कचऱ्यातील देव आणि हरवलेले संस्कार

 

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडलेली देवप्रतिमा आणि तिच्याकडे पाहणारा विचारमग्न व्यक्ती – श्रद्धा, संस्कार आणि पर्यावरणावरील प्रश्न.

"गरज सरो आणि ------ मरो"  ही म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. गरज असेपर्यंत एखाद्याचा सन्मान करायचा आणि काम झालं की त्याला विसरून जायचं, असा तिचा साधा अर्थ. आतापर्यंत मला वाटायचं की ही म्हण फक्त माणसांच्या व्यवहारापुरती मर्यादित आहे. पण हल्ली आजूबाजूला दिसणारी काही दृश्यं पाहिली की जाणवतं—या म्हणीच्या कक्षेत आता देवही आला आहे.


पहाटे देवासमोर हात जोडणारे, संकटात नवस करणारे, यश मिळाल्यावर प्रसाद वाटणारे आणि प्रत्येक शुभकार्याची सुरुवात देवाच्या स्मरणाने करणारे आपणच. पण काही दिवसांनी तोच देवाचा फोटो कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, रस्त्याच्या कडेला, झाडाखाली किंवा नदी-तलावाच्या किनाऱ्यावर पडलेला दिसतो. श्रद्धेचा हा शेवट पाहिला की मन सुन्न होतं.

घरात नवीन देव्हारा आला, नवीन फ्रेम आली, कॅलेंडर बदललं किंवा जुनी प्रतिमा फिकी झाली की जुन्या प्रतिमेचं काय? अनेक जण "विसर्जन" या नावाखाली ती नदीत, तलावात किंवा एखाद्या ओसाड जागी ठेवून मोकळे होतात. काहीजण तर सरळ कचऱ्यात टाकतात. हेतू कदाचित अपमानाचा नसतो; पण कृती मात्र अपमानास्पदच ठरते.


देव प्रतिमेत नसतो, हे तत्त्वज्ञान सांगतं. पण त्या प्रतिमेत आपली श्रद्धा असते, आपल्या भावना असतात, आपल्या प्रार्थना गुंतलेल्या असतात. ज्या प्रतिमेसमोर आपण डोळ्यात पाणी आणून प्रार्थना केली, मुलांच्या यशासाठी हात जोडले, आजारपणातून मुक्तीसाठी नवस केले, तीच प्रतिमा काही दिवसांनी चिखलात पडलेली दिसावी, यापेक्षा मोठी विसंगती कोणती?

याहूनही गंभीर बाब म्हणजे पर्यावरणाची. नदी, तलाव आणि ओढे हे आपल्या संस्कृतीचे जीवनस्रोत आहेत. त्यांना आपण "माता" म्हणतो. पण त्यांच्याच पात्रात प्लास्टिकच्या फ्रेम, काच, रंगीत कागद आणि इतर पूजासाहित्य टाकून त्यांना प्रदूषित करतो. श्रद्धेच्या नावाखाली निसर्गाचा अवमान करणे, हा धर्माचा भाग कधीच असू शकत नाही.

प्रश्न फक्त देवाच्या फोटोचा नाही; प्रश्न आपल्या मानसिकतेचा आहे. आपण वस्तू बदलतो तशी श्रद्धेची प्रतीकंही बदलू लागलो आहोत. वापर संपला की बाजूला ठेवायचं, ही ग्राहक संस्कृती आता देव्हाऱ्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे श्रद्धेची जागा सवयीने घेतली आहे आणि सन्मानाची जागा सोयीने.


यावर उपायही कठीण नाही. समाजातील मंदिरे, गणेश मंडळे, धार्मिक संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांनी जुन्या देवप्रतिमा आणि पूजासाहित्य संकलन केंद्र सुरू करावीत. पर्यावरणपूरक आणि सन्मानपूर्वक विल्हेवाटीबाबत जनजागृती व्हावी. घराघरांतही मुलांना हे संस्कार दिले पाहिजेत की देवाची प्रतिमा ही कचरा नसून श्रद्धेचे प्रतीक आहे.

एकदा एका लहान मुलाने आपल्या वडिलांना विचारले, "बाबा, कालपर्यंत ज्यांना तुम्ही रोज नमस्कार करत होतात, त्यांना आज कचऱ्यात का टाकत आहात?" त्या वडिलांकडे उत्तर नव्हते. खरं तर हा प्रश्न त्या एका वडिलांना नव्हे, तर आपणा सर्वांना आहे.


देवाला सोन्याचा मुकुट नको असतो, त्याला आपल्या मनातील आदर हवा असतो. मोठमोठे हार, महागडी सजावट किंवा भव्य पूजा यापेक्षा श्रद्धेचा सन्मान अधिक मौल्यवान असतो. देवाला आपण देव्हाऱ्यात किती उंच स्थान दिलं, यापेक्षा आपल्या वागण्यात त्याच्याविषयी किती आदर आहे, हे अधिक महत्त्वाचं आहे.

आज गरज संपली की माणूस माणसाला विसरतो, याची खंत आपण व्यक्त करतो. पण आता तर गरज संपली की देवाच्या प्रतिमेलाही विसरण्याची वेळ आली आहे. ही केवळ देवप्रतिमेची विटंबना नाही; हा आपल्या संस्कृतीचा, आपल्या संस्कारांचा आणि आपल्या कृतज्ञतेचा आरसा आहे.


"देवाला कचऱ्यात टाकणारे आपण, उद्या आपल्या संस्कारांनाही अशाच कचऱ्यात टाकणार नाही ना?"

आणि एक संकल्प करूया...


देव्हारा बदलला तरी चालेल... फोटो बदलला तरी चालेल... पण श्रद्धेचा सन्मान कधीही बदलता कामा नये. कारण देवाची प्रतिमा फेकताना आपण प्रत्यक्षात देवाला नाही, तर आपल्या संस्कृतीला आणि संस्कारांनाच दूर फेकत असतो.


विचार करा- व्यक्त व्हा. 

 

अमित बाळकृष्ण कामतकर


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

डिजिटल लीडरशिपकडे वाटचाल करणारे सोलापूर

सोलापूर आणि आयटी पार्क : तीन पिढ्यांच्या प्रतीक्षेचा अंत कधी?