डिजिटल लीडरशिपकडे वाटचाल करणारे सोलापूर
याच शैक्षणिक प्रवासाला
पूरक ठरत,
शहराच्या विविध भागांत कार्यरत असलेली कौशल्य विकास केंद्रे
विद्यार्थ्यांसाठी नवी दारे उघडत आहेत. मान्यताप्राप्त, मॉड्युलर
स्वरूपातील अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणे आणि
त्यांच्यात कौशल्यांची वृद्धी घडवून आणणे हे या केंद्रांचे प्रमुख उद्दिष्ट ठरले
आहे. विविध सर्वेक्षणे देखील शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित प्रशिक्षणाला मिळणारे
वाढते प्राधान्य अधोरेखित करतात, आणि या प्रक्रियेत कौशल्य
विकास केंद्रांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरत आहे. आज प्रमाणपत्र अभ्यासक्रमांपासून
ते डॉक्टरेट पदवीपर्यंतचा संपूर्ण शैक्षणिक प्रवास सोलापुरातच अनुभवण्याची संधी
विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली आहे—ही बाब सोलापूरच्या शैक्षणिक परिपक्वतेचे आणि
व्यापकतेचे स्पष्ट द्योतक आहे.
“माणसाला अज्ञानाकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे
“हात” धरून नेणारा प्रेमळ ज्ञानी म्हणजे गुरु”, हा संदेश कदाचित तुम्ही देखील
वाचला असेल, आताच युग हे एआय (आर्टिफिश्यल इंटेलिजेंसच) युग, बऱ्याच गोष्टी एआय
मुळे बदलत आहेत. “जनरेटीव एआय” ने खूप कमाल केली आहे. एका कंपनीचे अथवा स्वत:चे
प्रॉफिट लॉस शिट वाचण्याचे तंत्र प्रत्येकास आत्मसात असतेच असे नाही, आता जनरेटीव
एआयला हा प्रश्न विचारला तर लागलीच पूर्ण प्रॉफिट लॉस शिट एआय समजावून सांगेल.
तेही काही क्षणात आणि अगदी तुम्ही म्हणाल त्या भाषेत !! मग ही कमालच म्हणावी
लागेल. अर्थात त्याच्याकडील डेटाच्या आधारेच हे सारं सुरू आहे. माणसाने मशीन्सना
पुरविलेल्या माहितीच्या आधारे अनेक अचंबित करणारे निकाल एआय देऊ करीत आहे. काही
ठिकाणची जॉब्स जातील तर काही जॉब्स नव्याने तयार होतील. जॉबची नावे बदलतील या
साऱ्याचे आपण साक्षीदार होणार आहोत हे नक्की ! शिक्षण क्षेत्रात देखील असे विविध
प्रयोग होत आहेत आणि भविष्यात आणखी होतील. डिजिटायझेशन हा एक महत्वपूर्ण विषय आहे,
यात उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध आहेत, याचे वैशिष्ट्य असे की यावर आधारित कोर्स सोलापूर
विद्यापीठात उपलब्ध करण्यात आलेला आहे. जे ई ई , नीट सारख्या परीक्षा अथवा इतरही
स्पर्धां परीक्षा असतील यासाठी आवश्यक ऑनलाइन मटेरियल सध्या अस्तित्वात आहेच पण
सोबतच या क्षेत्रातील जाणकार, तज्ञ हे देखील सोलापुरात उपलब्ध आहेत. जी मंडळी
सोलापुरातील युवकास त्याच्या करिअर अनुषंगाने तयार करीत आहेत. पूर्वी काही ही
शिकायचं म्हंटल कि जवळपासच्या शहराकडे जावं लागायचं पण हे चित्र आता बदलतं आहे.
माहितीचा खजिना जो
इंटरनेट वर उपलब्ध आहे तो वापरण्यासाठी कुठल्याही विशेष प्रशिक्षणाची गरज आता
राहीली नाही, पूर्वीही ती कधी खास आवश्यक नव्हतीच पण विद्यार्थी मंडळी सहज कोणतीही
गोष्ट वाचून , प्रयत्न करून पाहू शकतील. साधारण पंचवीस वर्षापूर्वी जेंव्हा
सोलापुरात इंटरनेट वापरणे यासाठी फक्त नोड उपलब्ध होता. डायल अप कनेक्शन च्या
सहाय्याने इंटरनेट जोडणी प्रक्रिया एक सोलापूरकर म्हणून आपल्यापैकी अनेक लोकांनी
अनुभवली असावी. कमीत कमी 16 kbps ते 54 kbps
इंटरनेट स्पीड तेंव्हा मिळायचा. मग त्यातच जी काही इंटरनेट वर
आधारित कामं आहेत ती पूर्ण करून घ्यायची. डायल अप सुविधा हयात कनेक्शन अचानक बंद
होणे पुन्हा जोडणी न होणे अशा अनेक समस्या सुरुवातीच्या काळात होत्या पण इंटरनेट
क्रांती जसजशी होत गेली तशी ह्या सुविधे मध्ये
सोलापुरात सुधारणा होत गेली. इंटरनेट सर्विस प्रोवायडर देखील वाढले
ज्यामुळे सेवेत सातत्य आणि उत्तम सुधारणा होत गेल्या. आज सोलापुरात 100 gbps
पर्यन्त फायबर ऑप्टिक इंटरनेट सुविधा सर्वच भागात उपलब्ध झाली आहे.
