अतुलनीय “आनंद”
फिल्मफेअर
मध्ये बेस्ट डायलॉग, बेस्ट स्टोरी, बेस्ट अॅक्टर, बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर, बेस्ट
फिल्म, बेस्ट एडिटिंग हे पुरस्कार आणि सोबतच एक राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारा
चित्रपट म्हणजे “आनंद”, हो, हृषीकेश मुखर्जी यांचा आनंद, १९७१ साली प्रदर्शित हा
चित्रपट तसे पाहिलं तर जीवनाची मूल्यं अगदी हसत, हसत सांगून जातो. “जिंदगी बडी
होनी चाहिये, लंबी नही”, चित्रपटातील संवाद अप्रतिमच, एका पेक्षा एक सरस, जणू काही
संवाद लिहिणाऱ्या “गुलजार” यांची स्पर्धा स्वत:शीच होती, “मुझसे एक कविता का वादा है, मिलेगी मुझको”, एन.सी. सिप्पी आणि हृषिदा या
चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शन हृषिदा यांच, संगीत सलील चौधरी, हि सगळी भट्टीच माइंड
ब्लोइंग ! जबरदस्त !! मग स्टारकास्ट हि तेवढीच दमदार, आनंद सहगल – जयचंद (राजेश
खन्ना ), डॉक्टर भास्कर बॅनर्जी- बाबू मोशाय (अमिताभ बच्चन), रेणू (सुमिता सन्याल),
डॉ. प्रकाश व सौ. सुमन कुलकर्णी (रमेश व सीमा
देव), इसाभाई (जॉनी वॉकर), सिस्टर डी सा (ललिता पवार) आणि इतर हि मंडळींनी या
चित्रपटात योगदान दिलं. या चित्रपटास ५० वर्ष झाली म्हणून वाचण्यात आलं आणि वाटलं
आपणही काही लिहायला जमतं का ते पहावं. चित्रपटात रंगवलेला “आनंद” मलाही खूप भावतो,
अनेक वेळा या चित्रपटाची पारायणं केली आहेत. आठवणींच्या कप्प्यात “आनंद” सामावलेला
आहेच तो जीवनात मार्गदर्शकाचं काम करतोच, अशी धारणा माझ्या सोबत तुमचीही असावी.
त्याकाळी साधारण सहा कोटी एवढा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर आनंद चित्रपटाने केला म्हणजे
आताच्या हिशोबाने दोनशे कोटी !!!
राजेश खन्ना यांचा स्टारडमचा तो काळ, अमितजी यांचा “जंजीर” अद्याप प्रदर्शित व्हायचा होता, त्यामुळे सिल्व्हर स्क्रीन राजेश खन्ना यांचीच !! हृषिदांनी राजेश यांच्या कडून “आनंद“ उत्तम साकारून घेतला यात राजेश खन्ना कुठेच दिसत नाही, दिसतो तो एक उत्तम कलाकार , राजेश यांची स्वत:ची स्टाइल इतर चित्रपटात प्रकर्षाने दिसते, जाणवते ती या चित्रपटात दिसत नाही. कथन करताना अमिताभ यांचाच आवाज कानी पडतो, गरीब, दु:खी व्यक्तींसाठी काम करणारा आणि भाव-भावनांच्या कल्लोळात अडकलेला डॉक्टर , रेखाटावा तर तो फक्त अमितजींनी. एक डॉक्टर असून देखील आपण रुग्णास वाचवू शकत नाही याचं शल्य या डॉक्टरला असतं, आणि सर्व डॉक्टरी इलाज करून देखील आपला रुग्ण, मित्र वाचत नाही हे लक्षात आल्यावर चमत्कार होऊ शकतो आणि “आनंद”ला जीवनदान मिळू शकतं हि भाबडी आशा पडद्यावर जिवंत साकारली आहे अमितजी नी.
चित्रपटाची जान
आहे “आनंद सहगल- जयचंद”, तो पडद्यावर आला कि चैतन्य निर्माण होत, जणू काही पडद्यावर
हि आनंद विलसतो, दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर झालेला आनंद ज्याच्याकडे फक्त सहा महिने
कालावधीच आयुष्य राहिलेलं तो ते कसं आणि किती आनंदात जगतो आहे हे पाहणं आणि त्या
प्रवासात त्याला भेटणारी विविध पात्रं मग ती डॉक्टर भास्कर सोबतची प्रथम भेट असेल,
अथवा इसाभाई सोबतची भेट असेल जिथे त्याला जयचंद सापडतो, तसं पाहिलं तर रोजच्या
जीवनात दिसणारी हि विविध पात्र जी पडद्यावर या कलाकारांनी जिवंत केलेली आहेत.
मृत्यू तर अंतिम सत्य आहे ते कुणासही चुकलेलं नाही, पण तो जेंव्हा येईल तेंव्हा
येईल तो पर्यंत जगणं का सोडावं ? असा प्रश्न आनंद चित्रपटात विचारतो. जगणं हे कसं
सुंदर याचा प्रत्यय सदैव देत राहतो. हृदयाची स्पंदन ऐकावीत म्हणजे कळतं त्याचं
महत्व, त्यातील नाद-सप्तक अनुभवण्याचा प्रयत्न करावा म्हणजे कळतं त्याचं महत्व,
त्याचा आनंद अनुभवला आणि तो इतरांसोबत वाटता आला कि जमलं आपल्यालाही , असा निष्कर्ष
काढता येऊ शकेल. “जिदंगी बडी होनी चाहिये, लंबी नही”, हे वाक्यच भरपूर काही सांगत.
अवघं सहा महिन्याचं आयुष्य शिल्लक असताना सुमनला मोठ्या भावाच्या नात्याने काय
आशीर्वाद द्यावा या प्रश्नात अडकलेला “आनंद” मनाला नाही भावला तर नवलच !! दु:ख हे
सगळ्यांच्याच वाट्याला येते, थोडे कमी / जास्त पण त्यातूनही आनंद कसा घेता येऊ
शकेल हे शिकविताना, “मुरारीलाल” ला हाक मारल्यावर प्रत्युतरात “कैसे हो जयचंद?”
म्हणणारा इसाभाई हे पात्र देखील कायम स्वरूपी आपल्या लक्षात राहतं. स्टेज शो
करणारा कलाकार जो या चित्रपटातील उत्तम संवाद देऊन जातो, “जिंदगी और मौत तो
उपरवाले के हाथ में है जहाँपनाह, उसे तो ना आप बदल सकते है , और ना मै”, डॉक्टर
भास्कर आणि आनंद यांच्यातील संवाद ध्वनिमुद्रित करताना हेच संवाद मुद्रित होतात जे
चित्रपटाच्या शेवटी पुन्हा ऐकण्यास मिळतात. डॉक्टर भास्कर एक कविता मुद्रित करतो
ती कविता ‘गुलजार’ यांची –
मौत तू एक कविता है
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको
डूबती नब्ज़ों में जब दर्द को नींद आने लगे
ज़र्द सा चेहरा लिये जब चांद उफक तक पहुँचे
दिन अभी
पानी में हो, रात किनारे के करीब
ना
अंधेरा ना उजाला हो, ना अभी रात ना दिन
जिस्म
जब ख़त्म हो और रूह को जब साँस आऐ
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको
आयुष्यावर रसरसून प्रेम करा, जेवढे शक्य आहे तेवढा आनंद इतरांना द्या, नाती,
मित्र यांना जपा, स्वत:वर प्रेम करा, इतरांना प्रेम द्या , क्षणभंगुर अशा या
आयुष्यात दु:खास कुरवाळत न बसता आनंद वाटत रहा हाच संदेश “आनंद” देतो. म्हणूनच
चित्रपटात जरी आनंदचा मृत्यू झाला आहे असे दाखविले असले तरी “आनंद मरा नही, आनंद
मरते नही”, हेच सत्य आहे.
अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
"आनंद"पिक्चरच पूर्ण डोळ्यासमोर उभा केला.उत्तम शब्दांकन....
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर शब्दांकन , पुर्ण पिक्चर डोळ्यापुढे उभा रहातो.👌👌💐👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद !!
हटवा