सावरकर - राष्ट्र तपस्वी

 

अंदमानच्या सेल्युलर जेलच्या पार्श्वभूमीवर चिंतनमग्न स्वातंत्र्यवीर सावरकर — संघर्ष, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली; परंतु काही व्यक्ती अशा होऊन गेल्या की, त्यांच्या कार्याचे मूल्यमापन त्यांच्या काळात झाले नाही आणि मृत्यूनंतरही त्यांच्याभोवती वाद, दुर्लक्ष आणि उपेक्षेचे वलय कायम राहिले. मला वाटतं विनायक दामोदर सावरकर हे त्यातील सर्वांत ठळक उदाहरण मानावे लागेल. त्यांचे संपूर्ण जीवन संघर्ष, त्याग, राष्ट्रभक्ती आणि बौद्धिक तेजाने भरलेले ; पण तरीही त्यांना तहयात आणि मृत्यूनंतरही अपेक्षित सन्मान लाभला नाही. सतत असा काही नरेटीव सेट होतो ज्यामुळे भारतीय म्हणून वेदना होतात. ज्या संपूर्ण कुटुंबाने त्यांचे आयुष्य स्वातंत्र्यासाठी, भारत भूमी साठी वाहिले त्यांना अपेक्षित सन्मान का दिला जात नाही. त्यांनी कुटुंबाची आहुती देऊन चूक केली का? की सावरकर अद्यापही आपल्याला समजले नाहीत ? असा प्रश्नही पडल्या शिवाय राहत नाही. 

सावरकरांचे जीवन हे केवळ एका राजकीय नेत्याचे नव्हते, तर ते क्रांतिकारक, साहित्यिक- (भाषेचे शुद्धीकरण आणि शब्दकोश- अवश्य पहावा आणि वाचवा), इतिहासकार (त्यांच्या काळात उपलब्ध साहित्याच्या आधारावर त्यांनी केलेला अभ्यास आणि त्यातून लिहिलेले सावरकर साहित्य), तत्त्वचिंतक, विज्ञानवादी आणि समाजसुधारक होते. बालवयातच त्यांनी स्वातंत्र्याचा संकल्प केला. भारतीय स्वातंत्र्य चळवळ दरम्यान त्यांनी ब्रिटिश साम्राज्या विरुद्ध सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी “१८५७ चे स्वातंत्र्य समर” हा ग्रंथ लिहून ब्रिटिशांनी “बंड” म्हटलेल्या घटनेला “स्वातंत्र्ययुद्ध” असे गौरवपूर्ण स्थान दिले. त्या काळात हा विचार अत्यंत धाडसी होता.

सावरकरांच्या आयुष्यातील सर्वांत वेदनादायी पर्व म्हणजे सेल्युलर जेल येथील काळ्या पाण्याची शिक्षा. अमानुष छळ, एकाकी कैद, बेड्या, कोल्हू ओढण्याची शिक्षा—हे सर्व त्यांनी सहन केले. अनेक कैदी मानसिकदृष्ट्या खचले, पण सावरकरांनी त्या अंधाऱ्या कोठडीतही कविता लिहिल्या, विचार मांडले आणि सहकाऱ्यांना प्रेरणा दिली. ही केवळ राजकीय नव्हे तर आध्यात्मिक तपश्चर्या होती असेच मी म्हणेन. भारतीय अध्यात्मात “तप” म्हणजे संकटांतही ध्येयाशी निष्ठावंत राहणे. त्या अर्थाने सावरकरांचे अंदमानातील जीवन एका तपस्वी व्यक्ति सारखेच होते, हे मान्यच करायला हवं. पण या मध्ये देखील राजकारणाने शिरकाव केला आहे. त्या काळातही आणि आजही ज्या प्रमाणे नरेटीव सेट केला जातो त्यामुळे सत्य पुन्हा झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो. सावरकर म्हणजे विचारांचा तळपता सूर्य, तो कुणीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी तसे होणे नाही. 

इतिहासात अनेक महान व्यक्तींना त्यांच्या काळात विरोध आणि उपेक्षा सहन करावी लागली. संत ज्ञानेश्वर यांना समाजाने वाळीत टाकले होते. त्यांच्या कुटुंबाला धार्मिक व्यवस्थेने बहिष्कृत केले. तरीही त्यांनी “भावार्थ दीपिका” सारखा अमर ग्रंथ दिला. त्याचप्रमाणे संत तुकाराम यांच्या अभंगांना नदीत बुडवण्यात आले. समाजाने ज्यांना नाकारले, त्यांनाच पुढील पिढ्यांनी पूजले. सावरकरांच्या बाबतीतही अशीच विसंगती दिसते.

सावरकरांचे राष्ट्रवाद, हिंदुत्व आणि सामाजिक सुधारणा यावरील विचार अनेकांना पटले, तर अनेकांनी त्यांना विरोध केला. परंतु हेही तितकेच खरे की त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. मंदिर प्रवेशासाठी त्यांनी संघर्ष केला. जातीभेदा विरुद्ध आवाज उठवला. रत्नागिरीत पतितपावन मंदिराची स्थापना करून सर्व हिंदूंना समान प्रवेश दिला. हा विचार त्या काळातील सामाजिक रूढींना मोठे आव्हान देणारा होता.

मात्र स्वातंत्र्यानंतरच्या राजकीय प्रवाहात सावरकरांना केंद्रस्थानी स्थान मिळाले नाही. त्यांच्या योगदानापेक्षा त्यांच्या भोवतीचे वादच अधिक चर्चिले गेले. विशेषतः महात्मा गांधी वध प्रकरणानंतर त्यांच्यावर संशय घेऊन अटक करण्यात आली पण कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली, तरी सार्वजनिक जीवनात संशयाचे वातावरण दीर्घकाळ टिकून राहिले. परिणामी त्यांच्या कार्याचा वस्तुनिष्ठ अभ्यास कमी आणि राजकीय दृष्टिकोनातून मूल्यांकन अधिक झाले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने (2018) देखील सावरकरांचा गांधी वधात कोणताही , कसलाही सहभाग नव्हता असा निर्णय दिला आहे. 

सावरकरांच्या बाबतीत त्यांच्या प्रखर राष्ट्रवादामुळे त्यांना एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाकडे अनेकदा दुर्लक्ष झाले.  सावरकरांसाठी छत्रपती शिवाजी महाराज गुरुस्थानी, अखंड प्रेरणा स्रोत राहिले. जीवनात मार्गस्थ राहताना प्रत्येक वेळी महाराजांनी अशा परिस्थित काय निर्णय घेतला असता, काय केले असते याचा विचार करूनच त्यांनी निर्णय घेतले.

आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर समाज अनेकदा आपल्या काळाच्या पुढे असलेल्या व्यक्तींना समजून घेत नाही.. परिवर्तन घडवणारी माणसे समाजाच्या सोयीस्कर विचारांना हादरे देतात. सावरकरांनीही भारतीय समाजाला आत्मभान, विज्ञाननिष्ठा आणि निर्भय राष्ट्रवादाचा संदेश दिला. त्यामुळे ते अनेकांना अस्वस्थ करणारे ठरले. सावरकर समजणे, समजून घेणे सोप नाही. प्रखर तेजा पुढे साधारण माणसं टिकावच धरू शकत नाहीत. हेच त्यांच्यावर चिखलफेक करणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत लागू होते. अशा व्यक्तींनी त्यांनी भोगलेली शिक्षा, एकवेळ जरूर ट्रायल करून पहावी म्हणजे त्यांना समजेल... पण असे काही ते करणार नाहीत. 

सावरकरांच्या मृत्यूनंतरही उपेक्षेची भावना कायम राहिली, त्यांच्या स्मारकांवरून, शालेय अभ्यासक्रमांतील स्थानावरून आणि सार्वजनिक गौरवावरून सतत वाद निर्माण झाले. काही ठिकाणी त्यांचे नाव आदराने घेतले गेले, तर काही ठिकाणी त्यांच्याबद्दल मौन किंवा नकारात्मकता दिसून आली. एखाद्या राष्ट्रपुरुषाचे मूल्यांकन राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन होणे आवश्यक असते; परंतु सावरकरांच्या बाबतीत ते अनेकदा घडले नाही. आजही तसे घडताना दिसत नाही. 

तथापि, इतिहासाचे वैशिष्ट्य असे आहे की तो अंतिम निर्णय तात्कालिक राजकारणावर सोडत नाही. काळ जसजसा पुढे सरकतो, तसतसे व्यक्तिमत्त्वांचे पुनर्मूल्यांकन होते. आज सावरकरांवरील संशोधन वाढतं आहे. त्यांच्या साहित्याचा, कवितांचा, सामाजिक विचारांचा आणि क्रांतिकारी कार्याचा नव्याने अभ्यास केला जात आहे. हे दाखवते की, उपेक्षा कायमस्वरूपी नसते; सत्य आणि कार्य यांचे तेज अखेरीस मार्ग काढते.

सावरकरांचे जीवन आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते—समाजाचा स्वीकार हा महानतेचा एकमेव निकष नसतो. अनेक वेळा ज्या व्यक्तींना त्यांच्या काळात नाकारले जाते, त्यांच्याच विचारांवर पुढील पिढ्या उभ्या राहतात. उपेक्षा, टीका आणि गैरसमज यांतूनही ज्यांनी आपल्या ध्येयाशी तडजोड केली नाही, तेच इतिहासात वेगळे ठरतात.

आज गरज आहे ती सावरकरांकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून न पाहता, त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करण्याची. कारण एखाद्या व्यक्तीशी मतभेद असू शकतात; पण तिचे योगदान नाकारणे हा इतिहासाशी अन्याय ठरतो. सावरकरांचे जीवन हे संघर्ष, विचारस्वातंत्र्य आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक आहे. त्यांच्या आयुष्यातील उपेक्षा आणि मृत्यूनंतरही सुरू राहिलेला वाद हा भारतीय समाजाच्या विचारसंघर्षाचे प्रतिबिंब आहे.

काळाच्या ओघात व्यक्ती निघून जातात, पण त्यांचे विचार जिवंत राहतात. सावरकरांच्या बाबतीतही हेच सत्य आहे. त्यांच्या जीवनाकडे पाहताना उपेक्षा नव्हे, तर त्यांच्या कार्यामागील ज्वलंत राष्ट्रप्रेम आणि अदम्य जिद्द समजून घेणे अधिक आवश्यक आहे.

विशेष टिप: व्यक्त होण्या आधी लेख पूर्ण वाचा , सावरकर यांचे साहित्य, त्यांचे राष्ट्र विचार वाचावेत मगच व्यक्त व्हावं. विज्ञान निष्ठ सावरकर यांचे विषयी किती लोकांना माहिती आहे हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.

आज सावरकरांच्या जयंती निमित्त त्यांना कोटी कोटी नमन.

 अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर.


Image source: Google


टिप्पण्या

  1. अतिशय अभ्यासपूर्ण व तटस्थ लेखन, केवळ भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये क्रांतिकारकांच्या यादीमध्ये वरचे स्थान असणाऱ्या सावरकरांना समजून घेण्यात आपण कमी पडतो की काय असे वाटते, आपल्या विशेष टीप नुसार व्यक्त होण्याअगोदर तटस्थपणे चौफेर वाचन होणे अत्यंत आवश्यक आहे, श्री समर्थांच्या म्हणण्यानुसार अभ्यासोनी प्रगटावे, खूप धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  2. खुप सुंदर अभ्यासपूर्ण लेखन आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

डिजिटल लीडरशिपकडे वाटचाल करणारे सोलापूर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून शिकायचे लाइफ स्किल्स