तेरे बिना जिंदगी से - भावनांचा संयत आविष्कार

 

"तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं” गाण्याच्या पार्श्वभूमीवर विरह, शांत स्वीकार आणि आठवणींचा भावनिक प्रवास

एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे दोन जीव, नेहमीप्रमाणे (टिपिकल बॉलीवुड स्टाइल) वडिलांचा विरोध, कारण काय तर वडील राजकारणातील मात्तबर व्यक्ति. पक्षात त्यांचा शब्द म्हणजे प्रमाण ! अशा परिस्थिती मध्ये मुलगी बंड करते आणि त्या सामान्य व्यक्ति ज्याच्यावर तिचे जिवापाड प्रेम असतं त्याच्या सोबत लग्न करते. अर्थात लग्नानंतर वडील मुलीच्या संपर्कात राहतात आणि तिला राजकारणात घेऊन जाण्यात यशस्वी होतात. समाजसेवा, वडिलांचा वारसा पुढे नेण्यात आणि राजकारण या पाशात मुलगी पुरती अडकून जाते, दोन जीव वेगळे होतात. योगा –योगाने साधारण नऊ वर्षाने एका हॉटेल मध्ये दोघे पुन्हा भेटतात ! आणि त्यांच्या भेटीचा सिलसिला सुरू होतो. एव्हाना तुम्हाला चित्रपटाचे नाव लक्षात आलं असेल. हो, अगदी बरोबर ओळखलं तुम्ही, “आंधी”, याच चित्रपटाची कथा आहे ही. मुलीचे कर्तव्य, पक्षाचे स्वामित्व हे दोन्ही एका पारड्यात आणि नवरा, घर दुसऱ्या  पारड्यात, अर्थात कथेत अभिनेत्रीचे पारडे पक्ष आणि राजकारण याकडे झुकलेलं दाखविण्यात आले आहे.

            कुणासही त्याच्या आयुष्यात, त्याने ज्याच्यावर जिवापाड प्रेम केले पण वडिलांच्या हट्टाखातर स्वत:च्या मना विरुद्ध जाऊन, राजकारण स्वीकारून आयुष्यात हातात काय मिळालं तर काहीच नाही. याची जाणीव आयुष्याच्या प्रवासात जेंव्हा तोच व्यक्ति पुन्हा भेटतो तेंव्हा तीव्रतेने होते. मनाची घालमेल, पुन्हा हवा हवासा वाटणारा जोडीदराचा स्पर्श, सहवास सारं काही परत हवं असतं पण समाज ! आणि त्याने घालून दिलेली संहिता, या दोघांच्या पुन्हा आड येते. विरह वेदना, सहवास न मिळाल्याचे दु:ख आणि यामध्ये सरलेले आयुष्य ! ज्याचा कोणत्याही प्रकारे रोल बॅक शक्य नाही. योगायोगाने पुन्हा भेटलेला साथीदार आणि त्याच्या समोर मन मोकळे करण्यासाठी मिळालेला कालावधी फार तोडका आहे. मिळालेल्या सहवासात असलेल्या मर्यादेची जाणीव, सार काही पडद्यावर पहायला मिळतं. हिंदी चित्रपटसृष्टीच्या

Aandhi चित्रपटातील संजीव कुमार आणि सूचित्रा सेन यांची भावनिक पुनर्भेट, विरह आणि अपूर्ण प्रेम व्यक्त करणारा क्षण

सुवर्णकाळातील एक अविस्मरणीय रत्न म्हणजे “तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं हे गाणं”. आंधी या चित्रपटात साकारलेलं हे गीत केवळ स्वर आणि शब्द यांचा संगम नाही, तर मानवी भावनांच्या गूढ गाभ्याला स्पर्श करणारी एक अंतर्मुख अनुभूती आहे. या गाण्याच्या आत्म्याला जिवंत करणारा स्वर म्हणजे किशोर कुमार आणि लता दीदी यांचा स्वर्गीय आवाज, आणि त्या स्वरांना भावनांची पंखं देणारं संगीत म्हणजे आर. डी. बर्मन उर्फ पंचम यांची अद्वितीय रचना. सशक्त अभिनयाचे धनी “हरिभाई” अर्थात संजीव कुमार, सूचित्रा सेन सोबतीला गुलजार आणि पंचम ! रसिक श्रोत्यांना आणखी काय हवं ? ही पूर्ण भट्टी एवढी परफेक्ट आहे की, पैसा वसूल !

            लता दीदी यांनी अनेक गाण्यांना स्वरसाज चढवलेले आहेत पण हे गीत मला जास्त आवडतं, अर्थात त्याच मूळ कारण वेगळंच आहे, वेगळंच म्हणजे किशोर दा ! संपूर्ण गाणं लता दीदीनी डोळ्या समोर सजीव केलं आहे, जणू काही गीताचे बोल त्यांच्याच नशिबी आले आहेत, अगदी त्याचप्रमाणे त्याची डिलिव्हरी झालेली आहे. पण ज्या क्षणी किशोरचा आवाज कानी येतो, तो क्षण , तुमचे पूर्ण भान पूर्णपणे हरवून जाते. असा माझा अनुभव आहे. आजच्या रीयालिटि शो मधील ट्रेंडींग शब्द  “गुजबंप्स” !  गाणे शूट करताना किशोरने गायलेल्या “अंतरा”, अगोदर एक संवाद आहे, तो संजीव कुमार आणि सूचित्रा सेन यांच्याच आवाजात आहे. किशोरदाचा आवाज हा केवळ ऐकण्याचा अनुभव नसून तो एक भावनिक प्रवास आहे. “तेरे बिना जिंदगी…” या गीतात त्यांनी व्यक्त केलेली वेदना, स्वीकार आणि शांत समर्पण ही मनाच्या अतिशय सूक्ष्म स्तरांवर पोहोचणारी आहे. त्यांच्या आवाजातील हलकी कंपने, शब्दांमधील विराम, आणि प्रत्येक ओळीतून झिरपणारी तळमळ—हे सगळं श्रोत्याला स्वतःच्या आठवणींच्या खोल कप्प्यांत घेऊन जातं. किशोरदां च्या गायकीची खासियत म्हणजे त्यांनी भावना कधीही अतिनाट्यमय केल्या नाहीत; उलट त्या इतक्या सहजतेने व्यक्त केल्या की त्या अधिक खऱ्या वाटतात. या गाण्यातील त्यांचा स्वर म्हणजे जणू एका अपूर्ण प्रेमकथेचा शांत, पण ठाम स्वीकार.

दुसरीकडे, पंचम यांचं संगीत म्हणजे भावनांना आकार देणारं अदृश्य शिल्प. त्यांच्या धूनमध्ये एक विलक्षण साधेपणा आहे, पण त्याचवेळी ती अत्यंत सूक्ष्म आणि बहुपेडी आहे. “तेरे बिना जिंदगी…” मध्ये त्यांनी वापरलेली मृदू वाद्यरचना, संथ लय, आणि विरळ स्वरांची मांडणी ही गाण्याच्या आशयाला पूर्ण न्याय देते. संगीत इथे केवळ साथ देत नाही, तर ते भावनांना अधोरेखित करतं, त्यांना अधिक गहिरं बनवतं. पंचम यांची ही खासियत—की ते गाण्याच्या शब्दांशी इतकं एकरूप होतात की संगीत आणि शब्द यांच्यातील सीमारेषाच पुसट होते.

या गाण्याची खरी ताकद म्हणजे त्यातील संयम. ना अतिरेकी वेदना, ना अतिशयोक्तीपूर्ण आनंद—फक्त एक शांत स्वीकार. “कोई शिकवा तो नहीं…” या ओळींमध्ये दडलेली जीवनाची तत्त्वज्ञानात्मक जाणीव, आणि त्याला साथ देणारा किशोरदांचा  स्वर, श्रोत्याच्या मनात एक दीर्घकाळ टिकणारी प्रतिध्वनी निर्माण करतो.

शेवटी, “तेरे बिना जिंदगी…” हे गाणं म्हणजे स्वर, शब्द आणि संगीत यांचा एक अद्वितीय संगम आहे. किशोर दांच्या स्वरांनी त्याला आत्मा दिला, तर आर. डी. बर्मन यांच्या संगीतातून त्याला शाश्वतता प्राप्त झाली. या गीताला शब्दांची जादू लाभली ती गुलजार यांच्या लेखणीतून. त्यांच्या काव्यातील सूक्ष्मता, रूपकांची नाजूक गुंफण आणि भावनांचा संयत आविष्कार “तेरे बिना जिंदगी…” ला एक वेगळंच अधिष्ठान देते. साध्या शब्दांत जीवनातील अपूर्णता, विरह आणि स्वीकार यांचा गहिरा अर्थ त्यांनी इतक्या सहजतेने मांडला आहे की प्रत्येक ओळ मनात दीर्घकाळ घुमत राहते. गुलजार यांच्या शब्दांमुळे हे गाणं केवळ ऐकण्याचा नाही, तर अंतर्मनात जगण्याचा अनुभव बनतं.

 हे गाणं ऐकताना वेळ थांबतो, आणि मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं—जिथे केवळ भावना असतात, आणि त्या व्यक्त करण्यासाठी शब्दांचीही गरज भासत नाही.

सिंपली ग्रेट !

 

अमित बाळकृष्ण कामतकर

ता. क. या गीता विषयी तुमचा अनुभव कमेन्ट मध्ये नक्की सांगा-


Image 1: Gemini;  Image 2: Google


टिप्पण्या

  1. अप्रतिम लेखन, ज्या लोकांनी आंधी पाहिला आहे त्यांना हे सर्व जाणवेल, आपण वर्णन केलेल्या गाण्याचे शब्द न शब्द, भावना ते अनुभवतील, खुप धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

डिजिटल लीडरशिपकडे वाटचाल करणारे सोलापूर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून शिकायचे लाइफ स्किल्स