फॉलोअर

श्रद्धा आणि देव

 

आपण आयुष्यभर कोठे न कोठे श्रद्धा ठेवून असतो मग ती गुरूंवर असेल , देवा वर असेल, जन्मदात्या आई- वडिलांवर असेल, श्रद्धा हि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटते, काही ना काही अनुभूती देते म्हणूनच ती प्रत्येकाच्या आयुष्यात टिकून असते. मला वाटत तसे अनुभव तुम्हालाही आलेले असतील. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक आहे , तो ज्याला कळाला त्याला ती तारक वाटते, सुखावह वाटते पण श्रद्धा हि अंधश्रद्धा होवू नये कारण मग ती मारक ठरू शकते. “देव” हा एक श्रद्धेचा भाग आहे, आस्थेचा भाग आहे, ज्याची जशी श्रद्धा तसा त्यास अनुभव !!! कोणास कधी देव माणसात भेटतो, कधी तो फक्त अनुभवता येतो तर कधी दगडात देखील देव दिसतो, तो आहे अस आपण मानतो. पण ज्या दगडास घडवून मूर्ती तयार होते त्या मूर्तीत देव मावतो ? हा श्रद्धेचा भाग आहे.

भारतात तरी याच उत्तर होकारार्थीच आहे. श्रद्धा ठेवली तर दगडाच्या मूर्तीत देव वसतो व मावतो देखील. जो मूर्तिकार मूर्ती घडवितो त्यास देवाची अनुभूती मिळते का? याच उत्तर एखादा मूर्तिकारचं देवू शकेल. जेंव्हा दगडाला एखाद्या मूर्तीच मूर्त रूप येते तेंव्हा त्यात आपल्याला कल्पनेप्रमाणे (मनात असणाऱ्या चित्रा प्रमाणे) देव दिसायला सुरुवात होते. मोठ्या शास्त्रज्ञांनाही हे मानावं लागल, ज्यांनी अणु मधून परमाणु शोधून काढला कि त्याच्या पुढेही एक शक्ती आहे , हि शक्ती म्हणजेच देव, “गॉड पार्टिकल” !! मी यावर लिहावे एवढा काही मी मोठा नाही पण मध्ये पंढरपूर ला जाण्याचा योग आला आणि तिथे जे मी पाहिले ते मांडण्याचा एक प्रयत्न करतोय एवढचं !!

            आमच्या सोसायटी मधील मंदिरात विठ्ठल-रुक्मिणी ची मूर्ती स्थापन करण्याचे समितीने ठरविले त्यानुसार आम्ही मूर्ती आणावयास पंढरपूर येथे गेलो होतो. तिथे गांधी रोडवर मूर्तींची दुकाने आहेत. मूर्तिकारांनी काय सुंदर मूर्ती घडविल्या आहेत त्याच वर्णन शब्दात करणे कठीण. आपण ज्या श्रद्धेने त्या मूर्तींकडे पाहतो तसा भाव आपल्याला दिसतो हे बाकी नक्की !! मी हि श्रद्धाळू माणूसच, मी आपला विविध मूर्तींकडे पाहून, त्या मूर्तीकाराने कशा घडविल्या असतील याचा विचार करू लागलो. तेवढ्यात विचार आला मूर्तीकाराने दगडाला आकार दिला आणि हे रूप दगडाला दिल आपण त्याची देव म्हणून पूजा करणार पण हा “देव तर त्याच्या भक्तांची वाट पहात उभा आहे”, जसा पांडुरंग भक्त पुंडलिकाची वाट पहात विटेवर उभा होता अगदी तसच शंभू महादेव, गणपती बाप्पा, देवी लक्ष्मी, श्रीकृष्ण भक्तांची वाट पहात उभे होते, आजही आहेत. आपण भक्त मंडळी त्या मूर्तिकाराच्या कष्टाचे दाम मोजतो आणि आपला आपला देव पूजायला देव्हाऱ्यात नेतो. कारण त्याच्यावर असलेली “श्रद्धाच” आपल्याकडून हे करून घेते, अस मला वाटत. या कोरोना काळात काळजी घेणे अपरिहार्य आहेच पण आपण कुठे ना कुठे श्रद्धा ठेवून असतोच, नाही का?

            एका जुन्या मराठी चित्रपटात सुधीर फडके यांनी संगीत बद्ध केलेले ग.दि.माडगुळकरांच गीत आहे, “ देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे, देव सगुण निर्गुण, देव विश्वाचे कारण, काळ येई काळ जाई , देव आहे तैसा राही !! हे बोल खूप काही शिकवून जातात, फक्त आपल लक्ष नसत !!

अमित बाळकृष्ण कामतकर 

सोलापूर 


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?