ट्रेंडिंगच्या गर्दीत ‘ज्ञान’ हरवतं आहे का ?

 

Gen Z आणि सोशल मीडिया ट्रेंड्समुळे बदलणारा आभासी समाज

ट्रेंडिंगच्या गर्दीत ‘ज्ञान’ हरवतं आहे का ?

सगळं खूप उथळ झालं आहे, समाजात , आता ऑनलाइन, आभासी समाजात असा उल्लेख करणं जास्त संयुक्तिक होईल, काही अपवाद वगळता, एखादी गोष्ट अचानक एवढी ट्रेंड होते की तुम्ही फक्त आश्चर्य व्यक्त करण्या व्यतिरिक्त काहीच करू शकत नाही. अरे, काल,  नाही काही क्षणा पूर्वी ज्या व्यक्तीस / गोष्ट ओळखत नव्हतो, त्याचे नाव, काम, तो कोणत्या जातीचा, कसल्या विचारांचा आणि कोणत्या पक्षाचा याची पूर्ण कुंडलीच तयार झालेली असते. काही फायदे दिसतील याचे कदाचित, पण मला तर तोटेच जास्त दिसतात. पूर्वी दूरदर्शन सुरू होणेपूर्वी जी एक उत्सुकता असायची, बातम्यां साठी लक्ष दिले जायचे ते सारे आता इतिहास जमा झाले. कोणत्याही गोष्टी साठी थांबणे, वाट पाहणे हा पर्यायच आता उपलब्ध नाही. सगळं कस एकदम “तेज!, सबसे तेज !!”.

    

    या साऱ्या गर्दीत जे चांगलं, पोषक आहे , उत्तम आहे त्याचा विसर पडतो आहे काय? असा प्रश्न मनात येतो. “जो जे वांछिल तो ते लाहो”, ज्ञानेश्वर माऊलींनी बाराव्या शतकातच सांगून ठेवलं आहे. पण जेंव्हा ज्ञानाचा प्रकाश पडतो तेंव्हा चुकीच्या मागण्या संपतात, तेंव्हाच हे शक्य आहे. सध्याच्या काळात अनेक मंडळी “अर्ध्या हळकुंडात पिवळे”, झालेले असतात, त्यांच्यात ज्ञानाचा प्रकाश पडणार कधी? पण ज्ञान न मिळविता जो मनोरथ आहे तो पूर्ण होताना दिसतो. अल्प काळासाठी का होईना तो पूर्णत्वास जाताना दिसतो. कालाय तस्मै ! असेच याचा अर्थ घ्यावा खरा पण, ट्रेंडस् सेट होताना- “ज्ञान” कोण पाहतो? तुमच्या माइंडलेस स्क्रोलिंग मधून वेळ मिळाला तर गुगलला ट्रेंडस् विचारून पहा, अनेक आश्चर्य कारक निकाल पहायला मिळतील. आज मात्र ‘मला काय हवं’ हे ठरवण्याआधीच अल्गोरिदम आपल्याला सांगतो — तुला हेच हवं!”

आणि आपणही लगेच — ओह, येस! हेच तर माझ्या मनात होतं!

ट्रेंडिंग हा आजचा नवा देव आहे. जे ट्रेंडिंग आहे ते महत्त्वाचं, जे व्हायरल आहे ते सत्य आणि ज्याला लाखो views आहेत ते चांगलंच — अशी विचित्र समीकरणं तयार झाली आहेत. जे इंटरनेटवर उपलब्ध होतं त्यावर कमेन्ट करणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे अशा भावनेने ओतप्रोत असणारी मंडळी कमेन्ट करीत सुटतात त्याना कुणीच रोखणारं नाही. स्क्रीन मागे लपून अभिव्यक्ति स्वातंत्र्य नावाखाली कुणी काहीही कमेन्ट करायची आणि ट्रोल करायचा परवाना मिळाल्या सारखं मिरवायचं! हे कुठेतरी चुकीच घडतं आहे. असे वाटणारी मंडळी फार कमी त्यात मी एक !

अभिव्यक्ति मथळ्या खाली काहीही कमेन्ट करायचे लायसेंस मिळतं, आणि मग किळसवाणा प्रकार सुरू होतो. कदाचित तो मला तसा वाटतं असेल तुमचे मत वेगळे असेल सुद्धा ! मूळ मुद्दा बाजूला राहतो आणि विषय दुसरीकडेच जातो. अर्थात प्रस्तुत विषयाचे सोल्यूशन कुणालाच द्यायचे / काढयचे नसते फक्त गोंधळ घालणे एवढाच उद्देश असतो. शेवटी जसे गर्दीला चेहरा नसतो अगदी तसेच सोशल मिडियावरील अभिव्यक्तीला तरी कुठे असतो चेहरा ? म्हणूनच कदाचित आज सर्वात मोठी गरज वेगाची नाही, विवेकाची आहे.   

Gen Z ला आपण म्हणतो, तुम्ही डिजिटल नेटिव्ह आहात.” पण डिजिटल असणं आणि डिजिटल शहाणपण असणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. माहिती मिळण्याचा वेग प्रचंड वाढला; पण माहिती समजून घेण्याचा वेळ मात्र शून्यावर आला. Read less, react more! हे जणू नवं ब्रीदवाक्यच झालं आहे.


स्क्रोल करण्याआधी थांबणं, शेअर करण्याआधी तपासणं, कमेन्ट करण्याआधी विचार करणं आणि ट्रेंडच्या मागे धावण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारणं —


हे खरंच महत्त्वाचं आहे का, की फक्त ट्रेंडिंग आहे?”


कदाचित या एका प्रश्नाने आपल्या डिजिटल समाजाचा बराचसा गोंधळ कमी होईल.


बाकी… आज एक ट्रेंड तर उद्या दुसराच असेल!

 

अमित बाळकृष्ण कामतकर

 

Image source: Gemini          


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षित आणि साक्षर यात फरक काय? शिक्षणाचा खरा अर्थ

सोलापूर आणि आयटी पार्क : तीन पिढ्यांच्या प्रतीक्षेचा अंत कधी?

सोलापूर की पुणे? पूर्वग्रहांचा सुस्कारा आणि वास्तवाचा आवाज