श्रवणीय उदित
उदित नारायण झा, आपण ज्यांना गायक उदित म्हणून ओळखतो, अनेक चित्रपटातील नायकांचे पडद्यावरील आवाज, उदित यांच्या आवाजात एक जादू आहे जी आजही त्यांच्याकडे आकर्षित करते,गाण कोणतही असो आवाज उदित यांचा असेल तर ते गाण आपसूकच ओठांवर कधी रुळतं आपल्यालाही कळत नाही. उदित यांचा जन्म १९५५ साली बिहार मधील बासी (एका मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे) या गावात झाला. १९७० मध्ये त्यांनी मैथिली,नेपाळी आणि भोजपुरी भाषेत गायन केले आणि ७० च्या अखेरीस जेंव्हा उदित मुंबई येथे आले तेंव्हा त्यांनी भारतीय विद्या भवन येथे सहा वर्ष शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले.बॉलीवूड मधील अनेक गायकांचे श्रद्धा स्थान, गुरुस्थानी असणारे श्री.मो.रफी हे यांचे गुरु, त्यांच्याकडे पाहूनच गायनाचे धडे गिरविणारे उदित, यांनी उमेदीच्या काळात नेपाळ रेडीओ वर देखील आपले योगदान दिले त्या नंतर १९८० साली मो.रफी यांच्या सोबत बॉलीवूड मधील त्यांचे पहिले गाणे गायले, हि संधी त्यांना संगीतकार राजेश रोशन यांनी “उन्नीस बीस” या चित्रपटासाठी दिली. याच दरम्यान किशोर दां सोबत देखील उदित यांनी गाणे गायले पण हा काळ त्यांच्या साठी खूप कठीण होता, एखाद्या स्ट्रगलरला जे काही करावं ते सर्व काही उदित यांनी केले.
उदित यांना खरा ब्रेक, अमाप प्रसिद्धी मिळाली ती आमीर खान च्या कयामत से कयामत तक या चित्रपटातील गाण्यांनी. या चित्रपटातील “पापा कहते है, बडा नाम करेगा” या गाण्याने रसिकांनी अक्षरक्ष: डोक्यावर घेतले, आणि बॉलीवूडला मिळाला एक नवा गायक सितारा ! या गाण्याने त्यांना पहिला फिल्म-फेअर पुरस्कार देखील मिळाला. तेथून उदित यांनी परत मागे वळून पाहिले नाही, एका पेक्षा एक सरस गाणी त्यांनी गायली ज्याचे साक्षीदार आपण सगळे आहोत. अल्का याग्निक आणि उदित हि जोडी संगीतकारांची फेव्हरीट जोडी होती, या जोडीने खूप लोकप्रिय गाणी दिली ज्यामध्ये मन, दिल चाहता है, राजा हिंदुस्थानी, धडकन, मोहरा अशा अनेक चित्रपटांची नावे सांगता येतील. या प्रत्येक चित्रपटातील गाण्यासोबत भावविश्व समृद्ध होण्याचा अनुभव माझ्या पिढीने घेतला आहे. या सोबत गोड आठवणी देखील डोकावतात ज्यामुळे या चित्रपटातील गाणी आजही तितक्याच आनंदाने ऐकली जातात. एव्हरग्रीन मेलडी !!
उदित यांच्या करिअर च्या चढत्या आलेखामध्ये प्रसिद्धी खूप होती पण पुरस्कारावर मात्र कुमार शानू यांचे नाव कोरले जायचे पण हि पुरस्कारांची साखळी १९९५ साली “मेहंदी लगा के रखना” या गाण्याने तोडली आणि तेंव्हाचा फिल्म-फेअर उदित यांना मिळाला. त्यानंतर चार राष्ट्रीय पुरस्कार आणि पाच फिल्म-फेअर पुरस्कार उदित यांचे नावे आहेत. भारत सरकार कडून २००९ मध्ये पद्मश्री आणि २०१६ मध्ये पद्म भूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. रसिक श्रोत्यांची मने जिंकणाऱ्या या गायकाने संगीतकारांमध्ये देखील स्वत:चे अढळ स्थान निर्माण केले आणि ए.आर.रेहमान, जतीन-ललित, अनु मलिक, नदीम-श्रवण, राजेश रोशन,हिमेश रेशमिया,आनंद-मिलिंद, शंकर-एहसान-लॉय, अजय-अतुल अशा अनेक दिग्गज संगीतकारांची पसंती म्हणून उदित यांचे नाव कायम अग्रेसर राहिले. बॉलीवूड मध्ये तीन दशके (साल अनुक्रमे ८०,९०,२०००) फिल्म-फेअर पुरस्कार घेणारे उदित यांना एकमेवाद्वितीय म्हणावे लागेल. बीबीसी च्या आल टाईम फेव्हरीट टॉप ४० प्ले लिस्ट मध्ये उदित नारायण यांनी गायलेली २१ गाणी आहेत, ज्या मध्ये पापा कहते है, पहला नशा, परदेसी-परदेसी, ताल से ताल मिला, जादू तेरी नजर यांचा समावेश होतो. ९० साली आशिकी चित्रपटाने कमाल केली या चित्रपटात उदित यांनी गायलेलं एकच गीत आहे, ते ही आज तितकच लोकप्रिय जेवढी इतर गाणी लोकप्रिय आहेत.
अपयशामुळे निराश होवून न जाता त्यावर विजय मिळवावा याविषयी एका टी.वी.शो वरील संगीताच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलेला किस्सा स्फूर्तीदायक आहे. “रुक जा ओ दिल दिवाने” या गाण्याच्या रेकॉर्डिंग होते, उदित यांना दुपारी दोन ची वेळ देण्यात आली होते पण त्यांना स्टुडीओ मध्ये पोहोचायला संध्याकाळचे सहा वाजले, सगळी मंडळी कंटाळलेली होती, संगीतकार जतीन-ललित आणि निर्देशक यश चोप्रा यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. रेकॉर्डिंग सुरु झाले पण ज्याप्रकारे पडद्यावरील सिच्युएशनला साजेसं गाण व्हायला हवं होते तस गाणे होईना तीन चार टेक झाले पण उदित ना संगीतकाराच्या पसंतीस पडेल असे गाणे काही केल्या गाता येईना. शेवटी त्यांनी स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतले आणि थोड्यावेळाने बाहेर येवून यश जी ना म्हणाले “मला एक शेवटची संधी द्या”, यश जी नी होकार दिला आणि तीन कडव्याचं गाणं एकाच टेक मध्ये उत्तमरित्या रेकॉर्ड झालं जे आजही श्रवणीय आहे, एव्हरग्रीन आहे.
आज उदित यांच्या विषयी लिहिण्याचे कारणही थोडं खासच आहे,ह्रितिक रोशनचा मागील वर्षी एक चित्रपट आला, या चित्रपटातील एका गीतात ६३ वर्षीय उदित यांनी आवाज दिला आहे, मन प्रसन्न करणारा आवाज कानावर पडतो आणि आपसूकच मी “आहा !! उदित !!!- या वयात देखील उदित यांचा आवाज अत्यंत श्रवणीय आहे, यापाठीमागे त्यांची संगीताची साधना, कामाप्रती निष्ठा, प्रामाणिक पणा दिसून येतो. जे काम करायचं ते अगदी १००% मनापासून, अगदी सगळं विसरून !!
उदित
यांचा गायन प्रवास असाच निरंतर सुरु राहो आणि आपल्याला एकापेक्षा एक सरस, श्रवणीय
गाणी ऐकायला मिळोत यासाठी त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा