पद्मश्री मो.रफी
“ना फन्कार तुझसा तेरे बाद आया, मो.रफी तू बहोत याद आया”, १९९० साली प्रदर्शित झालेल्या क्रोध या चित्रपटातील हे गीत जे गायलं होत मो.अझीझ यांनी, या गीतातून रफी साहेबां विषयी एक प्रकरची कृतज्ञताच व्यक्त केली अस म्हणावे लागेल. आणि हे खरही आहे रफी साहेबां सारखा दुसरा गायक ना परत जन्माला आला ना परत येईल. रफींच्या आवजाशी साधर्म्य असणाऱ्या मध्ये शब्बीर कुमार, अन्वर, मो.अझीझ पासून थेट सोनू निगम पर्यंत हा प्रवास आहे, अजूनही काही गायक असतील हि..... पण या गायकांना प्रसिद्धी मिळाली. या गायक कलाकारांनी रफी साहेबांचा आवाज म्हणून बरेच ऑर्केस्ट्रा केले, चित्रपट केले. रफी यांना आपल्यातून जावून ४० वर्षे झाली. पण अजूनही “तेरे आने कि आस है दोस्त, तू कही आस पास है दोस्त” या त्यांनीच गायलेल्या गीता प्रमाणे ते आपल्या अवतीभवती आहेत असच वाटतं. तेरे आने कि.... हे रफी यांनी रेकॉर्ड केलेले शेवटचे गीत.....
एका कार्यक्रमात अपघाती संधी मिळाली आणि तो रफी यांचा पहिला कार्यक्रम म्हणावा लागेल. या कार्यक्रमात के.एन.सेहगल येणार होते पण ऐनवेळी लाईट गेली आणि आयोजकांना काय करावे सुचेना इतक्यात कुणीतरी रफी यांना गायला सुचविले, तो रफी यांचा पहिला
परफॉर्मन्स तोही वयाच्या १३ व्या वर्षी ! लाहोर ऑल इंडिया रेडियो ने तर त्यांच्या साठी गायला रफी यांना आमंत्रित देखील केले होते. या नंतर १९४४ मध्ये एका पंजाबी चित्रपट “गुल बलोच” साठी रफी यांनी संगीतकार श्याम-सुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पहिलं गीत रेकॉर्ड केले. त्याचवर्षी रफी मुंबईत आले आणि साधारण १९४५ साली संगीतकार श्याम-सुंदर देखील मुंबईत होते त्यांनी रफी यांना हिंदी गाण्यासाठी पहिली संधी दिली, तो चित्रपट होता “गांव कि गोरी”. दरम्यान च्या काळात रफी यांनी त्यांचे आदर्श के.एन.सेहगल यांच्या सोबत कधी कोरस तर कधी त्यांच्या सोबत गायन केले. रफी यांनी सुरुवातीच्या काळात संगीतकार नौशाद यांच्या सोबत काम केले, त्यावेळी नौशाद त्यांना सांगत “तुझी स्वत:ची अशी शैली निर्माण कर, जे तू करू शकतोस” आणि त्यांच्या मार्गदर्शनाने स्वत:ची अशी वेगळी शैली निर्माण केली. या शैलीचे फॉलोअर्स आजही पहायला मिळतात. रफी यांनी नौशाद, ओ.पी.नय्यर, एस.डी.बर्मन, शंकर जयकिशन, रवि,मदन मोहन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, या सर्व दिग्गज मंडळींसोबत काम केले.
रफी दिलदार स्वभावाचे होते, “एक जिंदादिल” याची उदाहरणे हि आहेत, जसे कि त्यांचे चाहते त्यांना पत्र पाठवीत तर ते स्वत: त्यास उत्तर देत, यामुळे चाहते आणि रफी यांच्यात एक वेगळचं नात निर्माण झालं होतं.एखादा नवा संगीतकार जेंव्हा त्यांच्याकडून गाण गावून घ्यायचा आणि त्याची रफी यांना पेमेंट करण्याची परिस्थिती नसायची तेंव्हा गाणे म्हणायचे पैसे देखील ते घेत नसतं, अशी अनेक उदाहरणे बॉलीवूड मध्ये ऐकायला मिळतात. त्यांच्या सोबतच्या प्रत्येक गायका प्रती त्यांचा आदरभाव हि तेवढाच असायचा आणि इतर गायक मंडळी देखील त्यांना तेवढाच आदर द्यायची. एका कार्यक्रमात मन्ना डे यांनी “रफी यांना हिंदी फिल्म इंडस्ट्री मधील सर्वात मोठा गायक” असे संबोधले होते. “गाईड” या चित्रपटाचे संगीत एस.डी.बर्मन यांचे आहे, या चित्रपटात बर्मन दा नी सगळी गाणी किशोर दा कडून गावून घेणार होते पण किशोर दा रेकॉर्डिंग च्या वेळी आलेच नाहीत, मग काय बर्मन दा नी ठरवलं कि सगळी गाणी रफी साहेबांकडून गाऊन घ्यायची, आणि त्यांनी तसं केलं देखील. हे जेंव्हा किशोर दा ना कळालं ते लागलीच बर्मन दा कडे गेले आणि रेकॉर्डिंग करू अस म्हणाले, यावर बर्मन दा म्हणाले सगळी गाणी रेकॉर्ड झाली आहेत फक्त एक गाण राहील आहे, “गाता रहे मेरा दिल” बघ रफी साहेब तुला म्हणायची परवानगी देतात काय, ते परवानगी देत असतील तर मला काहीच अडचण नाही. यावर किशोर दा नी रफी साहेबांना संपर्क केला आणि त्यांना रिक्वेस्ट केली, रफी साहेब तयार झाले आणि गाईड मध्ये ते अजरामर गीत किशोर दांच्या नावावर झालं , “गाता रहे मेरा दिल, तुही मेरी मंझील”
१९५२ साली “बैजू बावरा” या चित्रपटातील “ओ दुनिया के रेखवाले” या गीताने त्या चित्रपटात मूर्तीलाहि रडू येते असे चित्रण केले आहे, या गीतातील भाव अगदी उत्तम प्रकारे रफी यांनी गीतात व्यक्त केले आहेत. गीत गाताना पडद्यावरील कलाकार ज्याप्रमाणे गाणे गाईलं त्याप्रमाणे गाणे गाण्याचं, गाण्यात हाव-भाव आणण्याचं कसबं रफी यांच्याकडे होते. प्रत्येक कलाकाराचा आवाज म्हणजे रफी साहेब, हे जणू एक समीकरणच होत. हिंदी चित्रपट सृष्टीत मो.रफी हे लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचले होते. अस म्हणतात बॉलीवूड मध्ये मदन मोहन यांनी संगीत दिलेली गाणी म्हणायला अवघड असतात, पण जे सुरांचे पक्के आहेत त्यांनाच ते शक्य होत, जर तुम्ही “हसते जख्म” मधील “तुम जो मिल गये हो” हे गाण ऐकल असेल तर तुम्हाला लक्षात येईल कि रफी यांनी किती सहज म्हंटल आहे, “मेरा साया” मधील “आपके पेहलू में आके रो दिये”, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या सोबत “गेट वे ऑफ इंडिया” मधील “दो घडी वो जो पास आ बैठे” अशी अनेक गाणी सांगता येतील. शंकर जय-किशन यांनी संगीतबद्ध केलेलं “दिल एक मंदिर” या चित्रपटातील “याद ना जाये” हे शैलेन्द्र यांच गीत तर मी म्हणेन अजरामर गीत आहे. शिवाय मनोजकुमार अभिनित “शहीद” या चित्रपटातील “ऐ वतन, ए वतन हमको तेरी कसम” असेल अथवा “हकीकत” मधील कैफी आझमी यांचे बोल असणारे “अब तुम्हारे हवाले वतन साथीयों ” आहा, सलाम रफी साहेब !!
रफी साहेब म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, ज्यांनी उडत्या चालीची गाणी म्हंटली,देशभक्तीपर गीते, दु:खी/प्रेमभंगाची गाणी असतील, कव्वाली, गझल, भजन आणि क्लासिकल गाणी असतील हरतऱ्हेच्या गाण्यांवर आपला स्वत:चा ठसा रफी यांनी कोरला आणि ती गाणी आजही आपल्याला त्या इरात घेवून जातात.
इक बंजारा गाये ,जीवन के गीत सुनाये ,
हम सब जीने वालों को जीने की राह बताये
अमित बाळकृष्ण कामतकर
superb
उत्तर द्याहटवा