फॉलोअर

फोनोग्राफ ते एम.पी.थ्री प्लेअर्स प्रवास - संगीत प्रेमींसाठी यादों का सफर


संगीत हा मनुष्याच्या आयुष्यातील अविभाज्य घटक, संगीता शिवाय आयुष्यच विचार करता येवू शकत नाही. हे संगीत रेकॉर्ड स्वरूपात आज आपण ऐकतो, वापरतो यामध्ये अनेक स्थित्यंतर अनुभवास आली आहेत. आज अगदी सहज पणे स्मार्ट फोनवर स्वत:चा आवाज रेकॉर्ड करू शकतो पण स्वत:चा आवाज रेकॉर्ड (ध्वनीमुद्रण) करणं आणि परत तो ऐकणं हि एक प्रकारची जादूचं ! हि जादुची अनुभूती सर्वप्रथम थॉमस एडिसन ने १८७७ मध्ये जगास करून दिली. पहिला फोनोग्राफ याच साली तयार झाला याचं प्रात्यक्षिक दाखवायला एडिसन यांना व्हाईट हाउस मध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. (माहिती स्त्रोत: इंटरनेट).फोनोग्राफ वर एकदाच ध्वनीमुद्रण व्हायचे,फोनोग्राफ च्या १० वर्षानंतर एमिल बर्लिनर याने ग्रामोफोन ची निर्मिती केली. आणि साधारण १९०० मध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामोफोन ची निर्मिती करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर १९०६ मध्ये व्हिक्ट्रोला मॉडेल, १९०८ साली डबल साईडेड रेकॉर्ड, १९२४ साली इलेक्ट्रीकल रेकॉर्ड आणि त्या नंतर १९४८ साली  एल.पी. (लॉंग प्लेयिंग रेकॉर्ड)- बॉलीवूड मध्ये याचा उपयोग होवू लागला, १९६२ साली मल्टी ट्रॅक अॅनालॉग रेकॉर्डिंग, १९६३ साली फिलिप्स या कंपनीने पहिली स्टीरीओ कॅसेट टेप बनविली. ८० च दशक येता येता कॉम्पॅक्ट डिस्क जपान मध्ये निर्मित झाल्या पण माझ्या माहिती प्रमाणे साधारण ९० च्या दशकात भारतात वापरण्यास सुरुवात झाली. बुश नावाच्या कंपनीने १९८९-९० साली पहिला सीडी प्लेयर भारतात विक्रीस उपलब्ध केला होता. मला आठवतं एखाद्या चित्रपटाच्या गाण्याची सी.डी. (कॉम्पॅक्ट डिस्क) यायची तेंव्हा त्यामध्ये जास्तीत जास्त ७४ मिनिटांची गाणी असायची (गाणं किती मोठं त्यावर एकूण गाण्यांची संख्या अवलंबून असायची) ,कालांतराने उपलब्ध झालेले एम.पी.३ प्लेयर्स नी तर संगीत दुनियेचं सगळं जगचं बदलून टाकलं. लाईव्ह शोज ची मजा काही औरच असते पण रेकॉर्डना देखील तेवढेच महत्व लोकांनी दिले आहे.
     म्युझिक प्लेयर्स कसे बदलत गेले याबद्दल हा इतिहास महत्वाची माहिती देतो पण घरात ऑडिओ टेप आला आणि कॅसेट्सनी घरात स्थान पक्क करायला सुरुवात केली. वापरायला सोपे आणि अगदी सहज प्ले करता येणारे प्लेयर्स हि बाजारात उपलब्ध झाले होते. एच.एम.व्ही, टिप्स, टी सेरीज, विनस, पॉलीग्राम (१९९९ नंतर युनिव्हर्सल म्युझिक कंपनी) हि काही प्रसिद्ध कॅसेट टेप बनविणाऱ्या कंपनीची नावे. या कॅसेट टेप्स नी संगीत आपल्या घरात आणलं. प्रामुख्याने हिंदी चित्रपट संगीताची आवड सर्वांना असतेच आणि हि संगीताची तृष्णा या कंपन्यांनी पूर्ण केली अस म्हणालो तर वावगं होणार नाही. घरातील एक अख्ख कपाट या कॅसेट टेप्स नी भरून राहिलं आहे, असाच अनुभव तुमचाही असेल, हो ना? अर्थात आवड तिथं सवड आणि यातूनच जडतो तो छंद, संगीत ऐकण्याचा ! जुने दिवस अजूनही आठवतात, एखादा चित्रपट प्रदर्शित (रिलीज) झाला आणि त्यातील गीत संगीत उत्तम असल्यास त्याच्या कॅसेट टेप्स लागलीच विकल्या जायच्या, आपल्याकडे ती कॅसेट टेप नसेल तर अगदी शेजाऱ्याकडून थोड्या वेळा साठी ती कॅसेट टेप आणायची आणि आपल्या प्लेयरवर चालवायची असा नियम असायचा. कारण त्यावेळी सोबत असायची ती फक्त आकाशवाणी आणि दूरदर्शन ची आता सारखं एफ.एम नाही कि केबल टी.व्ही. नाही.
सुरुवातीच्या काळात कॅसेट टेप मध्ये फक्त चित्रपटातील गाणीच असायची नंतर त्यामध्ये जाहिराती सुरु झाल्या, नवीन येणाऱ्या चित्रपटातील गाण्यांची झलक यामध्ये येवू लागली, या कॅसेट टेप च्या कव्हर डिझाईन चे आकर्षण वाढू लागले, मग त्यात त्याचं चित्रपटाचे मोठे डिझाईन असायचे आणि नवीन येवू घातलेल्या चित्रपटाचे देखील पोस्टर असायचे, खूप आकर्षण होतं याचं !! गाणं रेकॉर्ड करणं हा छंद आणि त्यास दिलेले व्यावसायिक स्वरूप देखील मी पाहिलं आहे. आमच्या सोलापुरात बाळीवेस भागात एक गृहस्थ आहेत त्यांनी त्यांच्या या छंदास व्यवसायात रुपांतरीत केले होते. त्यांच्या दुकानात गेल्यास संपूर्ण दुकान जुन्या-नव्या कॅसेट टेप्स ने अगदी भरगच्च असायचे.     काही दिवसापूर्वी कोण्या एका केबल वाहिनी वर ९० च्या दशकातील चित्रपट संगीतावर शो सुरु होता आणि गाणं सुरु झालं कि त्या गाण्याची माहिती दाखविली जायची ज्यामध्ये संगीतकार, गीतकार, गायक /गायिका आणि म्युझिक कंपनीचे नाव दाखविले जात होते ते पाहताना कॅसेट टेप्स च्या आठवणी जाग्या झाल्या आणि मग विचार सुरु झाला तो अगदी ग्रामोफोन ते एम.पी.३ प्लेयर्स पर्यंत. या लेखाच्या माध्यमातून प्रवास करीत असताना मन पुन्हा त्या आठवणी मध्ये रमून गेलं !!


अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर

तळटीप : तुम्ही सर्व प्रथम ऑडिओ टेप्स / ग्रामोफोन वर ऐकलेले गाणे  कमेंट करावं.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?