फॉलोअर

पुढच्या वर्षी ये रे लवकर .... तुझी वाट बघतोय ...

 गणपती बाप्पा सर्वांचे श्रद्धास्थान, प्रत्येक वर्षी बाप्पाच्या आगमनाची वाट पाहणारे असंख्य भक्त आहेत. त्यापैकी मी एक ! श्री गणेश चतुर्थीला आगमन होण्याच्या काही दिवस अगोदर पासून स्वागताची तयारी आणि नंतर निरोप देण्यासाठी मनाची तयारी ! काल फेसबुक वर एक सुंदर चित्ररूपी संदेश वाचायला मिळाला (लेखकाचे नाव त्यात दिलेलं नव्हतं) आणि वाटलं प्रत्येकाच्याच भावना आहेत या !त्यात एक मनाला स्पर्शलेला, भावलेला संदेश असा होता, “तुझी पाठमोरी आकृती बघितली कि तू चालल्याची जाणीव मनाला होते, वाटतं तू मागे वळून बघशील....पण बाप्पा ठरलेल्या दिवशी येतो आणि ठरलेल्या दिवशी त्याच्या गावाला निघतो पण जाताना आशीर्वाद नक्कीच देतो... असा प्रत्येकाचा विश्वास असतोच असतो.

बाप्पाचे स्वागत करताना जोश, उत्साह कुठून येतो याचं गुपित मला अद्यापही उलगडलेलं नाही, कुठल्याही बाप्पाच्या मिरवणुकीत (या वर्षी मिरवणूक नसणार) तुम्हाला उत्साह पहायला (लहान थोर सगळ्यात हा उत्साह सारखाच) मिळेल, मग तो पारंपारिक लेझीमचा खेळ करताना असेल, झांज वाजविताना असेल अथवा एखादा वाद्यवृंद असेल, ढोल ताशा असेल, कुठून येतो हा उत्साह , ही ऊर्जा ? बाप्पा वरच प्रेम, श्रद्धा च असावेत याचं उत्तर. मी असेही व्यावसायिक पहिले आहेत कि जे श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत गणरायाच्या सेवेत असतात, त्या दरम्यान प्रथम प्राधान्य हे गणपती बाप्पाच !! मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आणि नित्य नियमाने श्रीं ची आरती करायची, प्रसाद वाटप करायचा, सार्वजनिक ठिकाणी उत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक बांधिलकीचे उपक्रम (या वर्षी अनेक मंडळांनी उपक्रम पार पाडले आहेत, खरं तर हेच अभिप्रेत आहे) पार पाडायचे असा साधारण अलिखित नियम गणेशभक्त पाळतात असं पाहण्यात येतं. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असणारा गणपती बाप्पा म्हणजे महागुरुचजणू , त्याचा कृपाप्रसाद मिळवायचा म्हंटल कि कुठेही तडजोड नाही.


बाप्पा चा गजर करताना तर ब्रह्मानंदी टाळी वाजल्याचा आनंद मिळतो, म्हणूनच पारंपारिक मिरवणुकीत जो आनंद मिळतो तो आनंद वेगळाच ! तो व्यक्त नाही करता येणार त्याची फक्त अनुभूतीच घ्यावी लागेल. गीतकार जगदीश खेबुडकर यांनी त्यांच्या गीतात याचा उल्लेख देखील असाच केला आहे, “ब्रह्मानंदी जीव होई वेडा कि पिसा”, बाप्पाची रूपे अनेक, आखीव रेखीव बाप्पा ही तेवढेच मनोहारी वाटतात जेवढी पुरातन शिल्पातील बाप्पा , ही एक वेगळीच जादू आहे ज्यामध्ये माणूस सगळी दु:ख विसरतो आणि त्या गणेशतत्वाशी तल्लीन होतो, एकरूप होण्याचा प्रयत्न करतो.

आज विसर्जन आहे, पण मुळात विसर्जन हे बाप्पाचं होतच नाही विसर्जन होते ते माझ्यातल्या मीच कारण बाप्पात आणि माझ्यात फक्त बाप्पाच उरतो, माझ्यातला मीपाण्यात विरघळून जातो आणि जड अंत:करणाने आणि भरलेल्या डोळ्याने गणेशभक्त घरी परतू लागतात, मनात एकच विचार असतो, “पुढच्या वर्षी लवकर येणारघरी परतल्यावर बाप्पा घरात जिथे विराजमान असतो त्याठिकाणी आपसूकच हात जोडले जातात......

 गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!  

 संकल्प करू, घरच्या घरी विसर्जन करू, शक्य नसल्यास महानगरपालिकेने केलेल्या व्यवस्थेचा वापर करावा.


अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर


तळटीप: Share & Comment करण्यास विसरू नका.



टिप्पण्या

  1. मोरया 🙏
    खूप छान सर🙏🙏
    आता ....मी पणाचे विसर्जन करून पुनश्च तयार आहोत आम्ही 👍🙏

    उत्तर द्याहटवा
  2. असंख्य गणेश भक्तांच्या भावना खूपच चांगल्या शब्दात व्यक्त केल्या आहेत.

    असंख्य गणेशभक्तांनी मीचे जर विसर्जन केले तर समाज खूपच सुंदर होईल, लोकांमध्ये प्रेम भावना वाढीस लागेल, जिव्हाळा वाढेल. आपण सर्वांनी जर असे केले तर गणपती आपल्यावर खुश होईल व त्याचा आपल्याला खूप चांगला आशीर्वाद मिळेल याची मला खात्री आहे.

    गणपती बाप्पा मोरया , मंगलमूर्ती मोरया

    उत्तर द्याहटवा
  3. उत्सवात काळानुरूप बदल होणे आवश्यक आहे व मी पणा स्वतःत कमी करणे हे योग्य सांगितले आहे

    उत्तर द्याहटवा
  4. भारतीय संस्कृतीने निर्मिती पालन व लय ह्या तिन्ही तत्वाना धर्म आध्यत्म व भौतिक जीवनात सण कुळधर्म रिती रिवाज परंपरा यात अभिन्नतेने मिसळून टाकले आहे. ऋतू, कर्तव्य, कर्म,आनंद, उत्साह, यांचे माध्यमातून नवरसांचा आस्वाद घेता येतो. बस यात भाव असला की
    सत चित आनंदच 🙏🕉️

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?