फॉलोअर

कल्याणजी-आनंदजी- सांगितिक शिल्पकार

 

कल्याणजी-आनंदजी हिंदी चित्रपट सृष्टीतील एके काळचे आघाडीचे संगीतकार. एक एक गाणी म्हणजे जणू मोतीच ! जे गुंफले गेले एका माळे मध्ये आणि ती माळ म्हणजे कल्याणजी-आनंदजी. हे दोघे भाऊ, कल्याणजी मोठे आणि आनंदजी धाकटे, कल्याणजी वीरजी शहा यांचे वडील मुंबईत किराणा दुकान चालवायचे, याच दुकानातून केलेल्या खरेदीच्या रकमेपोटी एक गृहस्थ त्यांना संगीत शिकवू लागले आणि त्यांना संगीताची आवड निर्माण झाली. कल्याणजी यांचा जन्म ३० जून १९२८ चा, आणि आनंदजी यांचा २ मार्च १९३३, त्यांची  सांगीतिक जडण घडण हि मुंबई तील गिरगांव येथे मराठी आणि गुजराती कुटुंबांच्या सानिध्यात झाली. कल्याणजी यांना खरा ब्रेक मिळाला हा त्यांच्या आवडत्या वाद्यामुळे, क्लाविओलिन प्रचलित शब्द (सिंथेसायझर) या वाद्याच्या आधारे कल्याणजी “बीन” चा जादुई आवाज वाजवायचे, आणि त्यांच हेच कौशल्य त्यांना हिंदी चित्रपट सृष्टीत ब्रेक द्यायला उपयोगी पडलं, वर्ष होतं १९५४, या साली प्रदर्शित झालेला “नागिन” यामध्ये जी बीन वाजली ती कल्याणजी यांची, आणि मग सुरु झाला ऐतिहासिक सांगीतिक प्रवास. त्यांच्या सांगीतिक प्रवासातील महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी लाईव्ह ऑर्केस्ट्रा हा प्रकार भारतात सुरु केला, त्या अगोदर असे प्रयत्न कुणी केले नव्हते. सुरुवातील मुंबईतील भागात कल्याणजी वीरजी आणि पार्टी या नावाने त्यांनी ऑर्केस्ट्रा सुरु केला. या माध्यमातून हिंदी चित्रपट सृष्टीला अनेक गायक-गायिका त्यांनी दिल्या. त्यापैकी मनहर उधास, साधना सरगम, सुनिधी चौहान, कुमार सानू, सपना मुखर्जी, अलका याग्निक या सर्वांना पार्श्व-गायक म्हणून संधी कल्याणजी-आनंदजी यांनीच दिली. कल्याणजी-आनंदजी यांच्या लहान भावाने देखील ऑर्केस्ट्रा या प्रकारात खूप नाव कमावले, बाबला आणि कांचन या नावाने त्यांचा ऑर्केस्ट्रा होता. 

          हिंदी चित्रपट सृष्टीत संगीतकार म्हणून नाव कमविणे त्याकाळी एवढे सोपे नव्हते कारण, तो काळ होता एस.डी.बर्मन, रवि, हेमंत कुमार, मदन मोहन, नौशाद, शंकर-जयकिशन यांचा, या सर्वांमध्ये कल्याणजी यांचा संगीतकार म्हणून प्रवास सुरु झाला तो १९५९ साली आलेल्या “सम्राट चंद्रगुप्त” या भारत भूषण आणि निरुपा रॉय अभिनित चित्रपटाने, सुरुवातीच्या काळात आनंदजी त्यांना मदत करायचे, या जोडीचा पहिला संगीतकार म्हणून आलेला चित्रपट म्हणजे “सट्टा बाजार”, “मदारी”, १९६५ पर्यंत या जोडीने हिमालय कि गोद में, आणि जब जब फुल खिले हे दोन चित्रपट स्वत:च्या नावे केले होते. या दोन्ही चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. हिमालय कि गोद में मधील, “चांद सी महबुबा हो मेरी”, “मै तो एक ख्वाब हुं” हि गाणी श्रवणीय करण्यात या जोडीला यश आले, तसेच जब जब फुल खिले मधील “परदेसियों से ना अखियां मिलाना”, “ये समा ,समा है ये प्यार का”, या गाण्यांचा संगीत साज जेवढा सुंदर तेवढाच त्याचे बोल हि अर्थपूर्ण होते. असेच अर्थपूर्ण बोल लिहिणारे, आनंद बक्षी, गुलशन बावरा, अंजान, वर्मा मलिक, एम.जी.हशमत यांना त्यांच्या आयुष्यातील हिंदी चित्रपटसृष्टीत संधी याच जोडीने दिली. आणखी एक विशेष गोष्ट, लक्ष्मीकांत प्यारेलाल हि जोडी संगीतकार म्हणून नावाला येण्या अगोदर कल्याणजी –आनंदजी यांचेच सहकारी होते.

          कल्याणजी-आनंदजी यांनी जवळपास २५० चित्रपटाना संगीत दिले त्यापैकी १७ चित्रपट गोल्डन ज्युबिली, ३९ चित्रपट सिल्वर ज्युबिली आहेत, हा पण एक विक्रम म्हणावा लागेल. १९७४ साली कोरा-कागज या चित्रपटासाठी “फिल्मफेअर” पुरस्कार या जोडीने पटकावला. १९९२ साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने कल्याणजी यांना सन्मानित केले. या जोडीने प्रकाश मेहरा, मनोज कुमार, फिरोझ खान, मनमोहन देसाई, राजीव राय , गुलशन राय, सुभाष घई या दिग्गजांसोबत काम केले. भारतीय संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यामध्ये देखील या जोडीचा खूप मोठा हात आहे. डॉन (अमिताभ बच्चन अभिनित) या चित्रपटातील “ये मेरा दिल, प्यार का दिवाना” या गाण्याची धून ब्लॅक आय पीस या बँन्ड नी त्यांच्या एका गाण्यासाठी वापरली, ज्यास ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर मूळ संगीतकार म्हणून बी.एम.आय (Broadcast Music, Inc) पुरस्काराने या जोडीस सन्मानित करण्यात आले.

          किशोर दा स्टेज वर गाण्यास घाबरायचे, त्यांचे हे भय दूर झाले तेही या जोडीच्या ऑर्केस्ट्रा मुळेच ! किशोर दा उडत्या चालीची गाणी गाण्यात माहीर, त्यामुळे त्यांच्यावर टीका होत असे, कि हे फक्त उडत्या चालीचे गाणी गातात, किशोर दा नी देखील यास विविध गाण्यातून चोख उत्तर दिले, त्यापैकी कल्याणजी-आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेल्या “जिंदगी का सफर, है ये कैसा सफर” या गाण्याने.... हे गाण जेंव्हा रेडियो वर वाजू लागल तेंव्हा टीकाकार गप्प झाले, अस काही जाणकार सांगतात. धर्मात्मा मधील किशोर दा नी गायलेले “तेरे चेहरे में वो जादू है”, हे गीत तर ऑल टाईम हिट म्हणावे लागेल. डॉन, लावारिस,मुकद्दर का सिकंदर, जॉनी मेरा नाम, पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारा चित्रपट – सरस्वती चंद्र, सफर, हसीना मान जाएगी (जुना), गोपी,पूरब और पश्चिम, पारस, मर्यादा, हाथ कि सफाई, असे अनेक चित्रपट सांगता येतील ज्यामधील गाणी या जोडीने अजरामर केली. महेंद्र कपूर यांनी गायलेले “मेरे देश कि धरती”, “एक तारा बोले” आहा लाजवाब !! 

कल्याणजी यांच २४ ऑगस्ट २००० साली निधन झाल. कल्याणजी यांचे चिरंजीव विजू शहा हे हिंदी चित्रपट सृष्टीत योगदान देत आहेत. अनेक उत्कृष्ठ गीतं आपल्याला या जोडीने दिली जी आजही आपण आनंद घेत ऐकतो अशा म्युझिकल डियो बद्दल अजून खूप काही लिहिता येवू शकतं पण आज इथे थांबतो...              



माहितीस्त्रोत: माझे बाबा, इंटरनेट आणि टेलिव्हिजन.

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?