Gen Z: समस्या की नवी कार्यशक्ती?
आजच्या वेगाने बदलणाऱ्या
तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक पिढीची विचारसरणी, जीवनशैली
आणि कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा दिसून येतो. त्यात Gen Z (१९९७ ते २०१२ या काळात जन्मलेली)
पिढी ही डिजिटल जगाशी सर्वाधिक जवळीक असलेली पिढी म्हणून ओळखली जाते. इंटरनेट, स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता
यांच्या सान्निध्यात वाढलेल्या या तरुणांनी शिक्षणानंतर आता मोठ्या संख्येने
व्यावसायिक जगात प्रवेश केला आहे. त्यांच्या कल्पकता, तंत्रज्ञानाचे
ज्ञान, स्वावलंबी विचार आणि लवचिक कार्यपद्धतीमुळे
कार्यक्षेत्रात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्यांच्या
कामाच्या पद्धती, अपेक्षा आणि कार्यसंस्कृती यांमुळे
नियोक्त्यांसमोर काही नवी आव्हानेही निर्माण होत आहेत. त्यामुळे Gen Z आणि बदलती कार्यसंस्कृती हा आजच्या काळातील महत्त्वाचा चर्चेचा विषय ठरत
आहे.
Gen Z सध्या विविध गोष्टीमुळे प्रकाशझोतात येत आहे. यातच विविध सर्वेक्षण देखील
विविध संस्था करीत आहेत . शिक्षण आणि करिअर सल्लागार
प्लॅटफॉर्म Intelligent.com च्या एका सर्वेक्षणानुसार, जवळपास सहापैकी एक
नियोक्ता Gen Z कर्मचाऱ्यांना नोकरीवर घेण्याबाबत संकोच
व्यक्त करतो. काही नियोक्त्यांच्या मते, या पिढीतील काही
तरुणांमध्ये अपेक्षा जास्त असतात; मात्र कामाच्या ठिकाणच्या
वास्तवाची तयारी तुलनेने कमी असते.
Gen Z कर्मचाऱ्यांना
नोकरीतून का काढले जाते आहे?
सुमारे १,००० भरती व्यवस्थापकांच्या सर्वेक्षणात अनेक
महत्त्वाची कारणे समोर आली आहेत. त्यापैकी काही
..
काही नियोक्त्यांच्या मते Gen Z कर्मचाऱ्यांमध्ये—
·
कामाबद्दल पुरेशी प्रेरणा नसणे
·
संवाद कौशल्य कमी असणे
·
व्यावसायिक वर्तनाचा अभाव
·
स्वतःहून पुढाकार न घेणे
·
कामाचा ताण हाताळण्यात अडचण
·
वेळेचे भान कमी असणे
·
समस्या सोडवण्याची क्षमता अपुरी
असणे
·
मिळालेला अभिप्राय स्वीकारण्यात
अडचण
अशा समस्या दिसून येतात.
सर्वेक्षणानुसार, ३९% नियोक्त्यांनी संवाद कौशल्याचा अभाव,
३१% नियोक्त्यांनी अभिप्राय स्वीकारण्यात अडचण आणि ३०%
नियोक्त्यांनी समस्या सोडवण्याची क्षमता अपुरी असल्याचे सांगितले.
जवळपास निम्म्या नियोक्त्यांना Gen Z कर्मचाऱ्यांकडून पुढाकार घेण्याची
अपेक्षा पूर्ण होत नसल्याचे जाणवले. सुमारे ४६% जणांनी व्यावसायिकतेशी संबंधित
समस्या सांगितल्या.
Performance Improvement Plan नंतरही परिस्थिती बदलत नाही?
काही कंपन्यांना Gen Z कर्मचाऱ्यांच्या कामगिरीत सुधारणा
करण्यासाठी औपचारिक Performance Improvement Plan (PIP) वापरावा लागतो.
अहवालानुसार, सुमारे ७९% नियोक्त्यांनी कमी कामगिरी
करणाऱ्या Gen Z कर्मचाऱ्यांना कामगिरी सुधारणा योजनेवर
ठेवले. मात्र त्यापैकी सुमारे ६०% कर्मचाऱ्यांना शेवटी नोकरी गमवावी लागली.
यावरून एक महत्त्वाचा प्रश्न
निर्माण होतो—
समस्या फक्त Gen Z मध्ये आहे की बदलत्या कार्यसंस्कृतीशी
जुळवून घेण्यात दोन्ही बाजूंना अडचण येत आहे?
व्यवस्थापकांनाही Gen Z सोबत काम करणे कठीण वाटते
ResumeBuilder.com च्या एका सर्वेक्षणात ७४% व्यवस्थापक आणि व्यावसायिक नेत्यांनी Gen
Z सोबत काम करणे इतर पिढ्यांच्या तुलनेत अधिक कठीण असल्याचे
सांगितले.
त्यांनी प्रामुख्याने हक्काची
भावना, प्रयत्नांचा अभाव आणि कमी उत्पादकता
यांसारख्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले.
एका Hiring Manager च्या मते, काही Gen Z कर्मचारी मोठ्या अपेक्षांसह नोकरीत
येतात; परंतु प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्या
आणि आव्हाने यांची त्यांना पुरेशी कल्पना नसते.
यामुळे काही कंपन्या नवीन
पदवीधरांना नोकरीवर घेण्याबाबत पुन्हा विचार करत आहेत.
पण Gen Z ला दोष देणे योग्य आहे का?
या प्रश्नाचे उत्तर सरळ
"हो" किंवा "नाही" असे देता येणार नाही. Gen Z ही वेगळी पिढी आहे. या पिढीने इंटरनेट,
स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि आता AI यांच्या वातावरणात शिक्षण आणि आयुष्य अनुभवले आहे. त्यामुळे त्यांच्या
कामाकडे पाहण्याच्या पद्धतीही वेगळ्या आहेत.
त्यांना—
·
Flexible Work Environment
·
Work-Life Balance
·
मानसिक आरोग्याला महत्त्व
·
त्वरित आणि स्पष्ट अभिप्राय
(Feedback)
·
अर्थपूर्ण काम
·
करिअरमध्ये वेगाने प्रगती
·
तंत्रज्ञानाचा अधिक वापर
यांची अपेक्षा असते. या अपेक्षा
पूर्णपणे चुकीच्या आहेत असेही म्हणता येणार नाही.
Gen Z ची Technology
ही मोठी ताकद
Gen Z ची सर्वात
मोठी ताकद म्हणजे त्यांची Technology आणि Digital
Tools सोबतची सहजता. स्मार्टफोन, सोशल मीडिया, ऑनलाइन शिक्षण, डिजिटल
प्लॅटफॉर्म आणि AI यांचा वापर त्यांना नैसर्गिकपणे जमत असतो.
भविष्यातील अनेक नोकऱ्यांमध्ये
ही कौशल्ये अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. मात्र याच तंत्रज्ञानामुळे काही समस्या
देखील निर्माण होतात. त्वरित परिणाम मिळण्याची सवय, सतत Digital Communication आणि समोरासमोर संवादाची
कमी सवय यामुळे पारंपरिक कार्यक्षेत्रात त्यांना काही वेळा जुळवून घेणे कठीण जाते.
Feedback म्हणजे
टीका नव्हे, विकासाची संधी
Gen Z कर्मचाऱ्यांबाबत
वारंवार चर्चेत येणारा आणखी एक मुद्दा म्हणजे Constructive Feedback स्वीकारण्याची क्षमता.
कामातील चुका दाखवून दिल्यावर
त्याकडे वैयक्तिक टीका म्हणून न पाहता स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी म्हणून
पाहणे आवश्यक आहे. तुम्ही जिथे काम करता त्या कार्यक्षेत्रात Feedback टाळता
येत नाही.
चांगला कर्मचारी तोच, जो Feedback ऐकतो,
त्यातून शिकतो आणि पुढच्या वेळी स्वतःमध्ये सुधारणा करतो.
पालकांची आर्थिक मदत आणि करिअरची जबाबदारी
आज अनेक तरुणांना त्यांच्या
पालकांकडून आर्थिक मदत मिळते. Bankrate च्या
एका सर्वेक्षणानुसार, जवळपास ६१% पालक आपल्या प्रौढ मुलांना
आर्थिक मदत करत आहेत.
पालकांची ही मदत निश्चितच
महत्त्वाची आहे. मात्र त्याच वेळी तरुणांनी स्वतःच्या करिअरची आणि आर्थिक
भवितव्याची जबाबदारी स्वीकारणेही गरजेचे आहे.
अति-सुरक्षित वातावरणामुळे कधी
कधी स्वतःच्या पायावर उभे राहण्याची गरज आणि संघर्ष करण्याची तयारी कमी होऊ शकते.
भविष्यातील कार्यक्षेत्र Gen Z चेही आहे
आव्हाने असली तरी Gen Z ही भविष्यातील कार्यशक्तीचा अत्यंत
महत्त्वाचा भाग आहे.
वेगवेगळ्या अहवालांनुसार, पुढील काळात कार्यबलामध्ये Gen Z ची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे कंपन्यांना Gen Z
ला पूर्णपणे टाळणे शक्य नाही.
उलट कंपन्यांना आणि Gen Z कर्मचाऱ्यांना एकमेकांना समजून
घेण्याची गरज आहे.
नियोक्त्यांनी बदलत्या पिढीच्या
अपेक्षा समजून घ्याव्यात, तर Gen
Z नेही कार्यक्षेत्रातील शिस्त, जबाबदारी,
संवाद, वेळेचे महत्त्व, Teamwork आणि Feedback यांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे.
शेवटी महत्त्वाचा मुद्दा...
Gen Z ही
"वाईट कर्मचारी पिढी" आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. त्यांच्यात काही वेगळ्या अपेक्षा आहेत, काही वेगळ्या कमतरता आहेत आणि त्याच वेळी
काही अत्यंत महत्त्वाच्या ताकदीही आहेत. त्याचप्रमाणे पारंपरिक कार्यसंस्कृतीही प्रत्येक बाबतीत
योग्य आहे असे नाही.
आज गरज आहे ती पिढ्यांमधील
संघर्षाची नाही, तर पिढ्यांमधील
समन्वयाची.
Gen Z ने "मला काय मिळेल?" याबरोबरच "मी संस्थेला काय देऊ शकतो?" हा प्रश्न
विचारायला सुरुवात केली पाहिजे. आणि नियोक्त्यांनीही "हा तरुण आमच्यासाठी योग्य आहे का?" याबरोबरच "या
तरुणाची क्षमता योग्य पद्धतीने विकसित करण्यासाठी आम्ही काय करू शकतो?"
हा प्रश्न विचारायला हवा.
कारण भविष्यातील कार्यक्षेत्र
हे केवळ एका पिढीचे नसणार आहे.
ते अनुभव, तंत्रज्ञान आणि नव्या विचारांचा संगम असणार
आहे.
** विविध सर्वेक्षणात प्राप्त
माहिती नुसार लेख लिहिण्यात आला आहे.
अमित बाळकृष्ण कामतकर

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा