड येऊ लागल्या तस तसे विस्तार करण्याची स्वप्नं पाहू लागलो. याच स्वप्नातून 80 ते 2000 चौ. फुट प्रत्यक्षात आणण्यात यश आलं. सुरुवातीची दीड-दोन वर्षे घरातच इंस्टिट्यूट सुरू होतं, विद्यार्थ्याना, पालकांना विद्या कॉम्प्युटर्सचा परिचय करून देण्यात थोडेफार यश मिळत होतं. काही पालक चौकशी करीत येत असतं तर काही संगणक शिकण्याच्या इच्छेने इंस्टिट्यूट पर्यन्त पोहोचत असतं. त्यांना उत्तम प्रशिक्षण देणं हाच प्राधान्यक्रम असायचा, अर्थात तो आजही आहेच. इंस्टिट्यूट मोठ्या जागेत शिफ्ट करायचं म्हणजे साधारण जागेचं भाड किती असावं  ह्या प्रश्नाचं उत्तर आजही अनुत्तरितच आहे  पण मोठ्या जागेत भाड्याने शिफ्ट होणे क्रमप्राप्त होते कारण मायक्रोसॉफ्ट प्रमाणित कोर्सेस सुरू करायचे होते तसे इन्फ्रा आवश्यक होते, त्यामुळे ही धिटाई आवश्यकच होती.

तर मोठी जागा आणि ती मिळवण्यासाठी प्रयत्न , आमच्या श्रीकांत नगर सोसायटीचे चेअरमन मा. श्री. प्रभाकर क्षीरसागर साहेब यांनी तेंव्हा मला xxxx/- प्रति महिना भाडे सांगितले आणि xxxxx डिपॉजिट ! २००२ साली हे भाडे देखील मला जास्त वाटले होते. हा उल्लेख येथे मुद्दाम करीत आहे कारण सुरुवात घरातूनच असल्याने महिना खर्च तसा बाजूला काढून ठेवणे, आदी बाबी माहितीच नव्हत्या पण या नवीन जागेत शिफ्ट झाल्यावर किमान खर्च हा रु.५०००/- असणार.. कदाचित त्यापेक्षा जास्तच !! खर्च भागवून पैसे व्यवसाया साठी शिल्लक राहणं आवश्यक होतं आणि त्यासाठी  जास्त व्यवसाय होणं क्रमप्राप्त होतं. अर्थात तसे प्रयत्न केले गेले. खरा प्रश्न होता डिपॉजिटचा, ते कुठून आणायचं ? तर एकमेव बँक जिचा माझ्यावर प्रचंड विश्वास , ती बँक म्हणजे माझे “बाबा”, त्यांनी ही सोय केली. मी चेअरमन साहेबांना भेटायला गेलो आणि विनंती केली की एवढे भाडे देणे शक्य नाही, भाडे कमी घ्यावे पण क्षीरसागर साहेबांनी त्या दिवशी दिलेली शिकवणं आणि धाडस करण्याचं बळ दिलं , शिकवलं  ते आजही चांगलं लक्षात आहे. जे पुढेही माझ्या व्यावसायिक प्रवासात मला मोलाचं उपयोगी पडलं  यासाठी मी त्यांच्या कायम ऋणात राहू इच्छितो. महिन्याचा दायित्व खर्च कसा भागवायचा ? त्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट , फी कलेक्शन , स्टाफ पेमेंट, मार्केटिंग खर्च, त्याचे बजेट, एकूण प्रवेश संख्या किती असावी? टार्गेट किती?  आयुष्यातील आणि व्यवसायातील आव्हानं कधीच संपत नाहीत ती येतच राहतात आणि ती यावीत, त्याशिवाय “मजा” नाही, त्रास होतो का ? तर १००% होतो पण त्यातून मार्ग काढून पुढे जाण्यातच तुमचं यश दडलं आहे. स्पर्धा करावी पण ती स्वत:शीच. स्वत: साठी आणि तुम्ही करीत असलेल्या  व्यवसायात, नित्य नवा दिवस काहीतरी वेगळं घेऊन येतो, तुमच्या व्यवसायात निरंतर सुधारणा करणे तुमच्याच हातात आहे. त्याप्रमाणे सन २००० ते २०२५ या २५ वर्षात निरंतर सुधारणा करण्याचे तत्व आम्ही पाळले, नवे बदल आत्मसात केले, जे बदल आत्मसात करणं कठीण होत त्यासाठी वेळ दिला, कधी कधी पर्यायी व्यवस्था केली. कदाचित हेच कारण असेल आज विद्या कॉम्प्युटर्स कडे दुसरी पिढी देखील शिकण्यास येते. पहिल्या पिढीत या मुलांचे आई / वडील अथवा मोठा भाऊ विद्या कॉम्प्युटर्स मध्येच शिकला / शिकली आणि आज दुसरी पिढी.. या दुसऱ्या पिढीचे नेतृत्व करताना आनंद तर होतोच पण अभिमान देखील तेवढाच.

व्यावसायिक पार्श्वभूमी नसल्याने आणि छोटेखानी सुरुवात केल्याने असेल कदाचित पण सारं काही बूट स्ट्रॅपिंग – अर्थात स्वयं अर्थसहाय्य, इतर कुणी तुमच्या व्यवसायात गुंतवणूक करीत नाहीत. सुरुवातीच्या प्रवासात कुणी इन्कुबेटर नाही की जे शिकवतील व्यवसाय कसा करावा? रोजच्या व्यवसायात येणारे अनुभवच तुमचे मार्गदर्शक बनून तुम्हास शिकवितात, अगदी हेच माझ्या बाबतीत झालं. बाबा अकाऊंट एक्स्पर्ट असल्याने व्यवसायातील जमा-खर्च कसे सांभाळावे याचं मार्गदर्शन त्यांच्याकडून

मिळालं. यातच कॅश फ्लो सांभाळायचं तंत्र आत्मसात करता आलं. “पिवोट” हा एक बजवर्ड म्हणावा लागेल कारण आमचा फोकस आजही तोच आहे जो पंचवीस वर्षा पूर्वी होता, “विद्या परम् ध्येयम्”, फक्त बदल जो झाला तो विद्यार्थी करिअरसाठी आवश्यक असणारं आणि बदलणारं तंत्रज्ञान यामुळे प्रशिक्षणात केलेले लक्षणीय बदल. आज स्टार्टअपच्या निमित्ताने “डेथ ऑफ व्हॅली” विषयी बोललं जातं, साधारण पहिल्या तीन वर्षात अथवा अगदी दहा वर्षा नंतर देखील हे घडू शकतं. पण त्याचं नक्की कारण समजून घेणं आवश्यक आहे, तर डेथ ऑफ व्हॅली – व्यवसायात केलेली प्रारंभीक गुंतवणूक आणि त्यावर सुरू असणारा व्यवसाय , ही गुंतवणूक संपली की व्यवसाय पुढे कसा सुरू ठेवायचा हा प्रश्न पडतोच ! हा कालावधी डेथ ऑफ व्हॅली म्हणून ओळखला जातो. व्यवसायात आर्थिक गरजा या येतच राहतात आणि वाढत राहतात त्यावेळी प्रारंभीक गुंतवणूक किती दिवस पुरणार ? अशा वेळी व्यवसाय सुरू ठेवणं शक्य नसतं, मग असे व्यवसाय बंद केले जातात. पण आई-वडीलांचे संस्कार, अखंड सहकार्य सोबतच प्रामाणिक व जाणीव पूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळे आमच्या प्रवासात आम्ही डेथ ऑफ व्हॅली यशस्वीपणे पार करू शकलो असेच म्हणावं लागेल.   

२००३ जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा आयोजन – सुशील रसिक सभागृह येथे करण्यात आलं होत त्यानंतर २००४ मध्ये “हास्यसम्राट” श्री दीपक देशपांडे यांचा “हास्यकल्लोळ”, कार्यक्रम आयोजित करण्यात आला. २००७ साली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मान्यताप्राप्त BCA हा पदवी अभ्यासक्रम सोलापूर जिल्ह्यात सुरू करणारं प्रथम केंद्र म्हणून मान विद्या कॉम्प्युटर्सला मिळाला. प्रत्येक वर्षी विविध थीम वर आम्ही वर्धापन दिनाचे आनंद सोहळे साजरे करण्यात आले. दशक पूर्ती सोहळ्यात सुप्रसिद्ध “शिवरंजनी” कलाकारांनी “हृदयी वसंत फुलताना” हा बहारदार कार्यक्रम सादर केला. विविध कार्यक्रम मग ते विद्यार्थ्यांच्या करिअर विषयक असतील, करमणूक असेल, जॉब प्लेसमेंट ड्राइव असतील अथवा मान्यवर मंडळींचे सेमिनार असतील अशा विविध सेवा देण्यासाठी विद्यार्थी, पालकांनी आम्हास संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो.

या २५ वर्षाच्या प्रवासात सप्तरंगी अनुभव आले त्यातून बरचं काही शिकता आलं किंबहुना आजही शिकत आहे. या प्रवासात आमच्या टीम ने (स्टाफ मेंबर्स) अमूल्य असे योगदान दिले आहे. त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केल्या शिवाय हा लेख पूर्णच होऊ शकत नाही. २००१-२००२ मध्ये माझा मित्र निखिल, जो तेंव्हा इंजिनिअरिंग शिकत होता पण इंस्टिट्यूट मध्ये सी प्रोग्रामिंग साठी प्रवेश झाले होते आणि ते शिकविण्यासाठी शिक्षकांची गरज होती. निखिल सकाळी बॅच घ्यायचा आणि नंतर कॉलेजला जायचा, यामुळे विद्या कॉम्प्युटर्स मध्ये एक नवा कोर्स सुरू झाला जो पुढे माझी बहीण अश्विनी (आशु) आणि आज पर्यन्त माझी पत्नी अदिती ने समर्थ पणे जोपासला आणि वाढविला. आशुचे शिक्षण पूर्ण झाल्यावर काही दिवस तिने सोलापुरातील प्रतिष्ठित शाळेत संगणक शिक्षिका म्हणून सेवा दिली त्याकाळात देखील तिने शाळा आणि इंस्टिट्यूटचा ताळमेळ अत्यंत उत्तम जमवला होता. सध्या आशु पुणे येथे मल्टी नॅशनल कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. तेंव्हा दिवसभर शाळेत सेवा दिल्यानंतर पुन्हा इंस्टिट्यूट मध्ये प्रोग्रामिंग बॅचेस घ्यायच्या ही काही साधी बाब नव्हती. ही एक परंपराच बनली कारण माझी पत्नी अदिती ही देखील एक उत्तम शिक्षिका, तीने देखील सोलापुरातील विविध प्रतिष्ठित शाळेत

शिक्षिका म्हणून सेवा बजावली आहे. सौ अदितीचे योगदान शब्दबद्ध करणं कठीणच कारण सायन्स आणि गणित हे तिच्या आवडीचे विषय , ते शिकविण्यात ती पारंगत देखील आहे पण तिचे आवडीचे करिअर सोडून तिने इन्स्टिट्यूटची जबाबदारी तिच्या खांद्यावर घेतली ती आज पर्यन्त उत्तम रित्या सांभाळत, वाढवत आहे. व्यवसायात अडचणी येणारच त्यामुळे कधी व्यथित झालो, टेंशन आलं , निर्णय घ्यायचा झाला तर अशा वेळी माझ्या हक्काचा मित्र अमित कोथळीकर त्याने विविध कठीण प्रसंगात धीर देण्याचं काम केलं आणि विश्वास दिला की "तू करू शकतोस". या प्रवासात त्याचं योगदान मोलाचं आहे.  

या रौप्य महोत्सवी प्रवासात विविध टीम मेंबर्सनी योगदान दिले त्यात प्रामुख्याने स्वाती चिवडशेट्टी, प्रणव कदम, विकास कदम, सौ. मनीषा जगताप, वनिता पाटील, मीनाक्षी जिगजिणी, हर्षल कुलकर्णी, श्री राजीव कुलकर्णी, श्री मिलिंद उंबरगीकर, श्री मंगेश राऊत, सौ पूर्वा पांढरे, जमीर शेख, रोहिणी धवणे, चित्रा कल्याणशेट्टी, कपिल वाघमारे, अनघा देशपांडे, मालाश्री हिरेमठ,  वृषाली गायकवाड सध्या कार्यरत असणारे ट्रेनी , स्क्रॅच प्रोग्रॅमर आदित्य ह्या सर्व टीम मेंबर्सनी विद्या कॉम्प्युटर्सने तयार केलेल्या विविध एस.ओ.पी द्वारे विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन केले, त्यांच्याकडून विविध प्रॅक्टिकल्स करवून घेतले आणि त्यांना सक्षम करण्यात बहुमोल असे योगदान दिले. हे योगदान एवढं बहुमोल आहे की ज्याची तुलनाच होऊ शकत नाही. विद्या कॉम्प्युटर्स परिवार या सर्व टीम मेंबर्सचे मन:पूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहे. ही सर्व मंडळी विद्या कॉम्प्युटर्सच्या प्रवासातील साक्षीदार आहेत याचा मला अभिमान आहे.            

आपण बऱ्याच वेळा एखाद्या कोर्सच्या फीज कडे पाहतो आणि ठरवितो की फी जास्त आहे, कमी आहे. कोर्स शिकणे म्हणजे एखादं कौशल्य आत्मसात करणं हे करताना जर आपण एखादं प्रॉडक्ट विकत घेतल्या प्रमाणे डिस्काउंट असावा, ऑफर असावी, कमीत कमी फीज असावी असे होणार नाही त्यामुळे आपण तो कोर्स तुमच्या आयुष्यात कोणती वॅल्यू अॅड करणार आहे या कडे साफ दुर्लक्ष करतो. आम्ही

या वॅल्यू ला जास्त महत्व दिलं, वॅल्यू अॅडिशन काय करू शकतो? यावर निरंतर विचार आणि त्या अनुषंगाने कृती, याचा अर्थ अजिबात असा नाही की विद्या कॉम्प्युटर्स मध्ये कोर्स फीज जास्त आहे, बिलकुल नाही पण वॅल्यू काय ? यावर आम्ही ठाम आहोत. “बेस्ट वॅल्यू फॉर मनी”, यावर आज पर्यन्त सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनी विद्या कॉम्प्युटर्सवर शिक्का मोर्तब केले आहे. याच वॅल्यूज विद्यार्थ्याच्या करिअर मध्ये उत्तम साथ देऊ शकतात असा प्रबळ विश्वास आम्हास आहे. यावर नव्या शैक्षणिक धोरणाने शिक्कामोर्तब केला आहे. करिअर मध्ये आवश्यक कोर्स पूर्ण केल्या नंतर त्या कोर्सची पदवी प्राप्त करण्यासाठी क्रेडिट ट्रान्सफर सुविधा २०२५ पासून विद्या कॉम्प्युटर्स मध्ये उपलब्ध होणार आहे. यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांची मान्यता असणारे १०० पेक्षा जास्त स्किल कोर्सेस विद्या कॉम्प्युटर्स मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत. अपार आयडी सर्व शाळा , महाविद्यालयात विद्यार्थ्याना काढून देण्यात आलेले आहेत. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ही सुविधा केंद्र सरकारच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेली अतिशय महत्वाकांक्षी योजना म्हणावी लागेल, विद्यार्थी पदवी दरम्यान करणाऱ्या विविध स्किल कोर्सेसची क्रेडिट ट्रान्सफर त्याच्या पदवी अभ्यासक्रमात घेऊ शकणार आहे. आणि मला हे येथे नमूद करताना अत्यंत आनंद होतो आहे की ही सुविधा विद्या कॉम्प्युटर्स मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

संस्थेचा रौप्य महोत्सव हे एक स्वप्न असतं आणि विद्या कॉम्प्युटर्सचं हे स्वप्न सत्यात उतरतं आहे यासारखी आनंदाची गोष्ट नाही. या प्रवासात सहाय्य करणाऱ्या, योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे ज्ञात-अज्ञात सर्वांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो.

 

ता. क. : आता इंस्टिट्यूट त्याच जागेत पहिल्या मजल्यावर आहे याची विद्यार्थी , पालक, मित्र आणि हित-चिंतकांनी नोंद घ्यावी.  

 

धन्यवाद !

 

अमित बाळकृष्ण कामतकर  

लेखक, ब्लॉगर, सल्लागार, सॉफ्ट स्किल ट्रेनर, व्याखाता

संचालक – विद्या कॉम्प्युटर्स

संचालक- थिंकट्रान्स फाऊंडेशन, पुणे- सोलापूर चॅप्टर  

टिप्पण्या

  1. खूप सुंदर व प्रेरणादायी प्रवास कामतकर परिवार व विद्या कॉम्प्युटर्स चा आहे. यातील अगदी सुरुवातीचा संघर्षाचा मी साक्षीदार आहे. तुम्हांला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा
  2. आपल्या व्यवसायास लाख लाख शुभेच्छा व अभिनंदन.....

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?