फॉलोअर

स्टार्टअप सक्सेस मंत्र

 

आपल्या स्वप्नातील स्टार्टअप सत्यात उतरवणं म्हणजे कौशल्याची पराकाष्ठा करावी लागते.   एखादा स्टार्टअप यशस्वी करणं म्हणजे केवळ योगायोग नव्हे !! तर अनेक यातना, विविध समस्या त्यातून निर्माण होणाऱ्या परीक्षां मध्ये उत्तीर्ण व्हावं लागतं, हे करीत असताना अस्वस्थता, निराशा, अपमान यांचा सामना करीत यशाच्या लाटेवर स्वार व्हावं लागतं. हे साध्य करताना “मन ठेवारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण”, हा मंत्र लक्षात ठेवावा लागतो. प्रत्येक स्टार्टअपची सुरुवात आणि प्रवास हा भिन्न असतो, पण त्यातून मिळणारी मूलभूत मूल्यं सारखी असतात. ज्यास आपण बेसिक्स म्हणतो, अर्थातच व्यवसाय चालविणे , तो प्रोफेशनली चालवायला शिकणे आणि एक यशस्वी उद्योजक बनणे या प्रवासात बरचं काही शिकायला मिळतं. आपण ते शिकावं आणि पुढे जात रहावं. यालाच यशस्वी उद्योजक होण्याचा प्रवास म्हणता येईल.

१. धीर धरी धीरापोटी : धीर धरी धीरापोटी असती मोठी फळे गोमटी , हे एक निर्विवादीत सत्य आहे. सगळं एकाच रात्रीत जादूची कांडी फिरविल्यासारख काहीही नाही मिळणार. ओव्हर नाईट सक्सेस मिळण शक्य नाही अशा क्षेत्रात आपण आहोत हे विसरता कामा नये. जिद्द आणि चिकाटीच तुम्हाला तिमिरातून तेजाकडे घेऊन जाईल. रोज काम करीत असताना आपण स्वत: उत्साहित असणं गरजेचे आहे, आपण समाजात एखाद्याच्या आयुष्यात कुठे आणि कसा फरक करू शकु याकडे लक्ष द्या. कोणत्याही गोष्टी साठी सज्ज रहा, स्वत:ची टीम बनवा.

२. समस्या आणि त्यावरील तोडगा: तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचारांचे पोटी || संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथेत सांगून ठेवलं आहे. मला वाटतं हे स्टार्टअपला देखील लागू पडतं ,लाभ विचारांचे पोटी, अर्थात योग्य दिशेने विचार केल्यास समाजातील समस्या शोधून त्यावर तोडगा शोधल्यास आणि तो योग्य ठिकाणी विक्री केल्यास यश मिळू शकतं. लोकांनी दिलेले अभिप्राय कामात बुस्ट देण्यास मदत करतात. अनुभवी लोकांना भेटा त्यांच्याशी चर्चा करा, तुमच्याकडील कल्पना त्यांच्यासमोर मांडा त्यांच्याकडून मिळणाऱ्या इनपुटवर विचार करा सगळेच इनपुट स्विकारले पाहिजेत असे नाही, सारासार विचार केल्यावर जे तुमच्या मनास पटते त्याचा स्विकार करा बाकीचे सोडून द्या, सगळीच मतं योग्य असतातच असे नाही. त्यास फिल्टर लावता यायला हवं.


 ३. हुनर है तो कदर है : स्किल इंडियाचे हे ब्रीद स्टार्टअप देखील लागू पडते. विविध कौशल्य शिकावी लागतील त्यातल्या त्यात महत्वाची अशी कौशल्य  जसे की

          अ. धैर्य:Holding fear for some time is courage” हे एक कौशल्य आहे. एका सैनिकाने ते आत्मसात केलेले असते. तसेच आपणही ते आत्मसात करा हेच तुम्हाला कठीण काळातून मार्गक्रमण करण्यास प्रेरणा देईल आणि तुम्ही तो काळ तुम्ही सहज पार करू शकाल.

          ब. सुधारणा: तुम्ही तयार केलेल्या प्रॉडक्ट्स मध्ये ग्राहकाने सुधारणा सुचवीलि तर त्याचा स्विकार करून आवश्यक ते बदल करा.                     

          क. आत्मविश्वास: एखाद्या विषयाप्रती आत्मविश्वास असावा पण तो फाजील नसावा हे लक्षात घ्या. एखादी गोष्ट साध्य होत नाही तर आपण कोलमडतो, सगळं संपल असा फील येऊ लागतो तेंव्हा हा आत्मविश्वास त्यातून उभारी देण्यास मदतगार ठरू शकतो, नव्हे ठरतोच. स्वत:च्या लक्षांवर, टीम वर विश्वास असेल तर येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करता येऊ शकते, अशावेळी गरजेचा असतो तो आत्मविश्वास !! तो कोणत्याही बाजारपेठेत मिळत नाही.      

          ड. निष्ठा: आपण जे काम करतो त्यावर निष्ठा हवी, समर्पण हवं , तुमचे कर्मचारी, तुमचे ग्राहक यांच्याप्रती निष्ठावान रहा. दासबोधात समर्थ रामदास स्वामी यांनी चवथ्या समासात भक्ति निरूपण करताना सांगितलं आहे, “नाही भक्ति नाही प्रेम | नाही निष्ठा नाही नेम |”, हे स्टार्टअप साठी लागू पडतं असे मी मानतो. आपण जो व्यवसाय/ स्टार्टअप करीत आहोत त्यावर भक्ति हवी, प्रेम हवं सोबतच निष्ठा हवी, हे जर नसेल तर ध्येय साध्य करणं कठीण.

Be Loyal to your customers & employees.   

४. संघटन: कल्पना एका व्यक्तीच्या डोक्यात येते आणि ती आकार घेत एक उद्योग निर्माण होतो. यात सामील होणारी मंडळी सगळी एकाच ध्येयाने प्रेरित असणारी असावीत अशी अपेक्षा असते, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी खास परिश्रम घ्यावे लागतात. टीम बिल्डिंग ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. परस्परांमधील विश्वास, सामर्थ्य आणि कंपनीची / उद्योगाची संस्कृती मजबूत करण्याची ही एक संधी असते जी एक उद्योजक म्हणून आपण पुढे नेणे अपेक्षित आहे.

५. कायझन विचारधारा: कायझन विचारधारेचा स्विकार करणं म्हणजे सतत सुधारणा स्वीकारण.. तुमच्या कंपनीतील तुमच्या पासून ते शेवटच्या माणसापर्यन्त प्रत्येकजण प्रति दिनी सुधारणा करू शकतो त्यास वाव आहे, हे लक्षात घ्यावं, तुमच्याकडील विविध प्रोसेस मध्ये रोज थोडी सुधारणा करता आली तर एखादा उद्योजक अविश्वसनीय यश मिळवू शकतो. एक उद्योजक म्हणून तुम्ही तुमच्या कंपनीत ही संस्कृती रुजविण्यात यशस्वी झालात तर तुम्ही तुमच्या कंपनीस अधिक सामर्थ्यवान बनविण्यात यशस्वी व्हाल.

 

क्रमश:

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर      


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?