फॉलोअर

विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सॉफ्ट स्किल्स्

 

मागील शैक्षणिक वर्ष हे कोविड मुळे ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण घेत विद्यार्थ्यांनी पूर्ण केलं. ऑनलाइन शिक्षण, म्हंटल तर नवीन , प्रथमच पाहतोय असे, म्हंटलतर आठवड्यातील जो एक ई-लर्निंग चा तास पूर्ण करणाऱ्या शाळांसाठी आणि तेथील विद्यार्थ्यांसाठी जुनाच चम्मतग चा तास !! जो कोविड मुळे वर्षभर पहायचा होता. शिक्षक आणि पालकांसाठी खरी परीक्षा म्हणावी असा हा कालावधी, पण या परीक्षेत शिक्षक यशस्वी झाले (काही अपवाद वगळता) असे मी म्हणेन, काही ठिकाणी शिक्षक एकटेच ऑनलाइन क्लासला उपस्थित राहिले. काही केस स्टडीज उत्कृष्ट आहेत, काही शिक्षकांनी अभिनव असे प्रयोग देखील या दरम्यान केले आहेत. मग तो गुगल फॉर्म, क्लासचा उपयोग, ऑनलाइन टेस्ट, व्हिडियो शेअरिंग, शिक्षकांनी स्वत:कडील विविध शैक्षणिक साहित्याचा वापर करून नवीन पद्धतीने सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना आकलन होणे हेतू केलेले अनेक प्रयोग या ऑनलाइन शिक्षणाचे साक्षीदार आहेत आणि यापुढेही राहतील.

कोविडपूर्वी मुलांचा स्क्रीन टाईम कसा कमी करता येईल यावर चर्चा व्हायच्या पण जे विद्यार्थी मित्र दहावीत होते, त्यांना हा स्क्रीन टाईम कमी करणं म्हणजे तारेवरची कसरतच !! पण तरी देखील विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आणि परीक्षेच्या दृष्टीने तयारी केली परंतु पुन्हा कोविड मुळे परीक्षाच घेणे शक्य नाही असे चित्र स्पष्ट झाले आणि परीक्षाच रद्द झाली !! वर्ष पूर्ण झालं म्हणजे अकरावीत प्रवेश घ्यायचा हे नक्कीच , पण परीक्षेविना, गुणपत्रका शिवाय प्रवेश हे काहीतरी नवीनच घडणार आहे, अर्थात जे गुण मिळतील हे अंतर्गत मूल्यमापन आणि वर्षभराची विविध चाचणी परीक्षेतील कामगिरी , या चाचणी परीक्षा ऑनलाइन पार पडल्या आहेत हे सर्वश्रुत आहेच, त्या कशा पार पडल्या हे एक ओपन सिक्रेट आहे  !! त्यामुळे विद्यार्थ्यास विषयाचे किती आणि कसे आकलन झाले आहे हे समजणे तसे कठीणच आहे. अभ्यास करणारे विद्यार्थी आणि अभ्यास न करणारे विद्यार्थी असे दोन गट आपल्या

शिक्षण व्यवस्थेत पहायला मिळतात, अभ्यास करणारे “प्रगत” आणि अभ्यास न करणारे “अप्रगत” असे वर्गीकरण करूया म्हणजे लक्षात येईल कि आता सगळे विद्यार्थी एकाच रेषेत, समकक्षेत आहेत. ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थ्यास दोन शिक्षक मिळाले एक ऑनलाइन शिकविणारे शाळेतील शिक्षक आणि दुसरे पालक. हो , हो पालक, आता या परिस्थितीत पालकांना त्यांच्या मुलांचे शिक्षक होणे क्रमप्राप्त आहे त्यांनी त्यांचा हात धरून करिअर द्वारा कडे त्यांना घेऊन जाणे हीच खरी गरज आहे. ऑनलाइन स्वरुपात शाळेतील शिक्षकांनी अध्ययन विषयक शिक्षण दिलं पण विद्यार्थ्यांना त्यापुढील शिक्षण देण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम पालकच करू शकतात.

          विद्यार्थ्याच्या अंगी असणाऱ्या विविध गुणांना फुलण्यास, कौशल्यांना व्यावहारिक धार देण्यास  या वर्षी आवश्यक तेवढा वाव मिळाला नाही. कारण ऑनलाइन शिक्षणाच्या काही मर्यादा (काही फायदे काही तोटे) आहेत, पण एक पिढी जी आयुष्याच्या एका महत्वाच्या वळणार उभी आहे, त्या पिढीस काही गोष्टींचा स्विकार करावा लागणार आहे आणि तो त्यांनी करायलाच हवा असे मला वाटते. पारंपारिक शिक्षणास पर्याय म्हणून जी विविध क्षेत्रं पुढे येत आहेत त्यात आपली रुची आहे का ? हे तपासून पहावं लागेल. करिअर करायचं कि जॉब मिळवायचा याचा निर्णय घ्यावा लागेल. विद्यार्थी मित्रांनी विविध कौशल्य आत्मसात करणे हेतू स्वत:स झोकून देणे अनिवार्य बनले आहे. मग हि कौशल्य कोणती असू शकतात?

 १०.  प्रॉब्लेम सॉल्व्हिंग : - समस्यांचे निराकरण:  विद्यार्थ्यांना प्रसंगानुरूप समस्यांचे निराकरण कसे करावे हे विद्यार्थ्यांना येणे आवश्यक आहे. कोविड मुळे तर हा विषय खूप महत्वाचा मानला जातो आहे. व्यवसाय असेल अथवा नोकरी असेल दोन्हीकडे हे कौशल्य गरजेचेच आहे.

 ०९. क्रिएटिव्ह थिंकिंग: -सर्जनशील / निर्मितीक्षम विचार:  विद्यार्थी हा क्रिएटिव्ह असणं गरजेचे आहे, कारण यामुळे कल्पना शक्तीचा विस्तार होण्यास मदत मिळते. आपल्या आजूबाजूच्या जगास समजून घेण्यास विद्यार्थ्यांना यामुळे शक्य होत आणि सोबतच नवीन दृष्टीकोन असणारी उत्तरं विद्यार्थी जगास देऊ शकतो, त्यासाठी तो सक्षम होण्यास मदतच मिळते. कल्पना आणि निर्मिती हे शिक्षणाचे मुलभूत भाग आहेत. कोणास कशी आणि कोणती कल्पना सुचेल आणि त्यातून किती उत्तम प्रकारची निर्मिती होऊ शकते हे सगळं अद्भुत असे आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांनी क्रिएटिव्ह राहून कल्पना शक्तीच्या आधारे नव-निर्मितीचा ध्यास घेतला पाहिजे. अर्थात प्रत्येक वेळी काहीतरी नवीनच करायला हवं असे नाही, जे उपलब्ध आहे त्यात काय क्रिएटिव्ह नवीन योगदान देऊ शकतो यावर विद्यार्थी उत्तम काम करू शकतात. भारत सरकारचा या विषयास धरून एक उपक्रम आहे, स्टार्ट-अप , हा असाच कल्पना आणि निर्मिती मधून सक्षम उद्योजकते कडे वाटचाल असणारा उपक्रम आहे.

 ०८. टीमवर्क:- आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर लागणारं कौशल्य.. एकत्रित, संघ भावनेने काम करण्याने मोठ मोठी कामं अगदी सहज साध्य होतात. हा विश्वास मनात जागा करण्याची गरज मला वाटते. विद्यार्थ्यांनी ऐक्याचे महत्व समजावून घेतलं पाहिजे.

 ०७. डिसिजन मेकिंग: निर्णय क्षमता अंगीकारणे हे देखील एक कौशल्य म्हणावं लागेल. काम करीत असताना विविध निर्णय घ्यावे लागतात हि क्षमता वाढीस लागण्यास जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज वाटते. निर्णय क्षमतेने विद्यार्थी आत्मनिर्भर होऊ शकतो. आपली आवड काय आहे, कोणत्या गोष्टी करिअर विषयक आवश्यक आहेत, त्यांची निवड करणे यामुळे शक्य होते. विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावं कि आपण मित्र म्हणून निवडलेली मंडळी, आणि आपण ज्या गटात सामील होत आहोत तेथील लोक आपले व्यक्तिमत्व विकसित करण्यास मदत करीत असतात, तेथेही निर्णय घेणं क्रमप्राप्त असतं अशावेळी स्वत: मधील हि क्षमता ओळखून विद्यार्थ्यांनी निर्णय घ्यावेत.

 ०६. स्वत:स ओळखा:- इंट्रा पर्सनल स्किल्स, स्वत:ची स्वत:स ओळख होते आहे का ते पहा, तुमचे विचार, भावनिक बुद्धिमत्ता, एखाद्या विषयी तुमची श्रद्धा, तुमची मते हे सारं म्हणजे इंट्रा पर्सनल स्किल्स !! जेंव्हा तुम्ही स्वत:स समजून घ्याल तेंव्हाच दुसऱ्यास समजून घेऊ शकाल आणि सक्षम बनाल. हे ध्यानात घ्या.

 ०५. इंटर पर्सनल स्कील: वैयक्तिक कौशल्य: जेंव्हा तुम्ही स्वत:स ओळखता तेंव्हा इतर मंडळी कशी वागत आहेत त्यातील बारकावे तुम्ही समजून घेऊ शकाल, याचा उपयोग टीम (ग्रुप) मध्ये काम करताना होईल. एखादा व्यक्ती एखाद्या विषयावर कसा प्रतिसाद देतो हे तुम्हास समजून येऊ लागेल.

 ०४. कम्युनिकेशन स्किल: संभाषण कौशल्य- एखादा विद्यार्थी असेल अथवा एखादा व्यावसायिक सर्वांना संभाषण कौशल्याची गरज भासतेच, विविध व्यक्तिं सोबत संभाषण कसे करावं हि एक कला आहे, ती आत्मसात करणं काळाची गरज आहे. करिअरच्या विविध टप्प्यांवर या कौशल्याची आवश्यकता आहे हे विद्यार्थी मित्रांनी जाणून घ्यावं व त्याकडे गांभीर्याने पहावं.

 ०३. लीडरशिप स्कील: कुशल नेतृत्व: विद्यार्थी म्हणून एका गोष्टीचा निर्णय प्रत्येकाने घ्यावा कि त्यास नेतृत्व करण्यास आवडेल कि अनुयायी होणे, प्रत्येकाकडे नेतृत्व गुण असेलच असे नाही पण ज्याच्याकडे विचार आहेत आणि लवकर निर्णय घेण्यास कसब आहे त्याने नेतृत्व कौशल्य विकसित करावं. आपल्या मित्रांशी संवाद साधण त्यांना एकाच धाग्यात गुंफून ठेवणं, जीवनात विविध आघाड्यांवर याचा फायदा विद्यार्थी मित्रांना होऊ शकतो.

 ०२. पॉझीटीव्ह अॅटीट्युड: सकारात्मक दृष्टीकोन: कोविड काळात बऱ्याच नकारात्मक गोष्टी मनात घर करू लागतात, अशावेळी त्यास सकारात्मकते कडे घेऊन जाणे गरजेचे बनते. कोणत्याही संस्थेत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करणं महत्वाचं असतं, याचे काही फायदे होतात जसे कि काम करण्यास ऊर्जा मिळते, उत्साह येतो, आत्मविश्वास दुणावतो, सहकार्याची भावना वाढीस लागण्यास मदत होते. यामुळे तुम्ही एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून परीचयास येऊ शकता.

 ०१. लिसनिंग स्कील: ऐकणे हे एक उत्तम आणि प्रमुख कौशल्य आहे. शिक्षणाचा प्रवास हा इथूनच खरा सुरु होतो, आजकाल कुणाचे ऐकून घेणे यात कुणासही रस नसतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी ऐकायची सवय लावली पाहिजे. हे एक कौशल्य आहे याकडे कानाडोळा करू नये. एक उत्तम श्रोता समाजात उच्चतम स्थान प्राप्त करू शकतो. बऱ्याच वेळा वर्गात शिक्षक शिकवीत असताना त्यांच्याकडे पाहणे टाळले जाते, हे पूर्णत: चुकीचे आहे, शिक्षकांकडे लक्ष द्या, ते काय सांगत आहेत त्यास प्रतिसाद द्या, प्रतिसाद देण्यासाठी तुम्ही डोकं हलवू शकता, ऑनलाइन क्लास मध्ये थंब देऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्या तुमची स्वप्नं साकार करण्यासाठी सर्वात महत्वाचं कौशल्य हेच आहे.        

 क्रमश:   

 

विद्यार्थी मित्रहो, या दहा कौशल्यांचा अंगीकार करण्यास पाऊल उचला, येणारा काळ तुमचाच असेल हे मी खात्रीने सांगू शकेन.

यासाठी तुम्हाला मदत हवी असल्यास , विविध कौशल्य शिकायची असल्यास तुम्ही विद्या कॉम्प्युटर्स, श्रीकांत नगर, जुळे सोलापूर येथे संपर्क करावा. कोविड मुळे वैयक्तिक येऊन संपर्क करणे अवघड आहे तरी आपण आमच्या वेव-साईटला भेट द्या आणि तिथे फॉर्म भरा आम्ही तुम्हाला संपर्क करू.

आमची वेब साईट: https://vidya-computers.business.site

“गेट कोट” या लिंकवर क्लिक करावं आणि फॉर्म भरावा.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं

टिप्पण्या

  1. खूप छान माहिती व मार्गदर्शन ! हे सर्व गन अंगीकृत करणे किती महत्वाचे आज हे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले!!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?