याचा फायदा युवा पिढीस नक्कीच होतो आहे. मागील दोन दशकं इंटरनेट क्रांतीची म्हणून
ओळखली जातात. या क्रांतीमुळे बऱ्याच गोष्टी सहज साध्य झाल्या आहेत. मग ते मोबाइल
रीचार्ज करणं असेल अथवा पेमेंट करणं असेल. आता तर डिजिटल पेमेंट मध्ये देखील
भारतीय आघाडीवर आहेत.
या क्रांतिकारी बदलाचे
साक्षीदार तर आपण झालो आहोत, कारण आपण ह्या बदलाच्या लाटेवर स्वार झालो. यास मी
डिजिटल लीडरशिप (नेतृत्व) म्हणेन, जे आपण सोलापूरकर म्हणून नक्कीच केलं आहे. संगणक
शिक्षण असेल अथवा पारंपरिक शिक्षण असेल या दोन्ही मध्ये डिजिटल लीडरशिप आपण केली
आहे. पदव्युत्तर अभ्यास केंद्र ते विद्यापीठ असा प्रवास सर्वश्रुत आहे. यातच मुक्त
विद्यापीठा मार्फत दिले जाणारे शिक्षण देखील आता चांगले रुजले आहे. संगणक शिक्षणात
व्हिडिओ लेक्चर्स हा प्रकार आता इंटरनेट सहाय्याने आपण पाहतो पण पार अगदी
२००७-२००८ मध्ये व्हिडिओ लेक्चर्स तेही नव्या प्रोग्रामिंग स्किलचे मुक्त
विद्यापीठा मार्फत देऊ करण्यात आले होते.
इंटरनेटचा वापर न करता हे लेक्चर्स उपलब्ध करण्यात आले होते हे विशेष ! हे
देखील एक सोलापूरकर म्हणून आपण अनुभवलं आहे. कल्पना आणि निर्मिती हे शिक्षणाचे मुलभूत भाग आहेत तसेच नव्या उद्योगासाठी
देखील ते तितकेच महत्वाचे आहेत. आजची पिढी प्रगत आहे, या पिढीस सुरुवातीपासूनच टेक्नोलॉजीचा वापर करण्याची सवय
आहे, हा वापर फक्त योग्य दिशेने केला कि त्याची फळ मिळू
शकतात हे समजून सांगणे आवश्यक वाटते. नव्याने स्टार्टअप करणाऱ्या या पिढीस
“स्टार्टअप इन्क्यूबेटर” सपोर्ट सिस्टिम खूप प्रभावीपणे वापरता येऊ शकते. स्टार्टअप
इन्क्यूबेटर्स या अशा संस्था आहेत ज्या उद्योजकांना त्यांचा व्यवसाय विकसित
करण्यास मदत करतात, विशेषत: सुरुवातीच्या टप्प्यात. इन्क्यूबेटर सपोर्ट मध्ये
तांत्रिक सुविधा आणि सल्ला, नेटवर्क लिंकेज, को-वर्किंग स्पेस, लॅब सुविधा,
मार्गदर्शन, मेंटरिंग, सीड फंडिंग, यांचा
समावेश होतो. सुरुवातीच्या टप्प्यातील मार्गदर्शक म्हणून, इन्क्यूबेटर हे
स्टार्टअप ईको-सिस्टीमचा एक महत्वाचा भाग आहेत. भारत सरकारच्या स्टार्टअप योजनेत
इन्क्यूबेटरची महत्वाची भूमिका आहे. मला येथे नमूद करताना आनंद होतो आहे की असे
इन्क्यूबेटर्स आज सोलापूरात उपलब्ध आहेत.
परदेशी शिक्षण
घेण्यासाठी मार्गदर्शन सुविधा, असेल अथवा नोकरीच्या , स्वयं रोजगाराच्या संधी
असतील या साऱ्यात सॉफ्ट स्किल या विषयास अनन्य साधारण अस महत्व आहे. यासाठी देखील
नव्या शैक्षणिक धोरणानुसार सोलापुरातील महाविद्यालयात सोबतच खासगी संस्था मध्ये या
संबंधी विविध कोर्सेस उपलब्ध होत आहेत. ही समाधानाची बाब आहे. नव्या शाळा,
महाविद्यालय आणि बीपीओ, के पी ओ युनिट सोलापूरात चालू आहेत ज्यामुळे विद्यार्थी
मित्रांना रोजगाराच्या संधी येथेच सोलापुरात मिळत आहेत. नव्या शैक्षणिक धोरणानुसार
कौशल्य विकास साधताना विद्यार्थी मित्रांना क्रेडिट सिस्टिम सुरू होणार आहे.
त्यानुसार विद्यापीठ आणि काही निवडक ट्रेनिंग प्रोवायडर यांचे मार्फत क्रेडिट
ट्रान्सफर सुविधा विद्यार्थ्याना मिळणार आहे. अशी सुविधा सोलापुरात देखील
महाविद्यालय आणि कौशल्य विकास केंद्रा मार्फत पुरविली जाणार आहे.
१९९० च्या दशकात शिक्षण
घेत असलेली आमची पिढी ही संगणक आणि इंटरनेटच्या सुरुवातीच्या टप्प्याची साक्षीदार आहे.
१९९७–९८ च्या सुमारास सोलापुरात आयटी पार्क सुरू होणार असल्याच्या बातम्या
माध्यमांत गाजत होत्या. त्या काळात अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात असलेल्या
विद्यार्थ्यांसाठी ही बातमी आशेचा किरण होती. त्याकाळी तंत्रज्ञान पुढे गेले;
अपेक्षा मात्र अपूर्णच राहिल्या. त्यानंतरची पिढी—म्हणजे आजचे
पालक—नोकरी, स्थलांतर आणि संधींच्या शोधात मोठ्या शहरांकडे
वळली. आता तिसरी पिढी, आजचा विद्यार्थी वर्ग, बारावी, पदवी आणि नव्या करिअरच्या उंबरठ्यावर उभा
आहे. त्यांच्या हातात तंत्रज्ञान आहे, क्षमताही आहेत;
गरज आहे ती केवळ स्थानिक संधींची.
आज पुन्हा आयटी पार्कची चर्चा सुरू झाली आहे. हा केवळ एक प्रकल्प
नसून, तीन पिढ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची संधी आहे.
यावेळी निर्णय प्रत्यक्षात उतरले, तर सोलापूरच्या युवकांना
भविष्य शहराबाहेर शोधावे लागणार नाही—हीच या प्रवासाची खरी कसोटी ठरेल.
महाराष्ट्रातील वेगाने
विकसित होत असलेल्या शहरांपैकी सोलापूर हे कमी ऑपरेशनल खर्च,
प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सुधारित डिजिटल पायाभूत सुविधांमुळे
गुंतवणुकीसाठी आकर्षक ठरत आहे. शहरात दोन विद्यापीठे, अनेक
अभियांत्रिकी व तंत्र महाविद्यालये आणि विस्तृत कौशल्य विकास नेटवर्क कार्यरत असून
दरवर्षी आयटी व डिजिटल सेवांसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होत आहे. हाय-स्पीड फायबर
इंटरनेट, राष्ट्रीय महामार्ग , रेल्वे कनेक्टिव्हिटी,
आणि नवे विमानतळ तसेच तुलनेने कमी रिअल इस्टेट खर्च ही सोलापूरची
स्पर्धात्मक बलस्थाने आहेत. या पार्श्वभूमीवर नव्याने सुरू होणारा आयटी पार्क
बीपीओ, केपीओ, सॉफ्टवेअर सेवा, डेटा प्रोसेसिंग आणि स्टार्टअप्ससाठी योग्य प्लॅटफॉर्म ठरणार आहे. स्थानिक
टॅलेंटचा वापर, ऑपरेशनल कार्यक्षमता आणि दीर्घकालीन
विस्ताराच्या संधी यांचा संगम साधणारे सोलापूर, आगामी काळात
गुंतवणूकदारांसाठी एक विश्वासार्ह टेक्नॉलॉजी डेस्टिनेशन म्हणून पुढे येईल,
असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नक्कीच, सोलापूर हे संधींचे
शहर म्हणून विकसित होऊ शकतं थोड्या जाणीवपूर्वक प्रयत्नांची आवश्यकता आहे .
अमित बाळकृष्ण कामतकर
टीप: हा लेख दैनिक सकाळ वर्धापन दिन पुरवणी मध्ये २७ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित झालेला आहे.
एक विनंती- सोलापूर विकासाच्या दृष्टीने तुमच्याकडे कल्पना असल्यास नक्की कमेन्ट करावी.

सुंदर लेख सर
उत्तर द्याहटवा