‘अहंकार’ हा सोडूनी द्यावा
लहान मुले म्हणजे देवा घरची फुले म्हणतात, ते उगीच नाही, लहान मुलांमध्ये जी निरागसता असते ती आहे तशीच राहत नाही व्यक्ती मोठा होईल तसे हि लोप पावत जाते आणि त्याची जागा “इगो” अर्थात अहंकाराने व्यापली जाते. हा “इगो” कुठेच थारा लागू देत नाही पण माणूस त्यास खूप जपतो. लहान मुलं भांडतात पण लागलीच दोस्तीही होते तसे मोठ्यांचे होते का? याचे उत्तर नकारार्थीच मिळते, असे होण्याचे कारण “इगो”, हा भावच मुळी लागलीच विचार व्यापून टाकतो, माणसास दुसरे काही सुचतंच नाही असे म्हणा हवे तर, मग हा “इगो” घेवून माणूस जिकडे जाईल तिकडे मिरवीत असतो, समर्थांनी दास बोधात कुविद्या लक्षण सांगताना दुसऱ्या दशकातील तिसऱ्या समासात गर्व, ताठा, अहंकार यांचा उल्लेख केला आहे आणि यापासून दूर राहण्याचा मौलिक सल्ला दिला आहे. याकडे लक्ष वेधण्याचे कारण म्हणजे जे जे सोडून देण्यास सांगितले आहे ते ते मनुष्यप्राणी अगदी घट्ट धरून ठेवतो आणि त्याचा त्रास स्वत:ला करून घेतो (अपवाद वगळता).
मला वाटतं “इगो”च वर्गीकरण करावं, हे वर्गीकरण करताना त्यास सामोरे कसे जावे याकडे लक्ष देण्याची गरज
आहे. एकदा का आपणांस हे लक्षात आलं कि यास सामोरे कसे जावे तर तो सांभाळणे सोईचे
होईल आणि त्यामुळे नाती तुटण्यास प्रतिबंध होईल. अर्थात असा प्रयत्न सर्वांनी करून
पाहणे इष्ट होईल तरच सुफळ संपूर्ण म्हणता येईल. काय करावं तर “इगो” ला तीन प्रकारात विभागावं, पहिला प्रकार “प्रौढ”, दुसरा “पालक”, आणि तिसरा “छोटसं मुल” असे केल्याने बऱ्याच गोष्टी साध्य होतील असे वाटते. एक महत्वाचं म्हणजे
रिलेशन्सची जपणूक होण्यास त्याचा फायदा होईल.
प्रौढ अर्थात अॅडल्ट इगो, या प्रकारा मध्ये शब्दाला शब्द लागतो आणि वाद होतो, कारण दोघेही “इगो”ला सांभाळणारेच असतात, कुणी माघार घ्यायची हा मोठा प्रश्न असतो, त्यामुळे या प्रकारात वाद वाढण्याची जास्त शक्यता असते. “तू खूप शहाणा आहेस”, रवि राजेश ला म्हणाला, यावर राजेश लागलीच उत्तर देतो, “आहेच शहाणा, तुझ्यासारखा नाही,” यावर रवि म्हणतो, “माझ्यासारखा म्हणजे”, काय म्हणायचं आहे तुला, स्पष्ट बोल, आणि संवादाचे वादात कधी रुपांतर होते हे दोघांनाही समजत देखील नाही. हे टाळण शक्य आहे का? तर हो, त्या अगोदर पुढील इगो चे प्रकार पाहूयात.
पॅरेंट इगो
पालकत्वाची भावना असणारा हा इगो प्रकार. या प्रकारात एक व्यक्त होतो आणि दुसरा हा
फक्त ऐकण्याच्या मनस्थितीत असतो, पहिला
त्याच्या भावना व्यक्त करीत असतो पण दुसरा त्याच्या कोणत्याही विषयावर व्यक्त होत
नाही, तो फक्त ऐकत असतो. या मध्ये वाद वाढण्याची
शक्यता फार कमी असते, कारण भांड्याला भांड लागत नाही, शांत, संयमी पालकत्व एकाने स्विकारायची
तयारी ठेवायची गरज या प्रकारात जास्त असते. मिनल आईला म्हणते “काय ग आई, तुला किती वेळा सांगितले कि
माझी रूम आवरू नको म्हणून, तरी तू काय आवरतेस ?”, यावर मिनल ची आई काहीच व्यक्त होत नाही उलट मिनल मात्र आईने रूम
आवरलेली आवडलेली नसल्याने राग राग करून तिचे मन मोकळे करते.
चाईल्ड इगो
अर्थात छोटसं मुल या प्रकारात रममाण होणं. हा प्रकार सर्वात सुरक्षित असा आहे. या
प्रकारात कोणत्याही प्रकारचे वाद होणं जवळ जवळ अशक्यच ! कारण या प्रकारात निरागसता
आहे, बालपण जपत संवाद आहे, म्हणून हा प्रकार
सर्वात सुरक्षित. बालदिनी आपण सर्वांनी याच इगो मध्ये आयुष्य एन्जॉय करणं मला
श्रेयस्कर वाटतं. रमेश म्हणाला “काय मॅच झाली काल, काय सुंदर खेळला विराट”, यावर महेश
म्हणतो, “फुटबॉल मॅच ना ?”, खरच मस्त झाली मॅच!! यावर हशा पिकू शकतो , हो ना?
हे
प्रातिनिधिक प्रकार मी मांडले आहेत, या तिन्ही प्रकारात आपण आपलं कसंब लावून लिलया वावरू शकतो. ज्यावेळी जो
प्रकार योग्य वाटेल त्यावेळी तो प्रकार वापरावा म्हणजे रिलेशन्स ची जपवणूक होईल, वाद, तंटे, निर्माण होणे टाळता येवू शकेल, आणि हो
जीवनाचा आनंद लुटता येवू शकेल.
अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
टीप: या लेखाचा सध्या सुरु असलेल्या घडामोडींशी कोणताही संबंध नाही, तो तुम्ही लावल्यास आणि चपखल लागल्यास त्यास निव्वळ योगायोग समजावा.
तळटीप : तुम्हास कोणत्या इगो मध्ये रहायला आवडेल ? कमेंट करा आणि मला सांगा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा