फॉलोअर

ओव्हर द टॉप (OTT)- जरा सांभाळून

 

साधारण ऑगस्ट १९९५ मध्ये पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी पहिला मोबाईल कॉल तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांना केला आणि तेथून मोबाईल क्रांती म्हणू आपण फारतर, ती सुरू झाली. मोबाईल पूर्वी पेजर सारखी सुविधा काही शहरात सुरू होती पण मोबाईल वापर करणारी मंडळी व्यावसायिक होती, ज्यात इनकमिंग कॉलला देखील चार्जेस होते. त्यानंतर जवळपास सतरा वर्षा नंतर २०१२ मध्ये कोलकाता येथे 4G तंत्रज्ञानाचा श्रीगणेशा झाला. २६ वर्षांचा कालावधी झाला आहे आणि या कालावधीत “भारत” स्मार्ट फोन मार्केट साठी जगात दुसऱ्या स्थानी आहे. खूप गोष्टी बदलल्या, खूप गोष्टी सोप्या झाल्या, फक्त कॉल करण्यासाठी फोन अशी त्याची व्याख्या न राहता इंटरनेटच्या सहाय्याने करमणूक, बँकिंग, गप्पा-टप्पा,  ई-कॉमर्स, गेमिंग, ई-लर्निंग या कारणांसाठी वापरला जाऊ लागला. यात सगळ्यात जास्त “करमणूक” या प्रकारात स्मार्ट फोनचा वापर होत आहे आणि तो होत राहील.

          ओव्हर द टॉप (OTT) प्लॅटफॉर्म ने इंटरनेट सहाय्याने स्मार्ट फोन वर टेलिव्हिजन आणि चित्रपट सेवा देण्याचे सुरू केले आणि त्यास प्रचंड प्रसिद्धी मिळू लागली, मिळत आहे आणि राहील.. हे मी वेगळे सांगण्याची गरज नाही. हा मीडिया २०२३ पर्यन्त १३८ अब्ज एवढ्या किमतीचा होईल आणि भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर असेल. साधारण १९९५ (प्रीसेप्ट सॉफ्टवेअरने विंडोज बेस्ड अॅप्लीकेशन तयार केले जे इंटरनेटचा वापर करून ऑडिओ, व्हिडिओ दाखवू शकेल) मध्ये IPTV (इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन) च्या सहाय्याने डिजिटल टेलिव्हिजन कंटेंट उपलब्ध करून देणे सुरू होते (भारतात MTNL ने २००६ मध्ये सुरुवात केली) अर्थात त्यास सेट टॉप बॉक्स आणि प्रोव्हायडर ची मान्यता आवश्यक होती. तोच प्रकार आता OTT म्हणून आज आपण पाहतो आहोत. हा मीडिया सरळ ग्राहका पर्यन्त पोहोचतो त्यामुळे त्यास काय हवे आहे हे पूर्णपणे ओळखलेल्या कंपन्यांनी तशाच सेवा या प्लॅटफॉर्म वर देण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रचंड प्रसिद्धी, अमाप यश (हे कोविड मुळे शक्य झाले असे म्हणाल्यास वावगे ठरणार नाही) आणि सर्वात महत्वाचं म्हणजे

व्यवसायाचं कनेक्शन !! या प्लॅटफॉर्मनी काय स्ट्रिम करावं यावर कुणाचेही बंधन नाही, जे दाखवलं जात ते थेट ग्राहकास दिसतं त्यामुळे दोघांनाही पूर्ण स्वातंत्र्य !! सध्या थिएटर्स बंद असल्याने हे स्वातंत्र्य अगदी पुरेपूर अनुभवले जाते आहे. असे नाही की, काहीच चांगल / निखळ मनोरंजनांच या प्लॅटफॉर्म वर दाखवल जात नाही पण शौकीन मंडळीं आनंदी आहेत, असो.. मागील वर्षी म्हणजे २०२० मध्ये अहमदाबाद स्थित Mica (पूर्वीचे मुद्रा इंस्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन) यांनी केलेल्या सर्व्हे प्रमाणे सर्वात जास्त OTT प्लॅटफॉर्मचा वापर सर्वच मंडळी करीत आहेत त्यात पुरुष आघाडीवर आहेत.  महिला, विद्यार्थी यांचे प्रमाण देखील वाढते आहे. प्रत्येकास हे वापरण्याचा अधिकार आहे पण यासाठी कोणतीच मार्गदर्शक तत्वे सध्यातरी नाहीत त्यामुळे टिन एज मित्र देखील आनंदी आहेत. पालक फिल्टर लावू शकतात पण कसे या विषयी त्यांच्याकडे माहिती उपलब्ध नाही. माझ्या सारखी या क्षेत्राशी संबंधित मंडळी या विषयी पालकांना नक्कीच मार्गदर्शन करून शकतील, गरज आहे पुढाकाराची, योग्य वेळी पुढाकाराची !!      

          घरातील सर्व मंडळी OTT चा वापर नव्याने उपलब्ध होणाऱ्या स्मार्ट टेलिव्हिजन सेट द्वारे करू शकतात, अथवा डिजिटल सेट टॉप बॉक्स वापरुन पाहू शकतात पण हे कुठेतरी चुकतं आहे असे वाटते.. कारण इंटरनेट वरील गेम्स आणि अॅप्सनी या पूर्वीच युवकांना गुंतवून ठेवले आहे. हे सारं आता टेलिव्हिजनच्या मोठ्या स्क्रीनवर पाहणं, अनुभवणं सहज शक्य आहे. मित्र भेटून गप्पा, पारावरील गप्पा, घरात सहभोजन करताना होणाऱ्या गप्पा सगळ्या हळू हळू लुप्त होत चाललं आहे. एखाद्या सिरीजचा भाग पहायला सुरू केल्यास एकास एक भाग लागून सुरू होतात आणि माणूस त्यातच अडकून बसतो, याने एकलकोंडे पणा वाढेल अशी शक्यता नाकारता येणार नाही. मनोवैज्ञानिक दृष्ट्या हे योग्य नाही.

          OTT मीडिया एकापेक्षा जास्त मार्गांनी आपल्या जीवनावर परिणाम करत आहे. मला वाटतं OTT प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या मंडळींनी खालील प्रश्न स्वत:स विचारावेत.

  •         OTT चा परिणाम कुटुंबावर होतो, हे कुटुंबात अंतर निर्माण करत आहे का?

o   कौटुंबिक सुसंवाद धोक्यात आहे का?

o   मुले अनियंत्रित ओटीटी मीडिया अंतर्गत सुरक्षित आहेत का?

समाजावर होणाऱ्या परिणामा विषयी एका अहवालात असे नमूद केले आहे की “विनोद” हा “सेक्स” आणि “गुन्ह्यां” नंतर पाहिला जाणारा उच्चतम प्रकार आहे, त्याचा संपूर्ण समाजावर कसा परिणाम होईल? सिनेमा गृहांवर याचा परिणाम नक्की होईल असे दिसते कारण सगळेच नवे चित्रपट OTT वर प्रदर्शित होत आहेत.

  •         एखाद्याच्या व्यक्तीच्या आरोग्यावर त्याचा कसा परिणाम होईल?
  •         व्यावसायिक/करिअरच्या प्रगतीवर त्याचा काय परिणाम होईल?
  •         विद्यार्थ्यांच्या जीवनावर कसा परिणाम होईल?   

          मी OTT प्लॅटफॉर्मचा विरोधक अथवा समर्थक नाही फक्त अलीकडील काळात हा प्लॅटफॉर्म वापरात आला , निखळ मनोरंजानाचे कार्यक्रम पाहिले पण त्याच वेळी थोडसं एक्सप्लॉअर केलं आणि डोक्यात काही प्रश्न निर्माण झाले ते आपल्या समोर मांडावेत म्हणून हा लेख प्रपंच.

          मला या नव्या डिजिटल प्लॅटफॉर्म विषयी तुमचं मत जाणून घेण्यास आवडेल, हा लेख वाचल्यावर मला तुमचे मत कमेन्ट करा आणि व्यक्त व्हा. धन्यवाद.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक करावं.  

https://amitkamatkar.blogspot.com                                        

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?