स्टार्टअप बेसिक्स – फंडामेंटल्स
प्रथमत: आपण याचा स्विकार करूया कि आपल्याकडे स्वत:चा व्यवसाय, उद्योग सुरु करण्याची संस्कृती नाही, विद्यार्थ्यांकडे शिक्षण घेत असताना एकच ध्येय डोळ्यासमोर असतं ते म्हणजे उत्तम नोकरीसाठी जे करावं लागेल ते करू आणि त्या प्रमाणेच स्वत:ला तयार करू. मग तो महाविद्यालयीन विद्यार्थी असेल अथवा एखादा पदवीधर , दोघांची स्वप्नं सारखीच !! मग हि स्वप्नं साकार करण्यासाठी धडपड सुरु असते काही मंडळी यात यशस्वी होतात आणि त्यांना त्यांचा ड्रीम जॉब मिळतो आणि काही मंडळी मिळालेल्या गोष्टीत समाधान मानतात..... पण स्व-उद्योग हि संस्कृती अंगिकारायची असल्यास काय करावं लागेल? याविषयी शैक्षणिक धोरणात ठोस अभ्यास, निर्णय नसल्यानं असावं बहुधा, पण या विषयी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून प्रेरणा देणे गरजेचे आहे. कल्पना आणि निर्मिती हे शिक्षणाचे मुलभूत भाग आहेत तसेच नव्या उद्योगासाठी देखील ते तितकेच महत्वाचे आहेत. आजची पिढी प्रगत आहे, या पिढीस सुरुवातीपासूनच टेक्नोलॉजीचा वापर करण्याची सवय आहे, हा वापर फक्त योग्य दिशेने केला कि त्याची फळ मिळू शकतात हे समजून सांगणे आवश्यक वाटते. आजूबाजूस घडणाऱ्या गोष्टींवर नजर ठेवली आणि अभ्यास केला तर डोक्यात नव-कल्पनांचा जन्म होऊ शकतो आणि त्यातून नव-निर्मिती घडू शकते. हे अनेक उदाहरणातून सिद्ध झालं आहे. कल्पनांचा नवोन्मेष साध्य करणे हेतू याची चर्चा घडवून आणणे, त्यातील बारकावे शोधणे , व्यवहार्यता तपासून पाहणे याची पारायणे जाणकार व्यक्तिंसोबत करावी लागतील, तेवढा संयम अंगी बाणावा लागेल, तो आवश्यक आहे.
“चक दे इंडिया” हा चित्रपट तुम्ही
पाहिला असेल, त्यात कोचची भूमिका केलेल्या शाहरुखने टीमला शिकविलेले फंडामेंटल्स
ध्यानात घेऊयात. कारण कोणत्याही खेळात आनंद तर मिळतोच पण बेसिक्सला तेवढेच महत्व
असते. ते विसरून, स्किप करून पुढे जाता येत नाही. यशस्वी होण्यासाठी “आवश्यक तयारी
व सराव” या दोन्ही गोष्टी यशाचा आनंद घेण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करतात. स्टार्टअप
सुद्धा त्यास अपवाद नाही. बहुधा नवा उद्योग सुरु केलेली मंडळी हेच बेसिक ध्यानात घेत
नाहीत, ते सतत नव्या गोष्टींच्या मागे असतात, मराठीत म्हणतात ना “हातचं सोडून पळत्याच्या
मागे” असा काहीसा प्रकार होतो. टेक्नोलॉजीमुळे आजकाल आपणांस बरीच माहिती मिळते पण सुरु
केलेल्या उद्योगात येणाऱ्या एखाद्या अडचणीसाठी कोणताच जादुई दिवा अथवा कांडी नाही जी
फिरवली कि अडचण दूर होईल. अडचण दूर सारण्यासाठी सराव, तुमचं त्याप्रती समर्पण, विषयातील
प्रभुत्व, विकसित करण्याचे ध्येय हेच तुम्हाला मदत करतील सोबतच मुलभूत तत्वं आणि प्रभुत्व
मिळविण्याचे मार्ग तुमचा यशाचा मार्ग निश्चित करतील.
१. कुठे आणि
का?: एखाद्या ट्रीपला
जाताना कुठे जायचे आणि का जायचे हे ठरवूनच आपण निघतो. मग आपण ज्या वाहनातून जात
असतो त्या वाहनास काही तांत्रिक अडचण आली तरी आपला निश्चय दृढ असतो, आपण अडचणीवर मात
करून आपले इप्सित ध्येय –ट्रिपचे लोकेशन गाठतोच , हो ना? तसेच स्टार्टअप सुरु
करताना कुठे आणि का? हा मुलभूत प्रश्न आहे, तुम्हाला तुमच्या कंपनीला कुठे घेऊन जायचे आहे? आणि तिथे तुम्हास का जायचे आहे?
व्हिजन, मिशन आणि वॅल्युज ठरवा हे तुम्हाला सतत प्रेरणा देतील आणि तुमचा यशाचा
मार्ग प्रकाशित करीत राहतील. एकदा तुमच्या प्रदीर्घ उद्योजकीय प्रवासाची व्हिजन
ठरवली आणि त्या नुसार ती साध्य करण्यासाठी विविध छोटी छोटी व्यावसायिक ध्येय सेट
केली कि ती साध्य करण्यासाठी योजना तयार करून त्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी
प्रयत्नशील राहता येते. असे व्हिजन ठेवून काम करण्यास सुरुवात केली तर पुढील पाच
ते दहा वर्षात तुम्ही किती साध्य करू शकाल हे पाहून तुम्ही चकित व्हाल, पण एक आहे “पकडे
रेहना छोडना नही”.
२. कमाई है तो सही
है – विक्री कशी करावी हे शिका:
कोणताही उद्योग सुरु केल्यानंतर त्यातून उत्पन्न, कमाई झाल्याशिवाय तो करण्यात मन
रमत नाही. हे वैश्विक सत्य आहे. बऱ्याच वेळा एखाद्या उद्योगाचे बोधचिन्ह, व्हिजिटिंग
कार्ड, लेटरहेड, कार्यालय, सर्व काही उत्तम असतं पण ज्या गोष्टीची गरज असते ती अत्यंत
अल्प प्रमाणात असते, ती म्हणजे विक्री किती आणि ग्राहक वर्ग. कोणत्याही उद्योगास
ग्राहक हा हवाच, तो नाही तर व्यवसाय नाही... त्यामुळे विक्री कशी करायची हे शिका
आणि झालेल्या पहिल्या विक्रीतून पुन्हा व्यवसाय कसा मिळेल याचा विचार करा, त्या
अनुषंगाने कृती आवश्यक हे वेगळे सांगायची गरज नाही. काही मंडळींचा विक्री करण्यात
हातखंडा असतो, उत्तम गोष्ट आहे ती पण विक्री करताना वस्तूची किमत आणि मार्जिन याचा
अभ्यास जरूर हवा. हीच बाब आपल्याला यश देऊ शकते. विक्री वाढविण्यासाठी डिस्काऊंट हि
प्रवृत्ती स्वीकारू नका. हा नियम प्रस्थापित कंपन्यांसाठी हि लागू आहे. तुम्ही तर
स्टार्टअप आहात हे विसरू नका, आपले प्रथम लक्ष्य हे कॅश फ्लो निर्माण करण्यावर
असावं.
३. जी पब्लिक डिमांड
आहे ते विका: बाजारपेठ निवडा,
तुमचे उत्पादन कुठे विक्री होऊ शकते हे समजून घ्या त्यानुसार ते विक्री करा. कधी
कधी एखाद्या ठिकाणी बाजारपेठच उपलब्ध नसते आणि तिथे ती निर्माण करून यश मिळेल असा
विचार करणे योग्य होणार नाही. एक उदाहरण पाहूयात- माझ्याकडे एज्यु-टेक प्रॉडक्ट
आहे जे इंटरनेट च्या सहाय्याने वापरता येऊ शकतं, पण मी जर हे प्रॉडक्ट इंटरनेट
नसलेल्या ठिकाणी त्याची उपलब्धता करून विकायचं ठरवलं तर ते योग्य नाही होणार,
त्यास बराच काळ जावा लागेल. आजही ४५% भारतीय इंटरनेट पासून वंचित आहेत. त्यामुळे अशा
समस्या टाळण्यासाठी प्रथम मोठ्या श्रेणीचा विचार करावा. जसे कि बहुतेक लोक शूज,
कपडे, तंत्रज्ञान संबंधित उपकरणे, करमणूक विषयक वस्तू यांची खरेदी करीतच असतात पण
याच श्रेणीत योग्य उत्पादन, उच्च गुणवत्ते
व सेवेसह उपलब्ध होत असेल तर लोक खरेदी करतात. हा नवा पर्याय देखील लोक स्विकारतात.
प्रस्थापित गोष्टीमध्ये नव्या संधीचा शोध
घेतल्यास ती नक्की प्राप्त होते आणि संधीच सोनं करणं आपल्याच हातात असतं.
४. कॅश फ्लो चा
श्रीगणेशा मग नफा: हे मुलभूत
तत्व पाळण महत्वाचं. नफा कुणास नको असतो? सगळं जे काही एक उद्योजक करीत असतो
त्यातून नफा मिळविणे हा प्रथम हेतूच असावा लागतो, आणि तो असतो देखील. कंपनीत
कामाची सिस्टम तयार करणं, टीम तयार करणं यांना प्राधान्य द्यावेच लागेल पण सोबतच
कॅश फ्लो कडे देखील तेवढेच लक्ष द्यावे लागेल. नफा मिळवायचा असल्यास कंटीन्युअस
कॅश फ्लो मिळत राहणं गरजेचे आहे. उदा. तुम्ही एखाद्या इंडस्ट्री साठी आय.ओ.टी.
बेस्ड कन्व्हेयर बेल्ट बनविला आहे. त्याचे इंस्टॉलेशन केले, सेवा दिली पण बिल जनरेट
केले नाही, त्याचा फॉलोअप घेतला नाही आणि
दुसरीकडे काम करण्यास प्राधान्य दिले असे नाही चालणार, प्रत्येक गोष्टी वेळेत
करण्यास प्राधान्य दिले तर कंटीन्युअस कॅश फ्लो मिळण / मिळवण शक्य आहे, तसे
प्रयत्न हवेत.
आपल्याकडे
हातात जे आहे, जे व्हिजन घेऊन आपण कार्य आपण करीत आहोत त्यात नाविण्य कसे आणता
येईल यावर जरूर लक्ष ठेवून असावं, तसे यशस्वी प्रयत्न नक्की करावेत पण प्रत्येक
वेळी काहीतरी नवीन शोध घ्यायचा आणि त्याच्या मागे लागायचं असे चंचल वागणे यशाकडे
घेऊन जाणार नाही.
“स्टार्टअप मधून नवनिर्मितीचा आनंद” मिळतो पण हे बेसिक्स मनापासून स्विकारणे आणि मार्गक्रमण करणे गरजेचे, हे करू शकाल तर यश तुमची वाट पहात आहे. आयुष्यातील त्या यशाच्या क्षणावेळी मी नक्की आठवेन कारण “कोणत्याही खेळात आनंद तर मिळतोच पण बेसिक्सला तेवढेच महत्व असते.”
अमित बाळकृष्ण
कामतकर
सोलापूर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा