फॉलोअर

पहिली कमाई – लाईफ टाईम मेमरी !

 

आयुष्यात काही गोष्टीना खूप महत्व असतं, जस कि शाळेचा पहिला दिवस, पहिली गाडी, पहिला मित्र/मैत्रीण, पहिलं प्रेम आणि नोकरी करीत असाल तर पहिला पगार, आणि व्यवसाय असल्यास पहिली कमाई ! सगळं कसं पहिलं वहिलं ज्यास अनन्य साधारण असं महत्व, सर्वसामान्य श्रेणीत हा विषय समान असावा अस मला वाटतं, कदाचित तुम्हीही सहमत असालं.. मी मागील एकोणवीस वर्षापासून व्यवसायात आहे पण मला आठवतं बरोबर एकवीस वर्षापूर्वी झालेला माझा पहिला पगार ! त्यावेळी मी कॉलेज शिक्षण पूर्ण करून एका कंपनीत “इंजिनीअर” म्हणून नोकरीस लागलो होतो, एक महिना/ तीस दिवस काम करायचं आणि पगारा दिवशी म्हणायचं “आजी सोनियाचा दिनू” असचं काहीतरी असतं चाकरमान्यांच ! माझ्याही आयुष्यात तो दिवस आला, खरचं खूप आंनद होतो, तो “धनादेश” अथवा रोख स्वरूपात (आज अवघड आहे !) मिळालेली रक्कम हातात घेवून....अगदी “आज मै उपर, आसमां नीचे” वगैरे म्हणाल्यासारखं !!

          त्या दिवशी माझा पगार झाल्यानंतर घरी येताना अनेक विचार मनात आले, कसा खर्च करावा पगार ! आयुष्यात स्वत: कमविलेले पैसे ! आहा ! स्वत:चा एवढा अभिमान वाटतं होता, काय आणि किती सांगू तुम्हाला !! असचं होत असेल ना सगळ्यांना,  का? मलाच काहीतरी दिव्य केल्या सारखं वाटतं होतं काय माहिती, आई-वडील कधीच मुलांकडे काही मागत नाही उलट ते देतच राहतात, माझी घरातील २४ तास सुरु असणारी बँक, म्हणजे बाबा !!  या बँकेतून जेंव्हा जेंव्हा पैसे लागले तेंव्हा तेंव्हा ते लागलीच मिळाले देखील होते कधीच त्यास मज्जाव केला गेला नाही, पण आज माझी बँक सुरु झाली होती आणि आज माझा टर्न होता (अर्थात त्यांनी कधीच काही मागितलं नाही उलट आयुष्यभर देतच राहिले आणि मी घेत राहिलो ! जसा कि तो माझा जन्म सिद्ध अधिकारच आहे) मला काहीतरी नवं करायचं होतं पण काय करावं सुचत नव्हतं, मी त्याच विचारात सायकल चालवत घराकडे निघालो होतो, इतक्यात मला सुचलं कि आपल्याला वेळेचे महत्व  शिकविलेल्या बाबांना एक नवं घड्याळ भेट द्यावं आणि कधीही “नवीन साडी घेवूयात अस म्हणालो तरी मला काय करायची नवीन साडी” अस म्हणणाऱ्या माझ्या आईला एक सुंदर साडी भेट द्यावी ! आणि हो माझी छोटी बहीण “आशु” हिला हि एक ड्रेस भेट देण्याचं मी ठरवलं. असा प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात येतो आणि प्रत्येक जण तो वेग-वेगळ्या प्रकारे सेलीब्रेट करतो मीही करणार होतो आणि मी केले !!

खरेदीचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही आणि तो मला करायचा हि नाही तो एक लाईफ-टाईम अनुभव आहे (मी “होता” म्हणणार नाही कारण त्याची अनुभूती आजही आठवणीत ताजी आहे)  खरेदी करून मी घरी आलो आणि पहिला पगार झाला, हि केलेली खरेदी अस सांगताच आई-बाबांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि डोळ्यात दिसणारं कौतुक पाहताना एक समाधान मिळालं.

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?