फॉलोअर

होप यु अंडरस्टँन्ड

 

मुलं हि एक संपत्ती असतात अस म्हणालो तर वावगं होणार नाही, अर्थात इथे संपत्ती चा अर्थ आर्थिक असा न घेता तो “निसर्गाने दिलेली देणगी (बिनव्याजी)” असा घेतला तर योग्य होईल. मुलांचही एक वेगळं अस्तित्व असतं, त्यांनाही त्यांची मत असतात हे पालकांनी समजून घेतलं तर खूप गोष्टी सहज होतात, पालकांच्या म्हातारपणात ज्यास आपण दुसरे बालपण म्हणतो त्यावेळी मुलांची जबाबदारी वाढते आणि मुलांना आई-बाबा चा रोल करावा लागतो आणि त्यांनी तो त्यावेळी करावा (अपेक्षा नाही फक्त एक सूचना). तिथे कुठेही तराजू घेवून बसू नये. कारण मुलास लहानपणी घोडा-घोडा करताना बापानी ‘मुलगा मला सांभाळेल का’ असा विचार केला नव्हता, त्यात प्रेम होतं, माया होती आणि सर्वात महत्वाचं आपले पणा होता, माझ लेकरू !! हा भाव होता, आजकाल च्या धावपळीच्या जगात हा “आपलेपणा” कुठे तरी हरवतो आहे अस वाटतं. कुठेतरी वाचलं होत कि “मी, माझ” हा भाव खूप धोकादायक असतो यातून बाहेर पडण खूप कठीण पण प्रत्येक बाबतीत असणारी आशा हि “वेडीच” असते आणि इच्छांना मर्यादा नसते,


एक झाली एक हे चक्र सुरूच राहतं त्यास अटकाव जर कुणी घालत असेल तर तो साक्षात यम ! तो हे करू शकतो कारण कर्माचा पक्का आहे. आज एवढी मुक्ताफळ का ? असा काही प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर एकदम साध आणि सोप आहे नुकताच एक चित्रपट पाहिला ज्यामध्ये परदेशी असणाऱ्या मुलाची वाट पाहणारा बाप ! किती आशावादी (व्यवहाराची जाणं नसणारा- अथवा कळतं पण वळत नसणारा) असतो हे त्यात दाखवलं आहे.

          १०२ नॉट आऊट असे त्या चित्रपटाचे नाव आहे. कथानक तस जूनचं पण नव्या फॉर्म्युला मध्ये सादर करण्यात आलं एवढचं ! अमितजी आणि ऋषीजी दोघांचा अभिनय उत्तमच ! (बाप-लेक), आयुष्य कसं जगावं आणि सद्य परिस्थिती यावर चित्रपट भाष्य करतो. चित्रपटात एक वाक्य अमितजी म्हणताना आढळतात “मेरे बेटे को उसके बेटे से हारने नही दुंगा||” आणि अर्थातच ते जिंकतात हि ! पण चित्रपट आजची परिस्थिती दाखवतो हे बाकी खरं ! जो तो परदेशात स्थिरावतो आहे त्यामुळे आई-बाप इकडे स्वदेशात मुलांची वाट पहाताना दिसतात. मुलगा भारतात येणार म्हणून आनंदी असणारा आणि मुलगा, सून, नातवंडे यांच्या कल्पना विश्वात रममाण झालेला बाप जेंव्हा विमानतळावर मुलाला एकट्याला पाहतो त्यावेळी मुलगा नेहमी प्रमाणे म्हणतो, “होप यु अंडरस्टँन्ड”, आणि असेच तो अनेक विषयामध्ये म्हणत आलेला असतो, एक वेळ असा विचार येतो कि सगळं काय ते आई-बापाने “अंडरस्टँन्ड” करायचं का? हि मुलं त्यांच्या आई-वडिलांना काय हवयं, नकोय हे पाहणारचं नाहीत का? मुलांना हे समजणं सुद्धा खूप गरजेचं आहे अस मला वाटतं. प्रत्येक जण वृद्धावस्थेत जाणारच आहे, त्यासही यागोष्टी पहाव्या लागणारच आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावे एवढचं ! या मंडळीना समजून घेणे आणि त्यांना प्रेम देणे एवढचं जरी या मुलांनी केलं तरी १०२ नॉट आऊट हा स्वप्नवत पण प्रत्येकास हवाहवासा वाटणारा प्रवास करण्यास एक वेगळीच उर्मी मिळेल अस वाटतं.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?