पंडित हृदयनाथ मंगेशकर- अलौकिक बुद्धिमत्ता
लिए
सपने निगाहों में
चला
हूँ तेरी राहों में
ज़िन्दगी
आ रहा हूँ मैं......
१९८४ मध्ये प्रदर्शित झालेला “मशाल” हा यश चोप्रा यांचा चित्रपट,या चित्रपटात
अनिल कपूर यांच्यावर चित्रित झालेलं सुंदर गीत, जावेद अख्तर यांचे बोल, गायलं होतं
किशोरदा नी आणि संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी..... एका नवीन आयुष्यास
भेटायला निघालेला युवक ज्याने पुढील आयुष्य चांगल्या मार्गाने जगण्याचा संकल्प
केलेला असतो, चित्रपट सुपरहिट होता आणि चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. मग
ते “मुझे तुम याद करना और”, असेल अथवा “होली आयी रे”, असेल सगळी गाणी अगदी मिडास
टच !! म्हणूनच “ओल्ड इज गोल्ड” !! हिंदी चित्रपट सृष्टीत पंडितजीनी इतरही काही
चित्रपट केले ज्यामध्ये लेकीन, माया मेमसाब, लाल सलाम, धनवान यांचा उल्लेख करता
येईल.
शास्त्रीय संगीताची परंपरा असलेल्या घरात २६ ऑक्टोबर १९३७ मध्ये पंडितजींचा जन्म झाला, त्यांच्या वडीलांचं निधन झाल तेंव्हा पंडितजी अवघ्या चार वर्षाचे होते. घरात कानावर पडणारा रियाज त्यातूनच संगीत शिकण्याची आणि त्यात मास्टरकी मिळविण्याची इच्छा न होण हे होवूच शकत नाही. तो काळ हि खूप वेगळा होता, संगीत शिकविण्यासाठी क्लासेस, फीज असा प्रकार नव्हता. त्यांच्या घरा शेजारी राहणाऱ्या गुणी गायकांकडून त्यांनी शिक्षण घेतलं. पंडितजी साधारण ११ वर्षाचे असतील त्यावेळी त्यांची आणि उस्ताद आमीर खान यांची भेट झाली. बैजू बावरा या चित्रपटात त्यांचाही पहिला परफॉर्मन्स होता आणि त्यांना तनपुरा वाजविण्याचे ज्ञान असणारा सहकारी हवा होता, अशाप्रकारे पंडितजी आणि उस्ताद आमीर खान यांची भेट झाली आणि पुढे जवळपास दोन दशकं पंडितजींनी त्यांच्याकडे संगीताचे धडे गिरविले. संगीताची उत्तम जाण आणि साहित्य वाचण्याच्या आवडीने पंडितजींचा शास्त्रीय संगीताकडे कल वाढला असे ते मानतात. शिवाय त्यांचा मित्र परिवार हा त्यांच्यापेक्षा वयाने मोठा (साधारण १०-१५ वर्षाने) असलेलाच जास्त होता त्यामुळे समवयस्क मित्रांबरोबर खेळणं, बागडणं त्यांनी कधी केलच नाही. एखाद्या हिरा जसा पैलू पाडण्यासाठीच तयार होतो अगदी तसचं पंडितजींच आयुष्य पुढे जात होतं.
१९५५ साली एच.एम.व्ही. ने एका खासगी
अल्बम साठी पंडितजींना विचारलं आणि त्यांनी हा पहिला ब्रेक त्यांच्या पहिल्या गुरु
लता दीदी सोबत रेकॉर्ड केला, “नीस दिन बरसत नैन हमारे”,हे गीत त्याकाळी तुफान
लोकप्रिय झालं होतं. जवळपास सगळेच रेकॉर्ड या अल्बम ने मोडले होते. मराठी चित्रपट
सृष्टीत पंडितजींचा प्रथम चित्रपट “आकाशगंगा” या नंतर एकापेक्षा एक सरस अशी अवीट
गोड गाणी पंडितजींनी विविध चित्रपटातून दिली त्यामध्ये प्रामुख्याने संसार, जानकी,
जैत रे जैत, उंबरठा, निवडुंग या चित्रपटांचा समावेश करता येऊ शकेल. मीराबाई यांचे
एक भजन आहे “चला वाही देस” हे भजन पंडितजींनी लता दीदी यांच्या आवाजात रेकॉर्ड
केलं आणि आश्चर्य म्हणजे हे भजन भारतापेक्षा पाकिस्तान मध्ये जास्त लोकप्रिय झालं
होतं. या नंतर या दोघांनी “मीरा सूर कबीरा” या नावाने अल्बम केला जो अर्थातच मीरा-सूरदास
आणि कबीर यांच्या भक्तीपर कवितांवर आधारित होता. हा अल्बम करण्यापूर्वी पंडितजींनी
हिंदी भाषेचा अभ्यास पंडित नरेंद्र शर्मा यांचेकडे पूर्ण केला.
एका मुलाखतीत पंडितजींनी सांगितलं होतं
कि ते स्वत: आणि दीदी अध्यात्माकडे झुकलेले असल्याने त्यांनी विविध संस्कृत श्लोक
संगीत बद्ध केले. “श्रीमद् भगवत गीता”, संपूर्ण ज्ञानेश्वरी पूर्णपणे संगीतबद्ध करण्याचं श्रेय पंडितजींच, गीतेत
श्लोकाच्या अर्थाप्रमाणे राग बदलतात हे वैशिष्ट्यपूर्णच म्हणावं लागेल. ज्ञानेश्वर
माऊली चा “मोगरा फुलला” हा गीत संग्रह ज्यावर आशाताई आणि दीदी, सुरेश वाडकर, यांचा
स्वरसाज सगळं अगदी लाजवाब !! हि वाट दूर जाते, उष:काल होता होता, दयाघना, त्या फुलांचा
गंधकोशी, मेंदीच्या पानावर , आहा !! सारं कांही एक से बढकर एक !! तुम्हीही या गीतांचा
मनसोक्त आनंद घेतला असावा. आजही हि गाणी चिरतरुण आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी
रचलेलं “जयोस्तुते” या गीतास दिलेला स्वरसाज भारत मातेस वंदन करीत सर्व भारतीयांना
प्रेरणाच देते. गालिब यांच्या गझलना देखील स्वरसाज पंडितजींनी दिला पण हे
करण्यापूर्वी उर्दू शिकणे आणि ती समजून घेणे आवश्यक होतं, त्याकाळी उस्ताद मोहब्बत
खान लता दीदी यांना उर्दू शिकविण्यासाठी यायचे, त्यांच्याकडूनच उर्दू चे शिक्षण
पंडितजींनी घेतलं.
भावगीतं, भक्तीगीतं, देशभक्तीपर गीतं,
कोळी गीतं, अध्यात्मिक, गझल , हिंदी चित्रपट सृष्टीत सिच्युएशन नुसार दिलेली
मनस्पर्शी गीतं, धार्मिक प्रवचने, मराठी, हिंदी, संस्कृत, उर्दू प्रत्येक भाषेत पंडितजींनी
दिलेलं योगदान फार मोठं आहे. पंडितजींचे योगदान पूर्ण अभ्यासपूर्ण आणि काळाची गरज
ओळखून केलेलं आहे हे जाणवतं. श्रोते मंडळींची नस ओळखणारे पंडितजी एका मुलाखतीत
म्हणाले, “मी माझ्या श्रोत्यांच्या नाडीवर हात ठेवून गातो”, खरही आहे हे.
पंडितजींना पुढील वाटचालीसाठी, निरोगी
आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा, त्यांनी संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानास मानाचा
मुजरा !!
अमित बाळकृष्ण
कामतकर
सोलापूर
इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं
x
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा