आउट ऑफ द बॉक्स
“आउट ऑफ द बॉक्स” हा शब्द आपण नेहमी ऐकतो,
पण तसे करायचे म्हणजे नक्की काय करायचं? असं कोणतंही मापक, दंडक नाही, हे कुठेही
शिकवलं जात नाही. पण हे एक कौशल्य ज्यास जमतं तो जीवनात यशस्वी होतो हे नक्की !! स्टार्टअप
मध्ये देखील आउट ऑफ द बॉक्स विचारांना अनन्य साधारण असे महत्व आहे. शेवटी तुमच्या
कल्पनेस तुम्ही किती आणि कसा वाव देऊ करता त्याची सत्यता कशी प्रस्थापित करता
यावरच तुमचं यश अवलंबून असतं. चौकटी बाहेरचा विचार तुमचे क्षितिज विस्तारण्यास मदत
करतो, त्यातून धोक्याची आणि संधीची जाणीव तुम्हास होऊ शकते. धोरणात्मक दृष्टी मुळे
नफा आणि तोटा या दोन्ही बाजू समजून घेण्यास तुम्ही सक्षम होता आणि महत्वाचं सक्रिय
राहता. आव्हानात्मक समस्या सोडविताना अस्तित्वात नसलेली उत्तरं शोधण्यासाठी स्वत:च्या
वैचारिक सीमांच्या पलीकडे/ पुढे पाहण्याची संधी तुम्हास मिळते. चौकटी बाहेरचा
विचार करणे याचा अर्थ असा की तुम्ही, तुमच्या इच्छित परिणामा पर्यन्त पोहोचण्यासाठी
विविध उपाय आणि पद्धती विचारात घेण्यास इच्छुक आहात. वेगळ्या पद्धतीने विचार
करण्याने तुमच्या करिअरवर याचा योग्य सकारात्मक परिणाम होऊ शकतो. लक्षात ठेवा,
जेंव्हा तुम्ही अमर्याद शक्यतांसाठी खुले असता, तेंव्हा शक्यता अंतहीन असतात.
गर्दीचा
चेहरा की तुमचे स्वतंत्र अस्तित्व? हा खूप साधा प्रश्न वाटतो, पण खरं सांगू खूप
महत्वाचा प्रश्न आहे. तुमचे वेगळेपणं सिद्ध होणे किंवा त्यासाठी प्रयत्न करणे कधीही
तुमच्या फायद्याचे राहते. बऱ्याच वेळा आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखविण्यात एक
न्यूनगंड असतो, तो काढून टाकावा कारण तेच तुम्हाला प्रतिस्पर्ध्या पेक्षा वेगळे सिद्ध
होण्यास आणि बाजारात सक्षम होण्यास मदत करते. जर आपल्या पैकी प्रत्येकाने गोष्टी जशा
आहेत तशाच स्विकारल्यास जगात नावीण्य किंवा सुधारणा होणार नाही. थॉमस एडिसनने चौकटी
बाहेर विचार केला नसता तर जग आजही अंधकारात बुडालेलं आपल्याला पहायला मिळालं असतं.
प्रत्येक गोष्ट बदलू शकते समाजास त्याचे नवीन व्हर्जन आपण देऊ करू शकतो का? हाच विचार
तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स कल्पनेकडे घेऊन जाईल, जो तारक विचार असेल. उपलब्ध परिस्थितीवर
प्रश्न विचारून तुम्ही अनुभव, उत्पादन, किंवा सेवा कशी सुधारू शकता याचा सतत विचार
तुम्हास व्यवसायात बुद्धिमान आणि हटके निर्णय घेण्यास सशक्त , सक्षम बनवतील.
चौकटी
बाहेर विचार करणे ही केवळ मानसिकता नाही तर जीवनशैली देखील आहे. ही एक कला आहे जिथे
तुमची सर्जनशीलता फुलते , तुम्ही सर्वोत्कृष्ट होण्याचा प्रयत्न करू शकता. आधुनिक समाजात
, मूलभूत विचारसरणी हिरावून घेतली जात आहे असे वाटते, तुम्हास रोबोट बनविण्यात आलेले
आहे, कंपन्यांना जे हवं आहे तेच आपण देऊ करीत आहोत, त्यांना भविष्यासाठी सक्षम करीत
आहोत, स्वत:चा असा कोणता विचार आपल्याकडे आहे? एक कर्मचारी बनून आपण फक्त सेवा देऊ
करीत आहोत असे नाही का वाटतं तुम्हाला? समाजास व्यक्तीवादाची भिती वाटते आणि मग ते
तुम्हास पारंपारिक, अनुरूप विचारांमध्ये अडकविण्याचा प्रयत्न करते जेणे करून तुम्ही
हेतूच्या अभावाने समाधानी व्हावं आणि त्यांचा हेतु साध्य व्हावा. त्यामुळे हे सारं
ओळखा नवीनतेचा शोध घ्या, विचार करा, प्रश्न करा त्याची उत्तरं हुडका तरच उद्याचा दिवस
खऱ्या अर्थाने तुमचा असेल अन्यथा “स्वत:च्या घरातील दिवा पण उजेड शेजारच्या घरात” अशी
तुमची गत होऊ शकेल.
भारत देश प्रवर्तक, नवोदित लोक शोधत आहे जे चौकटीच्या बाहेर विचार करू शकतात कारण तेथूनच खरे
दिग्गज नेते जन्मास येतील जे भारतास पुढे घेऊन जाण्यास सक्षम असतील. आपल्या सर्वाना
वेगळा विचार करण्याचा वारसा आहे, “नवोन्मेष” ज्याने मानवास सर्वात हुशार प्रजातीं पैकी
एक बनवले आहे. मी तुम्हास, तुम्ही काय विचार करायचा? ते नाही सांगणार, हं पण एक नक्की
सांगेन, अनुयायी होऊ नका, स्वत:साठी विचार करू शकत नाही अशी व्यक्ति बनू नका, तुमच्याकडे
असणाऱ्या अगाध बुद्धिमत्तेचा वापर प्रत्यक्षात करा, कारण जर तुमच्याकडे हिंमत असेल
आणि विश्वासाची झेप घेण्याचे धैर्य असेल तर तुम्ही या जगात नक्कीच काहीतरी वेगळे आणू
शकता.
अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं
Amazing write up sir, well done
उत्तर द्याहटवाखुप छान व समर्पक . आवडला आपल्याला.
उत्तर द्याहटवाधन्यवाद !!
हटवा