फॉलोअर

सॉफ्ट स्किल्सचे महत्व

 


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला सॉफ्ट स्किल्स आवश्यक आहेत. ही कौशल्यं  अचानक महत्वाची झाली का? पूर्वी ही कौशल्यं  लागत नव्हती आणि अचानक यांची मागणी वाढली ? असं काही नाही, तर याची गरज पूर्वीही होतीच फक्त त्याचे महत्व मागील पाच-दहा वर्षात वाढलेलं आपल्याला दिसतं आहे. करिअरची निवड करताना यास अनन्य साधारण असे महत्व आहे आणि ते यापुढेही राहील. विद्यार्थ्यानी या गोष्टीस प्राधान्याने आत्मसात करणे गरजेचे बनले आहे. असे कुठलेच क्षेत्र नाही जिथे सॉफ्ट स्किलची गरज तुम्हास भासणार नाही. शैक्षणिक आणि व्यावसायिक यशासाठी सॉफ्ट स्किल्स महत्वाची भूमिका पार पाडतात. सॉफ्ट स्किल्स तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हास उत्कृष्ट मदत करतात. प्रत्येक व्यक्तीचे स्वत:चे असे जग असते, या जगात त्यास सांभाळून घेणारी मंडळी आजूबाजूस असतात पण जेंव्हा करिअरचा प्रश्न येतो अथवा जॉबला जाण्याचा प्रश्न येतो तेंव्हा सॉफ्ट स्किल्स बाहेरील जगास सामोरे जाण्यासाठी आणि सहकारी मंडळीं सोबत सहयोगी पद्धतीने कार्य करण्यासाठी आवश्यक ठरतात.

          सॉफ्ट स्किल्स ज्यास आपण सामाजिक कौशल्य असेही म्हणूयात, खरे तर ही गैर-तांत्रिक कौशल्ये आहेत. ही कौशल्य म्हणजे वैयक्तिक मूल्ये, आणि परस्पर कौशल्य आहेत जी एखाद्या व्यक्तीची प्रोजेक्ट टीम मधील इतरां सोबत काम करण्याची क्षमता निर्धारित करतात. या कौशल्यां मध्ये प्रभावी संवाद, नेतृत्व आणि संघकार्य कौशल्य यांचा समावेश होतो, समस्या सोडविण्याची क्षमता, पुढाकार, स्वत: आणि इतरांसाठी प्रेरणादायी काम करण्याची वृत्ती, नैतिकता आदींचा समावेश होतो. आपण तांत्रिक दृष्ट्या सक्षम असणे मुलत: गरजेचे आहेच पण सोबतच आपल्याकडे विविध कौशल्य असणे तेवढेच गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीस स्वत:कडील कल्पना व्यक्त करण्याची आणि संवाद साधण्याची क्षमता असणे त्यास इतरांपासून वेगळे दिसण्यात मदत करते. तुमचे प्रभावी संवाद इतरांशी संबंध सुधारण्यास फक्त मदत करतील असे नाही तर तुमची कार्यक्षमता सुधारण्यास देखील तेवढीच मदत करतात.

          काही सॉफ्ट स्किल्स ही उपजत असतात असे मी मानतो. एखाद्या कडे उत्तम संभाषण कला असते तर एखाद्याकडे स्टेज वरुन उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करण्याचे कौशल्य असतं. पण या कौशल्यांना देखील धार करण्याची गरज अशा व्यक्तिंना पडू शकते पण मी म्हणेन अशा व्यक्तिनि खास वेळ देऊन कौशल्यांना जपावं. “अनुभव” हे असं शस्त्र आहे की जे प्रत्येकास मिळते, त्यासाठी वेळ आणि श्रम खर्ची घालावे लागतात, हे वेगळं सांगणं अपेक्षित नसावं पण येथे नमूद करू इच्छितो की अनुभवातून देखील बरचं काही शिकण्यासारखं असतं ते आपण शिकावं आणि स्वत:मधील नव्या व्यक्तिमत्वास ओळखावं. लिंक्डइन संशोधन आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (फ्यूचर ऑफ जॉब्स) एका अहवालानुसार २०२५ पर्यन्त, समस्या सोडविणे, क्रीटिकल थिंकिंग, सर्जनशीलता (creativity), लोकांचे व्यवस्थापन आणि भावनिक बुद्धिमत्ता ही कामाच्या ठिकाणी आवश्यक असलेली सर्वात महत्वाची कौशल्ये असतील.

          थोडक्यात सॉफ्ट स्किल्स कामाच्या ठिकाणी तुमच्या यशासाठी, तुमच्या कंपनीच्या यशासाठी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या वैयक्तिक जीवनासाठी आवश्यक आहेत.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?