ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

इमेज
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही. ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...

लेट हिम गो पीसफुली...

रुग्णालयात डॉक्टर म्हणतात, लेट हिम गो पीसफुली ......म्हंटल तर चार शब्द पण काळजाचा ठोका नक्की चुकवू शकतील असे आहेत, खरं तर अनंताचा प्रवास सुरु करण्याची परवानगी देणारे आपण कोण? पण डॉक्टर जेंव्हा हे रुग्णांच्या नातेवाईकांना सांगतात तेंव्हा मेडिकली सर्व प्रयत्न करून झालेले असतात आणि कोणत्याही चमत्काराची आशा उरलेली नसते असे आपण समजावे, अशीच स्वत:ची समजूत काढलेली योग्य ! रुग्णालयातील भिंतीनी हे शब्द अनेकदा ऐकलेले असतात, बदलतात ते फक्त ऐकणारे चेहरे. शब्द कानावर पडता क्षणी रुग्णालयातील सर्वच बाबी या दिखाव्याच्या आहेत असे भासू लागते, त्याच्या मर्यादा दिसू लागतात, रुग्णालयात भरती झाल्यापासून ओळखीचे झालेले चेहरे (डॉक्टर, सिस्टर, ब्रदर यांचे) अचानक अनोळखी भासू लागतात,  खरंतर रुग्णाची सेवा या मंडळींनी केलेली असते, भलेही तो त्यांच्या नोकरीचा एक भाग का असेना पण त्यांचं कर्तव्य त्यांनी पार पाडलेलं असतं. रुग्णास लावलेली उपकरणं ज्याचा आता काहीच उपयोग नाही हे स्पष्ट झालेलं असतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस किती पराधीन आहे याची झालेली जाणीव, हि जाणीव खूप यातना देणारी असते. रुग्णालयातील लोक आणि नातेवाईक मंडळी सगळे फक्त वाट पहात असतात कधी ? कधी ?? कधी ??? कारण रुग्ण अखेरचा श्वास कधी घेणार हे कुणीच सांगू शकत नसतं. 

रुग्णालयातील भिंतींनी बरचं काही सोसलेलं असतं, पाहिलेलं असतं अगदी तसंच सेवा देणाऱ्या मंडळींना हि हे अंगवळणी पडलेलं असतं, हां, पण एखाद्याचा जीव आपण वाचवू शकलो नाहीत याचं शल्य नक्कीच असतं. अगदी यमदेवाप्रमाणे रुग्णालयातील मंडळी सुद्धा भाव-भावनांच्या फेऱ्यात अडकत नाहीत, ते त्यांच्या पेशास योग्यहि नाही, असे म्हणतात कि साक्षात यमदेव प्राण घेवून जाण्यासाठी आलेला असतो, तो फक्त वेळेची वाट पहात असतो, वेळ आली कि तो कोणत्याच मोहपाशात अडकत नाही. म्हणून मला वाटतं कि जेंव्हा डॉक्टर म्हणतात लेट हिम गो पीसफुली तेंव्हा ते रुग्णाच्या नातेवाईकांना एक प्रकारे सल्लाच देतात कि आता रूग्णा भोवती असणारे, त्यात गुंतलेले तुमचे सर्व भाव-भावना, मोहपाश तोडा, त्यातून त्यास मुक्त करा आणि त्यास अनंताच्या प्रवासास जाऊ द्या. खूप कठीण असतं हे, पण काळ कधी कोणास काय दाखवेल याचा अंदाज बांधणं ना आज पर्यंत मनुष्य प्राण्यास जमलं आहे ना भविष्यातही कधी जमेल, मनुष्य हा एक फक्त कळसूत्री बाहुला आहे. कुणाचं प्रारब्ध कसं आहे त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असाव्यात. प्रारब्ध खूप मोठा रोल प्ले करतं म्हणे, कुणी लिहिलेलं असतं, नाही माहिती पण जेंव्हा शेवटी आपल्याकडे उत्तरं नसतात तेंव्हा आपण असं कांहीतरी म्हणतो अस वाटतं. 

रुग्णास काय वाटत असेल त्यावेळी, याचं उत्तर कधीच मिळत नाही, रुग्णाची मानसिक स्थिती कशी असते? हे समजतच नाही कारण त्यास बोलता येत नसतं बहुधा त्यावेळी रुग्णाचा त्या विधात्याशी संवाद सुरु असावा कि रुग्णही मानसिक तयार करीत असतो? श्रीमद् भगवत गीतेत हेच सांगितले आहे,

अव्यक्तोsयमचिन्त्योsयमविकार्योsयमुच्यते |

तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचीतूमर्हसि ||

आत्मा अव्यक्त आहे, तो इंद्रियांना अगोचर आहे. इंद्रियांच्या द्वारे आत्म्याचे स्वरूप समजू शकत नाही किंवा जीवात्म्याचे अस्तित्व प्रस्थापित करता येत नाही. अर्थात इंद्रिय व विषय यांचा संयोग जोपर्यंत असतो, तो पर्यंत आत्म्याचे अस्तित्व असते; परंतु त्याचा स्पष्ट बोध होत नाही. तो अचिंत्य आहे, अकल्पनीय आहे. तो पर्यंत मन आणि मनातील विचार व भावनांचे तरंग आहेत, तो पर्यंत तो शाश्वत आहे, परंतु आम्ही त्याला पाहू शकत नाही, त्याचा उपभोग घेऊ शकत नाही, किंवा त्यात डोकावू शकत नाही. कारण तो मनालाही अगोचर आहे व म्हणून मनाचे नियमन करणे, मनाचा निरोध करणे आवश्यक आहे.

वेळ आली कि आत्म्याने धारण केलेले शरीर आत्मा सोडतो पण आत्म्यास शरीर सोडताना या नाशवंत शरीरास वेदना होत असणार, मग हा  आत्मा  शरीराच्या बाहेर पडताना होणाऱ्या यातना कमी करण्याचं कसबं रुग्णालयातील तज्ञ मंडळींकडे असावं बहुधा आणि रुग्णाच्या नातेवाईकांच्या मनाचे नियमन करण्याचा प्रयत्न करणे हेतू म्हणूनच ते म्हणतात “लेट हिम गो पीसफुली”.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर 


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?