फॉलोअर

आजा सनम मधुर चांदनी में हम- हसरत

 प्रख्यात गीतकार हसरत जयपुरी (इकबाल हुसेन) हिंदी चित्रपट सृष्टीस मिळालेले शीघ्र कवी वाटतात मला, "'तेरी प्यारी सुरत को, किसकी नजर ना लगे", एका लहान बाळाला पाहून सुचलेले हे शब्द ज्याचे गीतात रूपांतर झाले. तसेच एका पार्टीत एका अभिनेत्रीने परिधान केलेला पेहराव पाहून सुचलेले शब्द,  "बदन पे सितारे लपेटे हुए", या दोन्ही गीतांना परिचयाची गरज नाही, ती आजही अगदी "दिल के करीब" आहेत, मला खात्री आहे तुमच्याही ओठांवर हि गाणी असतीलच. सोबतच “चोरी चोरी” चित्रपटातील "आजा सनम मधुर चांदनी में हम", हे देखील गीत असावं.  साधारण ३५० चित्रपट आणि २००० पेक्षा जास्त गाणी सोबतच अनेक गजल, शेर त्यांच्या नावे आहेत. किशोर दा नी गायलेलं "जिंदगी एक सफर" (१९७१) अजरामर गीत असो कि "एहसान तेरा होगा मुझपर" (१९६१) रफी साहेबांचा जादुई आवाज लाभलेलं गीत, हि गीतं म्हणजे एका वेगळ्या भाव विश्वात रममाण करतात, क्लासिकल मायस्ट्रो मन्ना डे यांनी गायलेलं "आओ ट्विस्ट करें" (१९६५) हे भूत बंगला या चित्रपटातील इझी गोईंग गीत आणि तितकंच संवेदनशील "दुनिया बनानेवाले क्या तेरे मन में", हे तिसरी कसम चित्रपटातील गीत, याचं क्रेडिट जयपुरी यांचं.

१९४९ मध्ये मुंबईत बस कंडक्टर म्हणून सेवा बजावत असताना एका उर्दू कवी कार्यक्रमात पृथ्वीराज कपूर यांनी जयपुरी यांना ऐकलं आणि त्यांनी जयपुरी यांना राज कपूर यांना भेटण्यास सांगितले. याच काळात राज कपूर “बरसात” चित्रपटाची निर्मिती करणार होते. या चित्रपटासाठी नवी संगीतकार जोडी शंकर-जयकिशन संगीत देणार होती, या चित्रपटात जयपुरी यांनी "जिया बेकरार है", हे गीत लिहिलं ते प्रचंड लोकप्रिय झालं. यानंतर या ट्रायो नी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं. विविध संगीतकारांसोबत काम करीत असताना अलीकडील जतीन-ललित या संगीतकार जोडी सोबत देखील त्यांनी १९९७ मध्ये साजिश या चित्रपटासाठी गीतं लिहिली. जयपुरी यांना दोन वेळा "फिल्म फेअर" पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, "बहारो फुल बरसाओ", चित्रपट सूरज (१९६६) आणि "जिंदगी एक सफर है सुहाना",चित्रपट अंदाज (१९७१), तसेच उर्दू कॉन्फरन्स च्या पुरस्काराने आणि वल्ड युनिव्हर्सिटी च्या "डॉक्टरेट" या मानद पदवीने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे.

१९६८ साली “झुक गया आसमान” हा चित्रपट प्रदर्शित झाला, हा चित्रपट १९४१ प्रदर्शित झालेल्या अमेरिकन चित्रपटाचा (हिअर कम्स मिस्टर जॉर्डन) रिमेक होता. या चित्रपटात एल्विस प्रेसले या अमेरिकन गायकाने गायलेल्या गाण्याने प्रेरित होऊन शंकर-जयकिशन यांनी जयपुरी यांना गीताचे बोल लिहावयास सांगितले आणि त्यांच्या लेखणीतून तयार झाले अजरामर गीत "कौन है जो सपनो में आया", रफी साहेबानी एल्विस च्या तोडीचं गायलं आहे हे वेगळं नमूद करायला नको. (रफी ॲट हिज बेस्ट)  जयपुरी यांनी शीर्षक गीतं हि भरपूर लिहिली आहेत त्या पैकीच हे एक गीत म्हणता येऊ शकतं. राजकपूर यांच्या सोबत अनेक चित्रपट जयपुरी यांनी केले यामध्ये संगम, मेरा नाम जोकर, राम तेरी गंगा मैली, कल आज और कल या चित्रपटांची नावे प्रामुख्याने घेता येऊ शकतील. राजकपूर टीम सोबत जयपुरी यांनी ११ चित्रपटात गीतकार म्हणून योगदान दिलं आहे.


राजकपूर यांचा पहिला प्रेमाचा त्रिकोण दाखविणारा चित्रपट "संगम", हा चित्रपट विविध कारणांसाठी प्रसिद्धीस पावला, मग ते कथानक असेल, वैजयंतीमाला यांचं स्क्रीनवर बोल्ड (१९६४ साली) वावरणं असेल, संगीत, गीतं, ज्युबिली स्टार राजेंद्र कुमार आणि स्वतः राज कपूर यांचा अभिनय सगळं काही उत्तम.... या चित्रपटात "बोल राधा बोल संगम", आणि "ये मेरा प्रेम पत्र पढकर", हि दोन गीतं जयपुरी यांनी लिहिली आहेत. एका मुलाखतीत त्यांनी "बोल राधा बोल" हे गीत कसं सुचलं याची कथा सांगितली होती. त्याचं झालं असं कि अवघ्या विशीत जयपुरी यांना प्रेम जडलं तेही त्यांच्या घरा समोर राहणाऱ्या मुलीवर आणि तिचे नाव हि "राधाचं" होतं,(चित्रपटात वैजयंती माला यांनी निभावलेल्या भूमिकेचं नाव राधाच होतं) त्यांच्या मते शेरो-शायरी कौशल्य ते  त्यांच्या आजोबां कडून शिकले  आणि "प्रेम कस करावं", हे त्यांना राधा ने शिकवलं. 

१७ सप्टेंबर १९९९ साली या उत्स्फूर्त गीतकाराने या दुनियेस "सायोनारा" करतं अनंताचा प्रवास सुरु केला. रुपेरी पडद्यावरील शब्दरूपी रोमान्सच्या जादूगारास विनम्र अभिवादन.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर

 

टीप: तुमच्या आठवणीतील हसरत जयपुरी यांनी लिहिलेलं गीत कमेंट करावं.

 


इतर विषयावरील लेख वाचण्यासाठी क्लिक करावं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?